६ जून १६७४ हा दिस उजाडला, ह्यच्या आधी कितिंदातरी गड चढला पण आज मातर त्योच रस्ता स्वर्गात चालल्यावणी वाटत व्हता. सुर्याची किरणं गडावर पाडायच्या आधीच भल्या पहाटं स्वराज्याचा सार्वभौम राजा व्हण्यासाठी शिवाजी महाराजांनी डोळं उघडलं. गागाभट्ट आन् प्रधांनांनी जवा भारतातल्या समद्या नद्यांच्या पाण्याचा आभिषेक महाराजांच्या डोक्यावर सुरु केला तवा राजियांच्या अंगावून ते पाणी आमृत बनून वाहू लागलं. महाराजांनी आपलं राज्य किती श्रीमंत केलं ह्ये त्यांनी आज केलेल्या दान धर्मावरून समजलं. लाखो आया बहिणींचं कुंकू वाचिवणाऱ्या त्या राजाची पंचारती ववाळताना सोळा सवाष्णींचा ऊर भरुन आला. महाराजांच्या रूपानं आता स्वराज्यावर संरक्षणाचं कवच कायमस्वरूपी धरलं गेलं. शाही कापडावर जडजवाहर, माणिक मोती, हिऱ्यांचं अलंकार घालून जवा महाराजांच्या डोक्यावर राज मुकुट बशिवला तवा आपल्या राजाचं सौंदर्य बघून देवाला बघायची भूक मेली. जवा राजं सिंहासनाजवळ येवून उभारलं तवा तर समदा जीव डोळ्यात यिऊन थांबला. समदं मंत्रोच्चार झाल्यावर गागा भट्टांनी त्यांच्या शिरपेचात मोत्याची झालर ठिवत `शिवछत्रपती’ म्हणून जयघोष केला की मग आम्हीबी बेंबीच्या देठापासून हाय हितक्या ताकदीनं `राजा शिवछत्रपती की जय’ म्हणलाव. नगारखाण्यात नौबती झडल्या, तोफांचा आवाज झाला, महाराज बत्तीस मणाच्या सुवर्णसिंहासनावर आरुढ झालं आन ह्यो सुवर्णक्षण बघून आमच्या कोटी कोटी कुळांचा उद्धार झाला. राज्याभिषेकानंतर जवा महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी राजदरबाराबाहेर पडलं तवा आम्हीबी त्येंच्या म्हागं म्हागं गर्दीतून वाट काढत काढत निघालाव हितक्यात माझ्या कानावर विराचा आवाज आला `अहो, साऊला तहान लागली, तो तांब्या घ्या हिकडं पाण्याचा’ त्या क्षणी मी झोपेतून जागा झालो आन् पाहतो तर काय साऊ आणि विरा उठून माझ्याकडे बघत बसल्या व्हत्या. म्या घड्याळात बघितलं तवा पहाटेच्या चार वाजल्या व्हत्या. मग साऊला पाणी दिऊन मी लगीच पुन्ह्यांदा झुपी गेलो पुन्हा सपान पडलं तर आता जगदीश्वर मंदिरापसून हत्तीवरुन निघणारी महाराजांची शोभायात्रा दिसंल याआशेनं.
विशाल गरड
६ जून २०२३, पांगरी
आपण यावर कितींदा आपले विचार मांडले आहेत हे अकल्पनीय आहे यावर म्हणावे तितकेच खरे आहे शिवराज्यभिषेक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना जय महाराष्ट्र
ReplyDeleteवाचून अंगावर शहारे आले.
ReplyDeleteबरं झालं असत राज, आलो असतो तुमच्याच काळी जन्माला.
धन्य धन्य झालो असतो, रोज माथा टेकवून तुमच्या चरणाला.