TDM हा सिनेमा एक्चुअली मला पहिल्या खेपेसच पहायचा होता पण माझ्या वेळेचे आणि शोचे टायमिंग जुळोस्तोर भाऊरावांनी शोला ब्रेकलावला आणि जेव्हा दुसऱ्यांदा पुनःप्रदर्शित झाला तेव्हा मेडिकल एमर्जन्सीमुळे पहिले दोन तीन दिवस नाही पाहता आला. अखेर कालच आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. नव्या बाळाला लस वगैरे देवून बापाचे प्रेम आणि कर्तव्य पार पाडून माझे चित्रपट प्रेम जोपासायला विराच्या परवानगीने दवाखाना सोडला. दोस्तांनी एवढ्या मेहनतीने निर्माण केलेली कलाकृती मिस होवू नये म्हणून घरी आल्या आल्या मी पहिले हनुमंतला बोलावून घेतले आणि रात्री नऊ ते बाराच्या शो साठी थेट बार्शीचे गोल्डन सिनेमॅक्स थिएटर गाठले. तिथे गेलो तर तिकीट काउंटरवर फक्त आम्ही दोघेच होतो. कॅशिअर म्हणले अजुन एक दोन जण आले तरच शो होईल नाहीतर रद्द करावा लागेल. घड्याळात सव्वा नऊ वाजले होते. एवढ्या वेळात वेळ काढून पांगरीवरून खास TDM बघायला आलो आणि आता जर नाही पाहायला मिळाला तर मग पुन्हा थिएटरला पाहायचा योग अशक्य वाटत होता म्हणून मी कॅशिअरला विनंती केली की आता कुणाची वाट नका बघू, मीच चार तिकिटे काढतो पण शो रद्द नका करू. त्यांनीही विनंती मान्य केली आणि फक्त आमच्या दोघांसाठी गोल्डन सिनेमॅक्सने शोसुरु केला.
चित्रपटाची सुरुवात शिवरायांची गाथा गाणाऱ्या पिंगळ्या पासून होते त्यांनतर स्क्रिनवर येतो ग्रामीण तरुणांचे प्रतिनिधित्व करणारा सिक्स पॅकवाला हिरो बाबू. तो आंघोळ करताना पाणी जरी त्याच्या अंगावरून ओघळत असले तरी ते वास्तवात मात्र आपल्या मनावर चढलेला गेल्या वीस वर्षांचा काळ पुसून आपल्याला थेट नव्वदीच्या दशकात १९९५-९६ सालात घेवून जाते. तिथ पासून ते शेवटपर्यंत एकही क्षण आपण तो नव्वदीचा एरा सोडत नाहीत इतक्याकमालीचे कलादिग्दर्शन आमच्या अतुल लोखंडेनी केलंय. १९८५ ते १९९० दरम्यान जन्मलेल्या ग्रामीण भागातील प्रत्येक युवक युवतीने अनुभवलेला काळ TDM पाहताना अक्षरशः पुन्हा जगायला मिळतो. पॅरेगॉन चप्पलचा अंगठा बसवने, ब्लेडने वर्तमान पत्रातील हिरॉईनची कात्रणे कापणे, कॅसेट मधला रिल हाताच्या बोटाने फिरवणे, चिरगुटातल्या भाकरीला लागलेल्या मुंग्या, पायातला कुरूप झालेला काटा काढताना मेणाला दिलेला चटका, थुका लावून सायकलचा वॉलचेक करणे, जखमेवर दगडी पाला लावणे, लग्नात कुरवला म्हणून मिरवणे, पत्रावळ्यावर जेवण करणे, हे सिन्स अतिप्रचंड नॉस्टलॅजीया आहेत.
