हा आहे माझा पांगरीचा मित्र राहुल. आज मुद्दामहून याची
कहाणी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. जर तुम्ही
कर्जबाजारी असाल, नैराश्यात असाल, डिप्रेशनमधे असाल
तर राहुलची स्टोरी तुम्हाला नक्किच प्रेरणा देईल. प्रतिकूल
परिस्थितीत इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला हा हुशार
पोरगा. सुरुवातीच्या कालखंडात पॉलिटेक्निक कॉलेजवर
प्राध्यापक म्हणून रुजू झाला आणि तिथूनच तो राहुलचा
बप्पी सर झाला. संघटन कौशल्य, मित्रांसाठी सदैव धावून
जाणाऱ्या त्याच्या स्वभावामुळे गावात त्याचा संपर्क
वाढला. त्यात गावच्या राजकारणातले युवा नेते पदाचे
ओझे अंगावर पडल्याने कॉलेजहून आला की गावातील
कार्यकर्त्यांबरोबर बसणं उठणं वाढलं. त्यात ‘नेते’ बिरुद
लागलं की चहाचे कँटीन असो, पान टपरी असो वा
जेवणाचा ढाबा जिकडं तिकडं पदर खिश्यात हात घातल्या
शिवाय कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. अल्पावधीत बप्पी
सरचे सोशियल स्टेट्स वाढल्याने ठीक ठिकाणी लाखांच्या
भिशा लावल्या गेल्या. त्यातच राहुलचे लग्न जमल्याने पाच
पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाने घराचे
बांधकाम काढले. खर्च वाढत गेल्याने मित्रांकडून उसणे
पासणे पैसे घेण्याची सुरुवात झाली. पुढे बप्पी सर फुल
टाईम गावकी करू लागला. गल्लीत आणि गावात
मिळणारी प्रतिष्ठा हळू हळू डोक्यातली जागा व्यापू
लागली यातच राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आणि होती
ती नोकरीही त्याने सोडली.
पैशाची आवक कमी झाली आणि जावक वाढली. पुढे
काय झाले असेल ते सांगायची गरज नाही. अवघ्या दोन
तीन वर्षात राहुलवर १५ लाखाचे कर्ज झाले. यातले
बहुतांशी पैसे हात ऊसने, भिशी आणि सावकारांकडून
घेतलेले त्यामुळे घेतलेल्या पैशाचे व्याज झपाझप वाढू
लागले. वेळेत पैसे परत करणे राहुलला शक्य नसल्याने तो
पुन्हा नोकरी शोधण्यासाठी पुण्याला गेला पण तिथेही
वसुलीसाठी त्याला फोन सुरु झाले. जर आपण केलेल्या
कर्जाची वसुली करायला लोक घरी गेले तर घरच्यांची
मानहानी होईल याची त्याला भीती वाटू लागली. त्याच्यावर
झालेल्या कर्जाबद्दल घरचेपण अनभिज्ञ होते. कर्ज काढून
शिकवलेल्या पोराने कमवायचे सोडून इतकं देणं करुन
ठेवल्याने घरचेही नाराज झाले. अखेर ९ नोव्हेंबर २०१७
रोजी राहुल त्याची शैक्षणिक कागदपत्रे घेवून अचानक
फरार झाला. दुसऱ्या दिवशीपासून त्याची शोधाशोध सुरु
झाली पण सगळे हतबल झाले. आपल्यामुळे घरच्यांना
झालेल्या त्रासाने राहुल प्रचंड मानसिक तणावात होता,
डिप्रेशनच्या शिखरावर बसलेल्या पोराच्या मनात जो
विचार येतो तोच राहुलच्याही आला. पुणे स्टेशनवर
रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा त्याने निर्णय
केला. आता येणाऱ्या गाडीसमोर तो स्वतःला झोकून
देणारंच होता इतक्यात शेवटचा एक विचार त्याच्या मनात
आला की “माझ्या मरणाने प्रश्र्न सुटेल का ? आई
वडिलांचे काय होईल ? माझे वैयक्तिक कर्ज त्यांना त्यांची
शेती विकून फेडावे लागेल ? पोराचे कर्ज काढून शिक्षण
पूर्ण केले आणि आता आपण मेल्यावर पुन्हा कर्ज फेडता
फेडता त्यांचे आयुष्य जाईल. माझ्या एकट्याच्या मरणाने
आई, वडील आणि भाऊ या तिघांना मरण यातना
देण्यापेक्षा जिद्दीने काहीतरी करुन दाखवून, झालेले कर्ज
फेडूनच गावात पाय ठेवीन तोपर्यंत मी सगळ्यांसाठी मेलो”
याच विचाराने त्याचे जीव द्यायला निघालेले ट्रॅकवरचे पाय
परत फिरले आणि दुसऱ्या क्षणी त्या ट्रॅकवर जी रेल्वे आली
त्यात बसून गाडी जाईल त्या दिशेने प्रवास करू लागले. ती
गाडी बेंगलोरला जाणारी होती. नवीन राज्य, नवीन शहर,
नवीन माणसं, नवी भाषा पण इथून पुढं त्यांच्यासोबतच
जगायचं हे त्याने निश्चित केले आणि तो तिथेच राहू
लागला. तोपर्यंत इकडे घरी त्याला शोधून शोधून सगळे
थकून गेले, महिना झाला, सहा महिने झाले, वर्ष सरले,
दोन वर्ष सरले तरी राहुलचा काहीच ठावठिकाणा लागला
नाही, काहींनी तर तो मेला असेल म्हणून सोडून दिले,
घरच्यांनाही आता आशा उरली नाही, आई देवाला नवस
करून थकली. शेतकरी असलेल्या वडिलांनी पोराचे पैसे
फेडण्यासाठी अहोरात्र कष्ट सुरू केले, आई दुसऱ्यांच्या
शेतात मजुरीला जाऊ लागली.
