Sunday, September 26, 2021

लप्पाछप्पी

मी बेडरूमच्या बाहेरून आवाज दिला "साऊ, मी तुला शोधायला येतोय, तू लपून बस" ती ड्रेसिंग टेबलच्या बाजूला जाऊन लपली. ती तिची लपायची नेहमीची जागा आहे हे ठाऊक असतानाही मी उगाच इकडे तिकडे साऊ-साऊ करत फिरत बसलो. विराने मला हळूच सांगितले की तुम्ही तिकडे पाहत असताना साऊ ड्रेसिंग टेबलच्या आडून तुम्हाला पाहून तुमची लोकेशन चेक करत आहे. तिचे हे असे पाहणे मला फोटोत कैद करायचे होते म्हणून मी बेडरूमच्या बाहेर जाऊन पुन्हा गुपचूप ड्रेसिंग टेबलच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबलो. मोबाईलचा कॅमेरा सुरू करून तो हळूच थोडा वरती करून मोबाईलच्या स्क्रिनमध्ये मी साऊची वाट पाहू लागलो. माझी लोकेशन स्पॉट करायला साऊने तिचे दोन डोळे हळूच बाहेर काढले तेवढ्यात मी मोबाईलमध्ये ते क्लिक केले आणि दुसऱ्याच क्षणात साऊ इज स्टॉप म्हणले. ती पळत येऊन मला बिलगली आणि अशा पद्धतीने आज आम्ही जागतिक कन्या दिन साजरा केला.

विशाल गरड
दिनांक : २६ सप्टेंबर २०२१

सप्तरंग स्वप्नपूर्ती

रविवार दर आठवड्याला येतो पण आजच्या रविवारची सकाळ स्वप्नपूर्तीची होती. झोपेतुन उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला तर पहाटेपासूनच मित्रांच्या मेसेजेसने इनबॉक्स भरून गेला होता. सर्वांचा एकच मेसेज होता "अरे विशाल, सकाळ सप्तरंगला तुझा मोठा लेख आलाय" बहुतांशी जणांनी पेपरचे फोटो काढून पाठवले होते. जेवढा आनंद त्यांना मला हे सांगताना झाला असेल तेवढाच मलाही त्यांचे ऐकून झाला. खरंतर आजपर्यंत खूप काही लिहिलंय, अनेक विषय हाताळले. माझी वेबसाईट अशा विविधांगी लिखाणाने नेहमीच भरलेली असते.

मी सप्तरंगचा नियमित वाचक असल्याने कधीतरी आपलाही लेख इथे येईल असे स्वप्न पाहिले होते. अहो काय सांगू तुम्हाला; स्वप्नपूर्तीच्या आनंदात मीच लिहिलेला लेख पुन्हा दोनदा वाचून काढलाय. आपले लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे निदान ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांच्यापर्यंत तरी पोहोचावेच असे प्रत्येक लेखकाला वाटत असते. मलाही ते वाटत होते. ते वाटणे आज सप्तरंग ने सार्थकी लावले. सप्तरंगच्या सात रंगांपैकी एक रंग होता आल्याचे आत्मिक समाधान खूप मोठं आहे जे आज मला अनुभवायला मिळाले.

आजचा हा लेख तुम्ही तर वाचाच पण  घरातील आई वडील आणि आज्जी आजोबांनाही आवर्जून वाचायला द्या. कुणाला वाचता येत नसेल, डोळ्याने दिसत नसेल तर त्यांना वाचून दाखवा. त्यांच्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. बाकी वाचक म्हणून तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या नवख्या लेखकाचा आत्मविश्वास वाढवत आला आहात. त्यातच आज माझ्या लिखाणाचा 'स'काळ 'स'प्तरंगने केलेला 'स'म्राट 'स'न्मान अती प्रचंड बळ वाढवणारा ठरलाय. धन्यवाद टिम सप्तरंग आणि सम्राट फडणीस सर.

