Wednesday, March 24, 2021

करंट कनेक्शन

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याचे काम सुरू झालंय. वापरलेल्या विजेचे बिल भरायला हवे यात दुमत नाही पण बिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तेवढे पैसे का नाहीत आले याचा विचार झाला असता तर बरे झाले असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सगळा शेतमाल मातीत पुरावा लागला, जोडीला लहान सहान उद्योग होते ते पण बंद झाले. यावर्षी चार दोन पैसे पदरात पडतील या आशेने शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला; तो विकण्याचा काळ नुकताच सुरू झालाय तोवर सरकारला पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय सुचायलाय. एकिकडे तुमच्या लॉकडाऊनच्या अफवेमुळे आधीच द्राक्षे, आंबे पिकांचा भाव जाणून बुजून पाडला गेलाय तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडल्यामुळे पुन्हा तो शेतमाल शेतातच वाळून जाणार आहे.

शेतकऱ्यांना कुठून हफ्ते येत नाहीत, ते बिचारे आहे हेच कर्जाचे हफ्ते फेडण्यात आयुष्य खर्ची घालतात. सरकारला  उत्पन्नाचे हजारो स्त्रोत असतात शेतकऱ्यांना मात्र एकुलता एक स्रोत असतो, तेव्हा सरकारने वीज तोडणी बंद करून लॉकडाऊन सारखा अपयशी उपाय डोक्यातून काढून टाकून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात योग्य भावात कसा विकेल याचा विचार करावा. एकदा शेतकऱ्याकडे पैसे आले की मग तुम्ही वसुली सुरू केली तरी हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना तगाई दिली जायची पण ती वसूल करताना एक दंडक असायचा. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावरच त्याचा वसूल व्हायचा हे ध्यानात घ्यावे.

मागिल निवडणुकीत ईव्हीएम मशीनची बटणे दाबून शेतकऱ्यांनी मोठया आशेने या सरकारशी कनेक्शन जोडले होते, आता तुम्ही जर त्याच्या शेतातले कनेक्शन तोडत असाल कि ज्याचे कनेक्शन थेट त्याच्या संसाराशी आहे तर मग तो देखील सरकारचे कनेक्शन तोडू शकतो एवढी त्याच्यात ताकद आहे. मतदानाच्या टक्केवारीत वेळ काढून तुमचा प्रचार करून तुम्हाला मत दिलेला सर्वात मोठा घटक शेतकरी आहे तेव्हा त्याच्या संबंधित प्रत्येक गोष्टीबाबत थोडा वेगळा विचार व्हावा ही विनंती अन्यथा शेतकऱ्यांचा करंट तोडण्याच्या नादात सरकारला करंट देण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये बळावेल.

विशाल गरड
दिनांक : २४ मार्च २१

Saturday, March 20, 2021

प्रति महिना १०० कोटी

१००,००००००० प्रति महिना. (शंभर कोटी म्हणजे एकवर नेमके किती शुन्य असतात हे माहीत व्हावे म्हणून असे लिहिले) अरे काय बापाची पेंड आहे काय ? महाराष्ट्राची अर्धी संपत्ती फक्त या बड्या राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बुडाखाली आहे हे आज निदर्शनास आले. सदर आरोप कुणा ऐऱ्या गैऱ्याने नाही तर एका IAS अधिकाऱ्याने केले आहेत त्यामुळे यात काहीतरी तथ्य असेलच. खरंतर प्रत्येक खात्यात या गोष्टी संगनमताने होत असतात, त्या सगळ्यांनाच माहितही असतात पण मग असा एखादा लेखी पुरावा मिळाला की त्यावर शिक्कामोर्तब होते; जे आज झाले.

एकीकडे लॉकडाऊनच्या भितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला घोडा लागलाय आणि यांचा इन्कम बघा. सर्वसामान्य जनतेचे अब्जो रुपये अशा जबराट सिस्टीमने वसूल केले जातात म्हणूनच विकास राज्याचा नाही तर पक्षाचा होत राहतो, सामान्य कार्यकर्ते आणि जनता मात्र फुकटचे उदो उदो करायला उरतात. हे म्हणून हेच नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारे अशीच चालतात, बाकी तुम्ही आम्ही फक्त बटणं दाबण्यापूरतीच. आज यशवंतराव चव्हाण असते तर दोषी राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली असती. लाजिरवाणी आहे सगळं.

विशाल गरड
दिनांक : २० मार्च २०२१

(संदर्भ : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी केलेल्या प्रति महिना १०० कोटी रुपये मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र)



Wednesday, March 17, 2021

मुख्यमंत्र्यांस पत्र

मुख्यमंत्री महोदय,
तुम्ही नुसतं लॉकडाऊन करणार असं म्हणुस्तोर,

दारूचा स्टॉक करायला सुरुवात झाली.

किराणा दुकानात मालाची थाप्पी वाढली.

दिड दोन लाख बिल करणारी कोविड सेंटर सुरू व्हायली.

डुप्लिकेट सॅनिटायझरच्या कंपन्यांची कुलपं उघडली.

शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात शेतमाल विकत घ्यायला सुरुवात झाली.

शेतमालाचा साठा करण्यासाठी व्यापाऱ्यांची कोठारे भराय लागली.

