Friday, December 4, 2020

जग जिंकलेला गुरुजी

त्यांना सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले यापेक्षा कितीतरी अब्ज मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी मिळालेल्या बक्षिसातली अर्धी रक्कम सोबतच्या स्पर्धकांना दिली. ही माणसे अशीच जग जिंकत नाहीत त्याच्या मुळाशी माणुसकीचा झरा वाहत असतो. शिक्षणाची तहान भागवण्यासाठी रणजितसिंह डिसले गेली कित्येक वर्ष मेहनत घेत होते अखेर युनेस्कोचा ग्लोबल टिचर्स अवॉर्ड मिळाल्यामुळे हा आमच्या बार्शीचा सिंह जगाला दिसला. याच्या डरकाळीने जगभरासह अख्या भारताची शिक्षण व्यवस्था खडबडून जागी झाली. वाड्या वस्त्याच्या शाळेवर ज्ञानदान करता करता कल्पकतेच्या जोरावर जग जिंकता येते हे गुरुजींनी सिद्ध करून दाखवलंय. 

जगातल्या सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला माणूस आपला मित्र असावा, त्याला असे सहज भेटता यावे, मार्गदर्शन घेता यावे हा सुध्दा आपल्या माणूसपणाचा पुरस्कारंच आहे. प्रिय रणजितदादा आज तुम्ही गुरुजी, मास्तर, सर, अध्यापक, टिचर या शब्दांना सर्वोच्च सन्मान प्राप्त करून दिला. ही पृथ्वी तुम्हाला विसरणार नाही. तुमचे अभिनंदन करताना एक शिक्षक म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. पुरस्कार दरवर्षी कुणाला तरी मिळतो पण पुरस्काराची अर्धी रक्कम सहयोगी स्पर्धकांना देण्याची दानत फक्त एका रणजितसिंहातच असते. सर तुमच्या या दातृत्वाने तुम्ही पुरस्काराबरोबर प्रत्येकाच्या मनातला

"शिक्षक हा इन्कमसाठी नाही तर आऊटकम साठी काम करत असतो. मला पुरस्कार मिळाला म्हणून माझी तुलना इतर शिक्षकांशी केली जाऊ नये कारण प्रत्येक शिक्षक करत असलेले काम त्यांच्या त्यांच्या पातळीवर श्रेष्ठ आहे. जगभरातील इनोवेटीव्ही शिक्षकांना चालना देण्यासाठी यापुढे काम करायचे आहे. जगभरातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणूनच माझ्या पुरस्कारातली  रक्कम मी उरलेल्या नऊ स्पर्धकांना देऊ केली आहे." सरांशी गप्पा मारताना त्यांचे वैश्विक विचार ऐकून, एकदा जिंकलेले मन त्यांनी पुन्हा जिंकले.

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन विश्वातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव झाला. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम निवडीसाठी १० फायनालिस्ट निवडले गेले आणि त्यातून विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान मिळवलेले डिसले सर पाहिले भारतीय शिक्षक ठरलेत. अतिशयोक्ती नाही पण देशाचे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी आणि शिक्षण मंत्री म्हणून देशाला अशा टॅलेंट व्यक्तीची गरज आहे. अभिनंदन गुरुजी !

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ४ डिसेंबर २०२०

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...