विशाल गरड
दिनांक : २६ सप्टेंबर २०२१

Thursday, September 23, 2021

मातीच्या सैतानांनो

सोयीनुसार सोयाबीन घेतात
भाव पाडतात वेगाने
सोयीनुसार तेल गाळतात
मग भाव चढवतात वेगाने

मातीतल्याची किंमत नाही
तिथं कारखान्यात किंमत वाढते
माऊली रानातली इथं
अश्रू पुसत पीक काढते

मातीच्या सैतानांनो
मतांची तरी जाण ठेवा
रगात आटवून शेत पोसलंय
त्याचा तरी मान ठेवा

विशाल गरड
दिनांक : २३ सप्टेंबर २०२१

Saturday, September 18, 2021

बायको

लग्ना आधीच्या स्वप्नात तू
मामाने फोडलेल्या सुपारीत तू
साखरपुड्याच्या साखरेत तू
लग्नाच्या मुंडावळीत तू

चुलीतल्या निखाऱ्यात तू
गॅसच्या फ्लेममध्ये तू
तू भाकरीत, तू भाजीत
तू चपातीत, तू भातात

घरातल्या केरसुनीत तू
तुळशीच्या पानात तू
ओट्यावरच्या रांगोळीत तू
देव्हाऱ्यातल्या करंडात तू

प्रेम ऊतू आलं तर ह्रदयात तू
भांडण झाले तर डोक्यात तू
आपल्या लेकरात तू
त्याच्या हसण्या रडण्यात तू

संसाराच्या प्रत्येक आनंदात तू
सुखात तू, दुःखात तू
तारुण्यात तू, उतारवयात तू
म्हातारपणाच्या काठीत तू

तू आहे म्हणून मी
मी आहे म्हणून तू 
आणि आपण आहोत म्हणून ती

विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२१

प्रिय विरा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

Friday, September 3, 2021

सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

एका कुटुंबात जी जबाबदारी एक बाप पार पाडत असतो तीच जबाबदारी सोनवणे सरांनी आजवर आमच्या संकल्प परिवारात पार पाडली आहे. अनुदानित संस्थांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात विनाअनुदानित संस्थांना अनंत अडचणी आल्या, आर्थिक संकटे कोसळली पण त्या सगळ्या संकटांचा भार सरांनी स्वतःच्या खांद्यावर पेलला आणि आम्हाला संरक्षित केले.

विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना फॅमिलीवाली फीलिंग देणारा हा माणूस टिपिकल संस्थाध्यक्षांच्या व्याख्येला छेद देणारा आहे. शे पाचशे लोकवस्तीच्या खेडेगावात राहणारी, अतिशय बिकट परिस्थितीतुन शिकायला आलेली पोरं आज देशातील सर्वात मानाचे समजल्या जाणाऱ्या एम्स मेडिकल कॉलेज मध्ये शिकायल्याने संस्था उभारण्यामागचा सरांचा खरा हेतू पूर्णत्वास जात आहे.

प्रिय सर, तुम्ही आज एकसष्ठीत पदार्पण करत आहात त्यामुळे तुमचे वय आकड्यांमध्ये मोजता येईलही कदाचित पण सोनवणे कॉलेजच्या माध्यमातून गोरगरिबांची लेकरं नामांकित शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातुन डॉक्टर, इंजिनिअर करून तुम्ही जो त्यांचा उद्धार केलाय हे त्यांच्या कित्येक पिढ्यांनी लक्ष्यात ठेवण्यासारखं काम आहे ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.

सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माझी वाटचाल दशकपूर्तीकडे होत आहे. माझी प्रबोधनाची मशाल केवळ सरांच्या पाठबळामुळे तेवत राहिली. भविष्यात अजून खूप मोठे कार्य उभा करायचे आहे त्यासाठी सरांना दिर्घायुष्य मिळावे हेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. 

