Sunday, December 20, 2020

खंडोबाचा नंगर

खंडेनवमी दिवशी आमच्या श्रीराम पेठेत हनुमान मंदिरासमोर खंडोबाचा नंगर (लोखंडाची जाड साखळी) तोडला जातो, ही खूप जुनी परंपरा आजतागायत सुरू आहे. मी लहान असताना 'ढंगटाक ढढडांग ढंगटाक' असा आवाज आला की आम्ही घरातून धूम ठोकून थेट भराड्याच्या घरासमोर जायचो, ढोलाच्या निनादात वारू वाले हातातील वारू (घुंगरू लावलेला चाबूक) गोल फिरवून हातावर मारीत नृत्य करायचे, उजव्या हातात वारू घेऊन तो हात उंच पकडायचा आणि डाव्या हातात वारूचा शेंडा ताणून धरायचा मग 'ढंग टाक ढढडांग ढंगटाक' ह्या ठेक्यावर डोळे बंद करून वारूचे गुंगरू खळखळ वाजवायचे आणि पुढच्या क्षणातच तो वारू गोल फिरवून डाव्या हातावर जोरात मारायचा त्यानंतर येणारा 'फाट्ट़' हा आवाज ऐकून अंगावर काटा यायचा.

काहीजण हातात खंडोबाची उंच काठी पकडून आभाळाकडे पाहत ढोलक्याच्या ठेक्यावरच तोल सांभाळायचे. मग सर्व वारूवाले लोखंडाचा नंगर घट्ट बांधून त्यावर बसायचे, विठ्ठल भराडे उर्फ आबा कपाळावर हळदीचा भंडारा लावून तो नंगर हातात धरून तोडण्यासाठी सज्ज व्हायचे, उपस्थित सर्व भक्त 'येळकोट येळकोट घे' असा मोठा निनाद करायचे आणि त्याच त्वेषात आबा जोराचा हाबाडा देऊन नंगर तोडायचे. नंगर तुटला की ग्लानी येऊन पडायचे मग त्यांना पुन्हा भंडारा लावला जायचा, टॉवेल टोपी चढवली जायची आम्ही सर्वजण नंगराच्या पाया पडायचो. हा सगळा सोहळा बघण्यासाठी सर्व पेठकरी आणि गावातले लोक मोठी गर्दी करायचे.

आज आबा हयात नाहीत पण प्रत्येक खंडेनवमीला त्यांची आठवण येते. आता नंगर तोडायचा त्यांचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा मोहन भराडे उर्फ आप्पा पुढे चालवत आहेत. आजच्या दिवशी आमच्या गावातले भराडे कुटुंबीय मोठ्या भक्ती भावाने नंगरची पूजा करून हा खंडेनवमीचा उत्सव साजरा करतात. आमच्या पांगरीत पाहिले पाच ठिकाणी नंगर तोडला जायचा आता कालांतराने तीन ठिकाणी तोडला जातो. आधुनिक युगातही नंगर तोडण्याची परंपरा जपणारे मोहन भराडे, आप्पा पुकळे आणि हनुमंत गाढवे तसेच वारू खेळण्याची परंपरा जपलेले सुनील कदम, बबन घोडके, रामचंद्र घोडके , सदाशिव जगदाळे, खंडू जगदाळे, बाबा बाराते, मोहन बगाडे यांना सलाम.

आपल्या प्रत्येक सण आणि उत्सवामागे समाजाच्या हिताचे कारण असते शस्त्र असले की शास्त्र पण असतंच. खंडे नवमीला सुद्धा मराठा, ब्राम्हण, धनगर, वाणी, सुतार, मांग या सर्व जातीतील माणसं हा उत्सव साजरा करायला एकत्र येतात. आजच्या वर्गीकरणाच्या जमान्यात सर्व जातीपातीला पिवळ्या भांडाऱ्यात बांधून एकोप्याची भावना रुजवणारे असे उत्सव आणि परंपरा काळजीपूर्वक जोपासले जाणे काळाची गरज वाटते. आपल्या पुढच्या पिढीला अभिमानाने दाखवण्याची ही गोष्ट जपली गेल्याचे समाधान आहे.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २० डिसेंबर २०२०

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...