माझे प्रिय व आदरणीय मित्र, हिंदवी परिवाराचे संस्थापक थोर शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेटे यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छाभेट दिली. ते येडेश्वरी अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी पांगरीला आले होते. दोन दिवसांपूर्वीच “विशाल, तुझ्या गावी येत आहे, कार्यक्रमाआधी मी आवर्जून तुझ्या घरी भेटायला येणार आहे” असे डॉक्टर साहेबांनी सांगितल्यापासूनच त्यांच्या भेटीची ओढ लागून राहिली होती. तशी आमची मैत्री फार जुनी. त्यात आम्ही दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे भोई असल्याने मैत्रीतला जिव्हाळा प्रचंड पण ऑनलाइन दाट संपर्कात असलो तरी अशा ऑफलाइन भेटी मात्र विरळच.
आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हापासून सर शिवचरित्रावर व्याख्याने देतात. डॉ.शिवरत्न शेटे हे आमच्या प्रबोधन क्षेत्रांतलं अग्रणी नाव आहे. आयुर्वेद शास्त्राची वैद्यकीय सेवा सांभाळत सांभाळत त्यांनी त्यांच्या अमोघ वाणीतून देशभर केलेला शिवचरित्राचा प्रसार अभिमानास्पद आहे. हिंदवी परिवाराच्या माध्यमातून पावनखिंड ते विशाळगड या मोहिमेमार्फत सरांनी अनेक युवकांचे मावळ्यात रूपांतर केलंय. अशा महान व्यक्तिमत्त्वाकडून पाठीवर थाप पाडून घेण्याइतपत कार्य माझ्याही हातून घडल्याचे आज समाधान वाटले. माझ्या मित्र परिवारात जेवढी युवकांची फौज आहे तेवढीच जुन्या जाणत्या शिवरत्न शेटे सरांसारख्या जेष्ठ मार्गदर्शक मित्रांचीही आहे. म्हणूनच इवल्याशा कालखंडात बलाढ्य कार्य उभा करण्याचे सामर्थ्य हा विशाल गरड ठेवतो.
विशाल गरड
१५ नोव्हेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment