Wednesday, March 17, 2021

मुख्यमंत्र्यांस पत्र

मुख्यमंत्री महोदय,
तुम्ही नुसतं लॉकडाऊन करणार असं म्हणुस्तोर,

दारूचा स्टॉक करायला सुरुवात झाली.

किराणा दुकानात मालाची थाप्पी वाढली.

दिड दोन लाख बिल करणारी कोविड सेंटर सुरू व्हायली.

डुप्लिकेट सॅनिटायझरच्या कंपन्यांची कुलपं उघडली.

शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात शेतमाल विकत घ्यायला सुरुवात झाली.

शेतमालाचा साठा करण्यासाठी व्यापाऱ्यांची कोठारे भराय लागली.

कच्चा माल बेभाव विकत घेऊन पक्का माल लॉकडाऊन काळात चौपट किमतीत विकण्याची स्पर्धा लागली.

स्थलांतर होणार हे ध्यानात घेऊन ट्रॅव्हल्स वाल्यांनी गाड्यांची टायर बदलली.

तेलबिया कवडीच्या भावात विकत घेऊन तेल मात्र चढ्या दरात विकण्याची तजवीज झाली.

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलिस स्टेशनांनी दंडाची पावती बुके छपाईची ऑर्डर दिली.


मायबाप सरकार,
सगळ्यांनी सगळी तयारी सुरू केली, बस्स आता तुम्ही एकदा लॉकडाऊन जाहीर करून टाका म्हणजे या राज्यातला शेतकरी पण त्याची तिरडीची तयारी सुरू करेल. तेव्हा तुम्ही फक्त कोरोनाने किती मरतील हे मोजत बसा, लॉकडाऊनमुळे किती मरतील याची चिंता करू नका कारण ही प्रसार माध्यमे देखील ते तसले बिनकामी आकडेवारी दाखवण्याचे कष्ट घेणार नाही. मरणारा शेतकरीही मी लॉकडाऊनमुळे मेलो असे लिहिणार नाही.

काही जास्तीचे बोललो असेल तर माफी असावी सरकार,
पण गेल्यावर्षीच्या नुकसानीतुन उभा राहण्यासाठी यंदा आमचं माय बाप रक्ताचं पाणी करून राबलेत रानात. आत्ता कुठं तोंडात घास पडायला होता; तवर तर तुम्ही लॉकडाऊनची भिती दाखवायला सुरुवात केली. जनतेला भिती दाखवण्याबद्दल दुमत नाही ओ पण एकदा ते लाईव्ह येऊन व्यापाऱ्यांना पण सांगा "अजून लॉकडाऊन जाहीर नाही केलं तेव्हा शेतमालाचे भाव पाडू नका" म्हणून. लंय उपकार व्हत्याल जी.

विशाल गरड
दिनांक : १७ मार्च २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...