Thursday, January 19, 2023

अमेरिकेचा दोस्त

खूप वर्षांनी अमेरिकेहून भारतात आल्यावर कुणाच्यातरी बकेट लिस्ट मध्ये आपल्याला घरी येऊन भेटणे असावे हे केवढे अहो भाग्य म्हणावे; जे माझ्या पदरी पडले. अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळाचे सदस्य आणि सध्या अमेरिकेचे नागरिक असलेले राहुल गरड यांनी माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली सोबत त्यांनी माझ्यासाठी एक स्वेटर, विरासाठी काही परफ्यूम आणि साऊसाठी चॉकलेट्स भेट म्हणून आणले.


आमचं आडनाव जरी सेम असलं तरी अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी फेसबुकमुळे राहुल माझ्यासोबत जोडले गेले. माझ्या लिखाणावर आणि व्याख्यानावर त्यांचे खूपच प्रेम यातूनच फेसबुकवर फॉलो करण्यापासून सुरू झालेला मैत्रीचा प्रवास आजच्या प्रत्यक्ष भेटीने पूर्ण झाला. राहुलजी घरी आल्यापासून सलग दोन तीन तास आमच्या गप्पा सुरु होत्या. पंख फुटलेल्या नव पाखराला जणू हवेत सोडावे आणि त्याने दिसेल तिकडे मनसोक्त विहार करावा असाच आमच्या गप्पांचा फड सुद्धा दाहीदिशा फिरून आला. आम्ही एकमेकांनी एकमेकांना विचारलेल्या प्रश्नांतुन मिळालेल्या उत्तरातून दोघेही समृद्ध झालो.


राहुल अतिशय प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार मनाचे गृहस्थ वाटले. ऑनलाइन भेटत असलेली माणसे ऑफलाइन भेटल्यावर ती आपल्या आयुष्यातील इनलाईन फ्रेंड होऊन जातात. आज राहुलजींचे तसेच झाले. अमेरिकेत माझे भरपूर मित्र आहेत पण त्यातले जिवलग म्हणावे असे मोजकेच आहेत त्या यादीत आज राहुलजींचा समावेश झाला आणि सोबत त्यांच्यामुळे महेश भोर यांचाही. माझे अमेरिकेत ऑनलाइन व्याख्यान झाल्यापासून ही जोडगोळी विशेष संपर्कात आली होती आज ती एकदम खास होऊन गेली.


राहुलची आणि माझी ही जरी पहिलीच भेट असली तरी जणू "पुराणे बिछडे हुए दोस्त बोहोत सालो बाद मिले" असाच फिल आमच्या भेटीत जाणवला. जाताना मी त्यांना माझ्या 'रायरी' कादंबरीसह इतर पुस्तकांची शिदोरी भेट दिली. सातासमुद्रापार असलेली ही माणसं शब्दाने जोडता आली याचे समाधान वाटतेय. प्रिय राहुल, आपण दिलेले प्रेम, आपुलकी आणि भेट सदैव स्मरणात राहील.


विशाल गरड

१९ जानेवारी २०२३, पांगरी





No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...