दरम्यानच्या काळात राहुलने बेंगलोरला गेल्यावर दुसऱ्याच
दिवशी जे.डब्लू.मेरिएट हॉटेलात सिक्युरिटी गार्डची नोकरी
मिळवली, दोन वेळेच्या जेवणाची सोय करीत त्याचा संघर्ष
सुरू झाला. अवघ्या काही महिन्यात राहुल कन्नड भाषा
शिकला त्यामुळे तेथील स्थानिक लोकांशी तो संवाद साधू
लागला. पुढे त्याने ट्रेनिंग इनचार्ज म्हणून बढती मिळवली
त्यानंतर तो वैशाला बिल्डर्सकडे सिक्युरिटी सुपरवायझर
म्हणून रुजू झाला, त्याचे काम पाहून त्यांनी इस्टेट मॅनेजर
पदी त्याची बढती केली आणि आता राहुल नोकरी करत
करत स्वतःचा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतोय. गेल्या
दोन वर्षात त्याने कष्टाने कमावलेली पै न पै साठवून ठेवली
आणि अखेर २० डिसेंबर २०१९ रोजी तो थेट त्याच्या
कोल्हापूर येथील आत्याच्या घरी अवतरला आणि राहुल
जिवंत आहे हे समजताच इकडे गावाकडे आईचा आनंद
गगनात मावेना. थेट घरी फोन करण्याची त्याची हिंमत
नसल्यानेच तो आधी आत्याकडे गेला. पुढे लगेच २४
डिसेंबर २०१९ रोजी राहुलला भेटायला त्याचे कुटुंबीय
पांगरीहून कोल्हापूरला आले. मायलेक कडकडून भेटले,
धाय मोकळून रडले. भेटीनंतर आईवडिलांनी त्याला गावी
येण्याचा अट्टहास केला पण “सगळ्यांचे पैसे परत
केल्याशिवाय मी गावात येणार नसल्याचे त्याने सांगितले”.
पुढील पाच सहा महिन्यांत राहुलने व्याजासह तब्बल २०
लाख रुपये फेडले आणि त्याने ठरवल्याप्रमाणे सर्वांचे कर्ज
फेडूनच दिनांक २० मार्च २०२० रोजी तब्बल अडीच वर्षांनी
त्याने पांगरीत पाऊल ठेवले.
सध्या राहुलच्या मदतीने त्याचा लहान भाऊ व वडिलांनी
कष्ट करून जे.सी.बी घेतलाय, सोबत ट्रॅक्टर, ट्रक अशी
वाहने त्याच्या दारात उभी आहेत. अडीच वर्षाच्या
कालखंडात बेंगलोर मधेच त्याने त्याची जोडीदार निवडून
प्रेमविवाह केला. आता त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे.
त्याचे नामकरण करण्याच्या निमित्ताने तो पांगरीला आला
होता तेव्हा माझ्या घरी येवून त्याने आवर्जून भेट घेतली. तो
असा अचानक निघून गेल्यामुळे मी सुद्धा त्याच्यावर नाराज
होतो पण बेंगलोर येथे शिकत असलेल्या माझ्या
आत्येभावाचा दुर्दैवी अपघात झाल्याने मला बेंगलोरला
जावे लागले आणि तिथे मला राहुल भेटला. त्याचा मुलगा
आजारी असतानाही तो माझ्या मदतीसाठी हॉस्पिटलमधे
सोबत थांबला. एकेदिवशी तिथल्या बॉटॅनिकल गार्डनमधे
गेल्यावर निवांतपणे राहुलने मला त्याची सगळी स्टोरी
सांगितली. माझ्या लेखणीतून कर्जबाजारी झालेल्या
दुसऱ्या कुणाचा तरी जीव वाचेल, कुणालातरी प्रेरणा
मिळेल याच हेतूने राहुलच्या परवानगीने त्याची ही स्टोरी मी
सार्वजनिक केली आहे.
पोरांनो,
गेलेला सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा पुन्हा मिळवता येतो
पण आपल्या मृत्यूनंतर आईवडिलांच्या उरातले दुःख या
जगात कुणीच वाटून घेवू शकत नाही. लोक सारं काही
विसरून तुम्हाला पुन्हा गळ्याशी लावतात फक्त तुटलेली
विश्वासार्हत पुन्हा कमवण्यासाठी लगेच मृत्यूला आलिंगन
देण्याऐवजी तुम्ही जिद्दीने उभा राहून कष्टाला आलिंगन देणे
जास्त गरजेचे असते. त्यासाठी राहुलचे उदाहरण सर्वांनाच
प्रेरणादाई आहे. प्राऊड ऑफ यू राहुल उर्फ बप्पी सर.
लेखक : विशाल गरड
२१ नोव्हेंबर २०२३, पांगरी.