कच्चा माल बेभाव विकत घेऊन पक्का माल लॉकडाऊन काळात चौपट किमतीत विकण्याची स्पर्धा लागली.

स्थलांतर होणार हे ध्यानात घेऊन ट्रॅव्हल्स वाल्यांनी गाड्यांची टायर बदलली.

तेलबिया कवडीच्या भावात विकत घेऊन तेल मात्र चढ्या दरात विकण्याची तजवीज झाली.

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलिस स्टेशनांनी दंडाची पावती बुके छपाईची ऑर्डर दिली.


मायबाप सरकार,
सगळ्यांनी सगळी तयारी सुरू केली, बस्स आता तुम्ही एकदा लॉकडाऊन जाहीर करून टाका म्हणजे या राज्यातला शेतकरी पण त्याची तिरडीची तयारी सुरू करेल. तेव्हा तुम्ही फक्त कोरोनाने किती मरतील हे मोजत बसा, लॉकडाऊनमुळे किती मरतील याची चिंता करू नका कारण ही प्रसार माध्यमे देखील ते तसले बिनकामी आकडेवारी दाखवण्याचे कष्ट घेणार नाही. मरणारा शेतकरीही मी लॉकडाऊनमुळे मेलो असे लिहिणार नाही.

काही जास्तीचे बोललो असेल तर माफी असावी सरकार,
पण गेल्यावर्षीच्या नुकसानीतुन उभा राहण्यासाठी यंदा आमचं माय बाप रक्ताचं पाणी करून राबलेत रानात. आत्ता कुठं तोंडात घास पडायला होता; तवर तर तुम्ही लॉकडाऊनची भिती दाखवायला सुरुवात केली. जनतेला भिती दाखवण्याबद्दल दुमत नाही ओ पण एकदा ते लाईव्ह येऊन व्यापाऱ्यांना पण सांगा "अजून लॉकडाऊन जाहीर नाही केलं तेव्हा शेतमालाचे भाव पाडू नका" म्हणून. लंय उपकार व्हत्याल जी.

विशाल गरड
दिनांक : १७ मार्च २०२१

Tuesday, March 16, 2021

जमली पुस्तकाशी गट्टी

ते काहीतरी आहे, ओढले की फाटते एवढंच काय ते तिच्या जीवाला ठाऊक. लेकराला हजारो रुपयांची महागडी खेळणी देण्याची ऐपत नसेल कदाचित माझ्याकडे; पण हे वैचारिक खेळणे देण्याची श्रीमंती नक्कीच आहे. छोट्या मोठ्या खेळण्यांसोबत साऊच्या हातात पुस्तके ठेवण्यावर मी ठाम आहे. तिला लवकरात लवकर वाचायला शिकवायच्या प्रयत्नात आहे मी.

तूर्तास इवल्याश्या हाताने पुस्तकाची पाने चाळायला शिकली, पुस्तक कुठेही पडलेले दिसुद्या ते उचलून माझ्या हातात आणून द्यायला शिकली. पुस्तके न्याहाळायला शिकली हे ही अकरा महिन्यांच्या जीवाच्या मानाने थोडके नव्हे. शेवटी लेखक असलेल्या बापाचं काळीज आहे कौतुक तर वाटणारंच की ओ. किप इट अप #कादंबरी (साऊ)

विशाल गरड
दिनांक : १६ मार्च २०२१

Friday, March 12, 2021

डॉ.कुंताताई जगदाळे जीवन गौरव पुरस्कार २०२१

डॉ.कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच बार्शी येथे पार पडला. सदर पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने, बार्शीचे नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी यांच्या शुभहस्ते मी सपत्नीक स्वीकारला. आयुष्याच्या या टप्प्यावर जीवनाचा गौरव होणे म्हणजे माझ्या खांद्यावर पडलेले हे कलारसिकांच्या अपेक्षांचे ओझे आहे जे पुढील काळात मी समर्थपणे पेलेन.

पुरस्कार हे वय पाहून नाही कर्तृत्व पाहून दिले जात असतात याची अनुभुती या पुरस्कार सोहळ्यात आली. विविध क्षेत्रातील नऊ रत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला. "मला मिळालेला हा पुरस्कार आजवर माझ्या कलाकृतीला दाद देणाऱ्या तमाम कलारसिक श्रोत्यांना अर्पण करत आहे" पुढील काळात अजून दर्जेदार कलाकृतींना जन्माला घालण्याचा प्रयत्न असाच सुरू राहील त्यासाठी तुमचे आजवर लाभलेले प्रेमही असेच सुरू ठेवा.

पुरस्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त करताना मी वायपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या स्मृती जागवल्या, डॉ.कुंताताई जगदाळे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. तसेच संस्थेच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल डॉ.यादव साहेब आणि नंदनजी जगदाळे यांचा कार्यकर्तृत्वाचा शब्दांनी गौरव केला. थोडक्यात मांडलेल्या विचारांनी सभागृह दणाणून सोडले. मला प्रथमच ऐकलेल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो.

आम्हाला पुरस्कृत करून आमचा यथोचित सन्मान केल्याबद्दल डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, निवड समितीतील सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच आम्हाला सन्मानित करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि पुरस्कार हातात घेतल्यानंतर ज्या हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या प्रत्येक हातांचे देखील मी आभार मानतो.

विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...