गावा गावातल्या पोरांमधी गौतमीची क्रेझ हितकी शिगंला पोहचल्याली हाय की पर्वा एक जण म्हणाला "चार म्हशी इकीन पण गौतमीला एकदा तरी गावात आणीनच." कसली ही हवा, कसलं हे येड, कसला ह्यो जलवा, आरं.. आरं..आरं.. जाळ धुर संगटच. अंगावर लावणीचा शृंगार चढवलाय खरा पण त्यातून बिभत्स रसच जास्त ओसंडून वाहतंय म्हणूनच कार्यक्रम बघून आलेली पोरं रात रात झोपणात. जे फकस्त मम्बईतल्या डान्स बारमदी बघाया मिळत व्हतं ती आज गौतमीमुळं खेडो पाड्यातील चौकात बघायला मिळायलंय. गर्दी मोक्कार जमती, पार चेंगराचेंगरी व्हायचा वकुत येतंय म्हणल्यावर स्पॉन्सरची पण मुरकंड पडायली. त्या डॉल्बीच्या साऊंडवर कोण नाचणार ? 'ना तुम्ही ना आम्ही तिथं फक्त गौतमी.'
सध्या बेरोजगारी इतकी भयानक टोकाला गेलीये की लग्नाचं नावबी काढलं तर नोकरी, जमीन, बंगला असल्याशिवाय स्थळं येईनात. अशात गावागावात पंचवीशी, तिशीतल्या पोरांच्या फौजा तयार झाल्यात. काही आहेत विचारी, इमानी, कष्टाळू, होतकरू पण काही आहेत बापाच्या आणि नेत्याच्या जीवावर एंटरटेनमेंटची भूक भागवणारे. गौतमीनं चार भिताडाच्या आतला डान्सबार रस्त्यावर आणला. तिच्या शृंगाराला भुकेले जीव आंघोळीचे पाणी तिर्थ म्हणून प्यायला सज्ज आहेत. आधीच किशोरवयीन पोरांना मोबाइलने पॉर्नोग्राफीच्या मगरमिठीत वेढले असतानाच जर आता लावणी सारख्या नृत्याची आणि पोशाखाची मोडतोड करून त्यातून अश्लील हावभाव आणि अंगप्रदर्शनाचा खेळ खुलेआम होणार असेल तर सुसंस्कृत महाराष्ट्राला हे अभिमानानं मिरवण्यासारखं नक्कीच नाही.
तिचं ते केस उडवनं, अंगावर बाटली ओतून घेणं, पदर काढून तो आभाळात भिरकावणं, हात आणि डोळ्याचा वापर करून बिभत्स हावभाव करणं हे सोडून तिच्या नृत्यातला बाकीचा भाग कौतुकास्पद आहे. तिची अदाकारी, तिची डेरिंग, सौंदर्य अफाट आहे. सध्या ती बंदुकीतल्या गोळीच्या वेगाने गाजतेय पण जर वेळीच तिला योग्य दिशा नाही मिळाली तर या क्षेत्रातलं अमरत्व तिच्या वाट्याला येणार नाही. चेहऱ्यावर थोडया सुरकुत्या पडल्या की खेळ आपसूकच गुंडाळला जाईल. मी काही कधी गौतमीच्या शोला गेलो नाही पण मोबाईलवर सहज जरी फेसबुक इन्स्टाचे रील बघत बसलो तरी त्यात पाच पन्नास रिल्स गौतमीचंच दिसत्यात म्हणून मग व्यक्त व्हावं वाटलं.
इथं नाचणारी गुन्हेगार, का तिच्या सोबत नाचणारे गुन्हेगार, का तिला नाचायला बोलावणारे गुन्हेगार आहेत ? माहीत नाही. पण ज्या राजाने त्यांच्या दरबारात असे नाच गाण्याचे शौक फर्मावले नाहीत त्याच राजाच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या राज्यात आयोजित होत असलेले हे शौक महापुरुषांच्या विचारांना छेद देणारे आहेत. उद्या यातल्या काही पैशाने गबरगंड असलेल्या तथाकथित अनुयायांनी जयंत्यांना वगैरे असे कार्यक्रम आयोजित करू नये म्हणजे मिळवले.
डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा करंट नेमका कुठं लागतोय त्याने कोणता अवयव सुखावतो किंवा बावचळतो यावर त्या कलेचे परीक्षण होऊ शकते. हे जर चार भिंतींच्या आत होत असलं असतं तर लिहिण्याचं काही कारण नव्हतं पण हे सार्वजनिक स्थळी घडतंय म्हणून सार्वजनिक लिहावं लागतंय. बाकी पटलं तर घ्या नाहीतर वाचून सोडून द्या. गौतमीला शुभेच्छा.
विशाल गरड
१८ नोव्हेंबर २०२२, पांगरी