मुलगी नको या विचाराच्या खोलवर जाऊन त्याची दुसरी बाजू मांडण्याचा एक धाडसी प्रयत्न.
मुलगा मुलीकडे नांदायला आला तर ? आयुष्यभर मुलीने नवऱ्याऐवजी बापाचेच नाव लावले तर ? मातृसत्ताक कुटुंब पद्धती पुन्हा सुरूझाली तर ? लग्न करण्यासाठी मुलांनी मुलींना हुंडा दिला तर ? मुली स्वतः कमावत्या झाल्या तर ? मुलीला नवऱ्याच्या प्रॉपर्टी ऐवजी बापाच्याच प्रॉपर्टीतला हिस्सा मिळाला तर ? मुलीला शिकवून तिला नोकरी लागल्यावर तिच्या पगारावर तिच्या बापाचाच हक्क राहिलातर ? आई वडिलांच्या वार्धक्याचा सांभाळ मुलीनेच केला तर ? म्हातारपणाची काठी म्हणून मुलीचाच उल्लेख झाला तर ? वंशाच्या पणतीलाच दिव्याचे स्थान दिले तर ?
समाज म्हणून जर आपण हे सगळं बदलू शकलो तर घराघरात मुलींचे स्वागत अभिमानाने होईल. मुलगी नकोच ही मानसिकता मुळासकट संपून जाईल. मुलगा होण्याची वाट न बघता सर्वसामान्य घरातील लोकं सुद्धा एका मुलीवर ऑपरेशन करतील. हळू हळू समाजाची पाऊले त्या दिशेने वळायली आहेत हे ही नसे थोडके.
आपल्या आई वडिलांच्या काळात सर्रास चार पाच अपत्य असायची त्यात नैसर्गिकरित्याच काही मुले तर काही मुली व्हायच्या. सगळ्यांना मावश्या, मामा असायचे पण दोन अपत्याचा कायदा झाल्याने आता प्रत्येकाला दोनच चान्स असतात त्यात ज्याला पहिला मुलगा होतो त्याला दुसऱ्या वेळेस मुलगी होण्याची इच्छा असते तर पहिली मुलगी झालेल्यांना दुसरा मुलगा होण्याची इच्छा असते. बहुतांशी दांपत्य एक मुलगा, एक मुलगी हे प्रमाण, जमले तर नैसर्गिकरित्या किंवा मग गर्भलिंगनिदान करून मेंटेन ठेवतात. यात प्रत्येकाची झाकली मुठ सव्वा लाखाची असते.
सलग दोन किंवा तीन मुली झालेल्यांना मात्र आयुष्यभर मुलगा नसल्याची सल मनात ठेवून जगावं लागतं. अर्थात ही सल समाजव्यवस्थेने निर्माण केलेली असते. यातही समाजापेक्षा वेगळा विचार करून फक्त मुलीला जन्म देवून समाधानी राहणारे खरे समाजसुधारक ठरतात.
वरवर कितीही मुलगा मुलगी समानतेच्या गप्पा मारल्या तरी मुळाशी मात्र प्रचंड असमानता आहे हे मान्यच करावे लागेल. आपल्या सभोवताली जेव्हा स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना घडतात तेव्हा फक्त तो निर्णय घेणारे पालकच नाही तर समाज सुद्धा तितकाच जबाबदार असतो. जसं आत्महत्या करणारा आमक्या तमक्याने प्रवृत्त केलं म्हणून आत्महत्या करतोय असे लिहून ठेवतो तसं जर उद्या स्त्री भ्रूणहत्त्या करणाऱ्या जोडप्याने समाजाने प्रवृत्त केलं असं म्हणलं तर ?
विशाल गरड
३० जुलै २०२३, पांगरी