Wednesday, November 2, 2022

आरं आरं महादेव

हेडिंग वाचून कसंसं वाटलं ना, पण मी 'हर हर महादेव' पाहिल्यानंतर माझ्याही तोंडून हेच शब्द निघाले "आरं.. आरं.. महादेवा, माझ्या राजाच्या इतिहासाचं हे काय करून ठेवलंय यांनी" शिवकालीन मावळे खूप अस्सल लढले ओ पण या कमर्शिअल फिल्मच्या जमान्यात अलिकडील काही दिग्दर्शकांनी त्या मावळ्यांना पार अवेंजर्सचे रूप दिलंय. हर हर महादेव चित्रपटातल्या घोडखिंडीत झालेल्या लढाईत तर जेव्हा एक गनीम हातोडा हातात घेऊन येताना दिसला तेव्हा तर मी डोक्यालाच हात लावला. स्क्रिप्ट लिहिताना लेखकाच्या मागे काय त्या थायनॉसचं भूत लागलं होतं की काय ? का झोपताना हॉलीवूडचा रॉंग टर्न पिक्चर बघितला होता म्हणून शेवटी गनीम कमरेतून कापलेला वगैरे दाखवलाय. अरे एवढीच खुमखुमी होती हॉलिवूडचा टच द्यायची तर मग एखादे काल्पनिक पात्र रंगवायचेना, त्यासाठी ज्यांचा इतिहास आणि पराक्रम फक्त इथल्या मातीच्या कनांवरच नाही तर प्रत्येक मराठ्यांच्या मनामनांवर रुजला आहे त्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच अशा कलाकृती का ? 

अबे फायटिंग आणि युद्ध यात फरक असतो रे हे का नाही लक्ष्यात येत. आणि बाजीप्रभूंनी 'खिंड' लढवली होती 'दरी' नाही. बिग बजेट चित्रपट असतानाही खापटाची दरी उभारून त्यात पाच सहा ट्रॅक्टर वाळू ओतून त्यावर शूटिंग केलीये हे लैच नाट्यमय वाटतंय. दुसरं महत्वाचं म्हणजे मराठा हा शब्द मराठीला सिनिअर आहे. मुळात मराठा शब्दाची व्याप्ती शिवकाळात एवढी मोठी होती की त्यात मुसलमान सुद्धा गणले जायचे. मुळात तो एक समूहवाचक शब्द होता त्याचे जातीत रूपांतर अलीकडे झाले हे ध्यानात घ्या. पण महाराजांची भूमिका साकारणाऱ्या नटाच्या तोंडून 'मराठा' शब्दाला 'मराठी'ने रिप्लेस करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं होतं ? 

शस्त्र तयार करणाऱ्या लोहाराकडे महाराज संन्याशाच्या पेहरावात जायचे काय ? अफजल्याने महाराजांच्या डोक्यात कट्यार घुसवली होती काय ? शिवछत्रपतींचे डोळे, नाक, कान, दाढी मिशा याबद्दल सविस्तर वर्णन उपलब्ध असताना त्यांच्या जवळपासही न दिसणाऱ्या नटाला ही भूमिका देण्यामागची काय बरे मजबुरी असावी ? अहो आम्ही चार दोन पुस्तकं वाचलीत म्हणून एवढे तरी विचारतोय पण ज्यांना महाराजांचा इतिहास माहित नाही त्या परभाषिक लोकांवर तुम्ही चित्रपटातुन छापलेलं आता कसं पुसायचं ? का तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही कायपण करत बसायचं ?

महाराजांच्या गळ्यात जशी कवड्याची माळ तसेच कपाळी चंद्रकोर आणि शिवगंध असायचा चित्रपटात मात्र महाराजांच्या कपाळी फक्त एक नामाटी दाखवली. बाजीप्रभूंची भूमिका साकारलेल्या नटाचे डायलॉग पाठ केल्यासारखे वाटतात. काही सिन गडावर शूट केल्याने त्यात जिवंतपणा आलाय. सिनेमॅटोग्राफी आणि बिजीएम उत्तम झालंय. उपभूमीका साकारणारी सगळीच पात्र सपकल बसली आहेत त्यांची वेशभूषा आणि अभिनयही तितकाच सरस झालाय त्या सर्वांचे कौतुक पण मुख्य भूमिका साकारणारी पात्रच गंडली आहेत हे दुर्दैव.

बाजीप्रभूंच्या पराक्रमाला हर हर महादेवच्या तुलनेत पावनखिंड चित्रपटात बऱ्यापैकी न्याय दिलाय. हर हर महादेवच्या लास्ट फ्रेम पेक्षा पावनखिंड चित्रपटात दगडाला टेकून निपचित पडलेले बाजीप्रभूंची फ्रेम आणि त्यामागे हळुवारपणे उमटणारे  'श्वासात राजं रं.. ध्यासात राजं' हे बीजीएम हजार पटीने सुंदर वाटतं. इथे मला तुलना अजिबात करायची नाही पण एक श्रोता म्हणून जे अनुभवलं ते जसंच्या तसं इथं लिहावं वाटलं म्हणून ती आपसूकच झाली.

मुळात चुका दाखवण्याचा माझा स्वभाव नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना त्याच्या काय गर्भकळा असतात, किती टिम एफर्ट असतो, शूटिंग, एडिटिंग करताना किती कष्ट असतं हे मी जाणतो म्हणूनच मी कधी फारसं निगेटिव्ह लिहितही नाही. पण इथे विषय शिवछत्रपतींचा असल्याने त्यांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यात आपल्या सोयीने डायलॉग घुसवणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच विरोध झाला पाहिजे म्हणून एक शिवभक्त या नात्याने माझा हा लेखप्रपंच.

आता लगेच माझा हा लेख वाचून खरंच असं झालंय का हे बघण्यासाठी थेटरात जाऊन हा चित्रपट पाहू नका. मग यावर तुम्ही म्हणाल "आम्हाला सांगताय मग तुम्ही का पाहिला ?" तर  मीही पाहणार नव्हतोच पण आमच्या काही मित्रमंडळींनी यात भूमिका साकारल्याने त्यांच्या खातर मी हा सिनेमा पाहायला गेलो पण पाहून आल्यावर माझ्या मेंदूवर शिवरायांच्या विचारांचा पगडा असल्याने माझ्यातल्या लेखकाला जणू त्यांनीच आदेश दिला आणि हे समदं हितं टायपिलं गेलं. फिरू द्या आता हे आपल्या स्वराज्यात.

विशाल गरड
२ नोव्हेंबर २०२२, पांगरी

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...