निली कॉलेजला जाताना जेव्हा बाबू तिच्यावर झाड हलवुन पारिजातकाच्या फुलांचा अभिषेक करतो तेव्हा ती फुले आपल्या भूतकाळातल्या प्रितीवर पडतात आणि तेव्हाचा सुगंध आपसूकच थिएटरात दरवळू लागतो. पुढे बाबू निलीला पेढा देताना जेव्हा ट्रॅक्टर ऑटो स्पीडवर त्याच्या मागे मागे चालत असतो तेव्हा तो त्याच्या जीवलग मित्राची जागा भरुन काढतो. या सीनमध्ये दिग्दर्शक भाऊंनी चक्क ट्रक्टरला सुद्धा अभिनय करायला भाग पाडलाय. जुन्या प्रेमगीतांच्या आणि दिलवाले चित्रपटाच्या डायलॉगच्या साहाय्याने बाबूने नीलीवर लाईन मारतानाचा प्रत्येक शॉट जब्राट जमलाय. दोस्ता इंद्रभान, तुला तर लेका तू व्हिलन हायेस हे सांगायची गरजच नाय ठेवलीस इतका रॉ दिसला आहेस हातात खोऱ्याचा दांडा घेवून येताना. विनायक पवारांची गीतं, ओंकारस्वरूप आणि नंदेशजींचा आवाज, विरधवलची सिनेमॅटोग्राफी आणि संकेतची एडीटींग या सगळ्यांनी TDM ला कसं एकदम वजनात ठेवलंय. मुख्यकलाकारांसह सर्व सहकलाकारांनीसुद्धा बाप अभिनय केलाय.
चित्रपटात किंचितही अंगप्रदर्शन नसताना कालिंदीचे सौंदर्य पडदा व्यापून टाकते त्यात भरीस भर म्हणून खंडोबाच्या देवळात जेव्हा ती निळ्या साडीवर नाचते तेव्हा बानू आणि म्हाळसालाही तिचा हेवा वाटेल इतकी ती मोहक दिसते. तसंच विहिरीत होल घेताना गावाकडच्या गरीब घरात चटणी भाकरीवर पोसलेला आमच्या पृथ्वीची सिक्स पॅकची स्टील बॉडी ब्रुसलीची आठवण करुनदिल्याशिवाय राहत नाही. दिग्दर्शकाची भूमिका सांभाळता सांभाळता भाऊरावांनी सुद्धा प्रत्येक गावातल्या राजकारणात असलेल्या एका आगलावी माणसाची भूमिका सोसायटीच्या मेंबरच्या माध्यमातुन अतिशय उत्तम वठवली आहे. गाव पातळीवरचे राजकारण आणि निवडणुकांसह
ग्रामीण संस्कृती आणि परंपरांचे अप्रतिम वर्णन करण्यात ते यशस्वी झालेत. फक्त शेवटी एकच खंत वाटते की TDM चा दोन भागाचा जर एकच भाग करुन बाबूचा टॉप गिअरपण याच भागात दाखवता आला असता तर भारी झालं असतं. बाकी TDM बद्दल अजुन बरंच काही सांगण्यासारखं आहे ते भाऊंना आणि टिमला निवांत भेटून सांगेन.`आयुष्याची लढाई पळून नाही जिंकता येत’ पिच्चरमधला हा डायलॉग भाऊरावांनी TDM च्या माध्यमातुन खरा करुन दाखवला त्याबद्दल त्यांचे कौतुक.
TDM अजुन दोन दिवस थिएटर मधे असेल म्हणून पिच्चरवरुण घरी आल्या आल्या रात्री १२:३० ते २:०० हे लिहीत बसलो होतो जेणेकरुन उरलेल्यांनी तरी तो पाहावा. काळाच्या पोटात गुडूप झालेल्या जुन्या आठवणी पुन्हा अनुभवण्यासाठी TDM ची OTT वर येण्याची वाट न बघता तो थिएटरात जाऊन नक्की बघा. आजवर सामान्य माणसेच अभिनेत्यांना स्टार आणि सुपरस्टार करीत आली आहेत मग त्याच सामन्यातून आलेल्या पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्तानेचा सुद्धा स्टार होण्याचा हक्क आहेच. दोस्तांनो, कमाल काम केलंय तुम्ही. खरंच आज रात्री जर मला TDM पाहायला मिळाला नसता तर आपल्याच दोस्तांनी तयार केलेल्या एका सुंदर कलाकृतीला मी मुकलो असतो त्याबद्दल गोल्डन सिनेमॅक्सचे संचालक श्री.गाढवे आणि थिएटरचे कर्मचारी कृष्णा, सूरज व संतोषचेमनापासून आभार आणि हा सोबतचा फोटो क्लिक केल्याबद्दल हनुमंतला धन्यवाद.
प्रा.विशाल गरड
१३ जून २०२३, पांगरी