प्रा.विशाल गरड
डॉ.चंद्रभानू सोनवणे क.महाविद्यालय, उक्कडगाव

फोटोआर्टीओ

फोटोग्राफीला फक्त व्यवसायापूरते मर्यादित न ठेवता या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवणारे 'फोटोआर्टीओ' स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संस्थापक द ग्रेट आर्टिस्ट सचिन भोर यांची आज सदिच्छा भेट झाली.

माझे अमेरिकास्थित प्रिय मित्र महेश भोर यांच्याकडून सचिनदादा बद्दल मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा पासूनच मला त्यांना भेटायची ओढ लागलेली आणि सचिन दादांना ही मला भेटायची ओढ लागलेली. एकमेकांच्या फेसबुक टाईमलाईनला रोज भेट देणारे आम्ही आज मात्र प्रत्यक्ष भेटलोत. दिड तासाच्या भेटीत दोघेही समृद्ध झालो. किती गप्पा माराव्या, किती किस्से सांगावे आणि किती आठवणी सांगाव्या असे झाले होते. आमच्या दोघांच्या विचारांची एकरूपता एवढी होती की बोलताना जणू आम्ही दोघे एकमेकांना आरशात पाहत आहोत असे वाटायचे. प्रियदर्शनी वहिनी सुद्धा सचिन दादाला खांद्याला खांदा लावून साथ देतात. मुलगा जैत्र बालवयातच कॅमेरा हाताळतोय हे पाहून कौतुक वाटले.

फोटोग्राफी बद्दलची दादाची भावना एवढी नितळ, शुद्ध आणि पवित्र आहे की इतक्या खोलवर कुणी विचार करू शकते याचे आश्चर्य वाटले. लहानपणी कला शिक्षक असलेल्या वडिलांच्या बोटाला धरून त्यांना त्यांच्या कलाकुसरीत मदत करता करता सचिनचा प्रवास आज फोटोग्राफीतला तेंडुलकर बनण्याएवढा अभिमानास्पद झालाय. त्यांच्या स्टुडिओत बसलो की आपण एका वेगळ्या दुनियेत असल्याची जाणीव होते. भिंतीवर असलेली प्रत्येक फ्रेम त्यांच्यातल्या टॅलेंटची साक्ष देते. फोटोग्राफी म्हणजे फक्त कॅमेऱ्याचे बटन दाबण्यापूर्ती मर्यादित नसून त्या मागे खूप मोठे शास्त्र आहे, अभ्यास आहे जे सर्वदूर वाहू देण्यासाठीच सचिन दादाने स्कुलची स्थापना केलीये तसेच त्यांच्या 'रिस्पेक्ट' फाउंडेशनचे कार्य ऐकून हा व्यक्ती माणूस म्हणून किती ग्रेट आहे याची जाणीव झाली.

स्वतःला आरश्यात बघत बसण्यापेक्षा सचिन भोर यांनी काढलेल्या फोटोत बघताना जास्त आनंद मिळतो. सगळे कॅमेरे सारखेच फोटो टिपतात पण ते कॅमेरे ज्याच्या हातात असतात त्याने जर कॅमेऱ्याचा हट्ट पुरवला तर फोटोचे रूपांतर चित्रात व्हायला वेळ लागत नाही. आज खरंतर फोटोग्राफीच्या विद्यापीठालाच भेट देऊन आल्याची जाणीव गडद झाली. कॅमेऱ्याचा गर्भ समजून सांगणाऱ्या आणि नवोदित फोटोग्राफर्सवर छायाचित्रणाचा गर्भ संस्कार करणारा सचिन भोर नावाचा शिक्षक खरंच अफलातून वाटला. 'विवाह' स्टुडिओत केलेल्या माझ्या सन्मानाबद्दल विवाह फोटोग्राफीच्या सर्व टिमचे तसेच कौटुंबिक आदरातिथ्याबद्दल सचिन भोर आणि प्रियदर्शनी भोर यांचे मनापासून आभार.

विशाल गरड
दिनांक : २७ ऑगस्ट २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...