लेखक असणाऱ्या माणसाच्या देहात अनेक व्यक्ती वास्तव्य करीत असतात. तो एकाच जन्मात अनेक आयुष्य अनुभवतो. त्याच्यातल्या मूळ व्यक्तिवर त्याच्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा, नातेवाईकांचा पगडा असू शकतो पण त्याच्यातल्याच इतर अभिव्यक्ती मात्र वाऱ्यासारख्या असतात ज्याला कुणीच वेसण घालू शकत नाही. देह आईच्या पोटात तयार झाला तरी लेखकाचे मन मात्र मेंदूच्या गर्भात त्याच्या वाचनातून, चिंतनातून जन्माला आलेलं असतं. कधी कधी एखाद्या व्यक्तीतला लेखक जेव्हा उत्स्फूर्तपणे व्यक्त होतो तेव्हा त्याच्या मताशी त्याच्यातलाच मूळ व्यक्तीही सहमत असेलच असे नाही. एखादा विचार किंवा काव्य जन्माला घालताना त्या व्यक्तीतल्या लेखकाने मेंदू आणि हातांचा फक्त साधन म्हणून उपयोग करून घेतलेला असतो.
कधी कधी शब्दांमधे इतका बारुद भरलेला असतो की कुणाच्यातरी बंदुकीतल्या गोळीवरही त्या लेखकाचे नाव लिहिले जाते पण प्रत्यक्षात मात्र ती गोळी देहरूपी लेखकाला मारते पण त्याचा विचार मात्र शब्दरुपी आत्म्याच्या माध्यमातून अजरामर होवून फिरत राहतोच. म्हणूनच सशस्त्र सैनिकांचे दले सांभाळणाऱ्या सारस्वतापेक्षाही शब्दांचे सामर्थ्य असणारे योद्धेच अधिक प्रभावशाली असतात. ज्यांना लिखाण सुचत नाही कवितेची एक ओळ स्फुरत नाही त्यांना मी मांडलेला हा विचार समजून घ्यायला स्वतःमधील लेखक आणि कवीला जन्माला घालावे लागेल. मनुष्य देह चौसष्ठ कलांचा अधिपती होवू शकतो त्यासाठीचे अदृश्य शुक्राणू जन्मतः प्रत्येकात असतात गरज असते ती फक्त तेवढ्या ताकदीची कुस निर्माण करण्याची.
माझ्या एका शरीरात अनेक व्यक्ती वास्तव्य करतात अर्थात मी प्रयत्नपूर्वक त्यांना जन्माला घातलंय. एकाच घरात राहून, एकाच आईच्या पोटात जन्माला येवून सुद्धा जसे लेकरांचे वेगवेगळे विचार असू शकतात तसेच आपण आपल्या शरीरात जागृत केलेल्या लेखकाचे, कवीचे, वक्त्याचे, चित्रकाराचे, दिग्दर्शकाचे असू शकतात. हे सगळे एखाद्या गोष्टीवर एकाच वेळी सहमत असतील असे नाही. त्या सर्वांचे पालक म्हणून त्यांनाही विचार स्वातंत्र्य देणे गरजेचेच असते आणि मी त्याचे समर्थन करतो. माझ्या लिखाणावर, कवितांवर, चित्रांवर आणि व्याख्यानांवर प्रेम करणाऱ्यांचा आणि द्वेष करणाऱ्यांचा मला अभिमान आहे. बाकी सोबतच्या फोटोचा आणि रावणाचा काहीएक संबंध नाही असलाच तर त्याच्यातल्या प्रतिभेशी असू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विशाल गरड
६ जुलै २०२३, पांगरी
मस्त
ReplyDelete