अवघ्या पन्नास साठ वर्षांपूर्वीचे उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र आजघडीला उच्च नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झालंय. महागाई सर्वत्रच आभाळाला भिडलीये त्यातच आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रातली महागाई तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललीये. गुणवत्ताधारक विद्यार्थी असतानाही कर्ज काढून त्याच्या शिक्षणाची फी भरावी लागतीये. एकी काळचे शंभर एकर वाले मराठे अल्पभूधारक झालेत. नापिकी, दुष्काळ सतत पडणारा बाजार भाव त्यामुळे शेती भरवशाची राहिली नाही. घरात कोणी आजारी पडलं तरी शेत विकून हॉस्पिटलचे बिल द्यावं लागायलंय, शिक्षणासाठी शेत विकावं लागायलंय, कर्ज फेडण्यासाठी शेत विकावं लागायलंय, मुलीच्या लग्नासाठी शेत विकावं लागतंय. आता गरजवंत मराठ्यांकडे राहिलेत फक्त कोरडवाहू शेताचे तुकडे. कालचा घरंदाज शेतकरी आज शेतमजूर म्हणून दुसऱ्याकडे कामाला चाललाय. महसूल मधून हिशोब काढा; गरीब मराठ्यांच्या जमिनी कुणी विकत घेतल्यात, उत्तरात बडे नोकरदार आणि व्यावसायिक जास्त आढळतील.
शिकूनही जर नोकरी लागणारच नसेल तर मग शिकून तरी काय उपयोग अशी मानसिकता युवकांची होत आहे. मान्य आहे आरक्षण मिळाले तरी काय सर्वांनाच नोकरी नाही लागणार पण शिक्षणातील आरक्षणामुळे निदान उच्च शिक्षणाचा खर्च तरी कमी होईल. आपल्यासाठी हक्काचं काहीतरी आहे ही भावना देखील शिकायला बळ देईल. पोटासाठीच्या दोन घासांची सोय करायला अजूनही आमची कुणबीकी जिवंत आहे फक्त आमच्या लेकरांचे भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून आरक्षणाचा उजेड मागत आहोत. ही फक्त विद्यमान सरकारचीच नाही तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलंय त्या सर्वच राज्यकर्त्यांची सामूहिक जबाबदारी आहे. तुम्ही एकमेकांची सत्ता आणण्यासाठी आणि घालवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात ते बासनात गुंडाळून मराठा समाजाने आजवर तुम्हाला दिलेल्या सत्तांची कदर ठेवून मराठ्यांना आरक्षण द्या.
बाबासाहेबांनी ज्या हेतूने आरक्षण दिले होते तो हेतू अलीकडील काळात मात्र पूर्ण होताना दिसत नाही. आधी समता नव्हती, बाबासाहेबांनी ती निर्माण केली पण आता पुन्हा मतांच्या गठ्ठ्यांसाठी समतेचा समतोल ढळत चालल्याची खंत वाटतेय. आता ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडे छत्रपती शिवरायांचा लढवैय्या बाणा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी दिलेले आंदोलनाचे स्वातंत्र्य आहे. मायबाप सरकार, आम्ही फक्त मतदार नाहीत तर माणसं सुद्धा आहोत याचा विचारव्हावा.
सकल मराठ्यांच्या वेदनांना जर हाडा मांसाचा आकार दिला तर त्या तयार होणाऱ्या शरीराला जरांगे पाटील म्हणता येईल. तो फक्त माणूस उरला नाही आता ती एक शक्ती बनलाय. त्यांच्या आत्म्याशी लाखो लोकांनी आत्मा जोडलाय. हे एका दिवसात नाही झालं तर गेल्या अनेक वर्षाच्या वेदनांना पाटलांच्या रुपात टोक मिळालंय जे आरक्षण मिळवण्यासाठी आरपार घुसण्याची क्षमता ठेवतंय म्हणूनच समाज ताकदीने त्यांच्या पाठीशी उभारलाय. हे लादलेले नेतृत्व नाही, मराठ्यांच्या सुपीक मातीत उगवलेलं नेतृत्व आहे. ते वजनाने हलके आहेत म्हणून त्यांना हलक्यात घेवू नका. त्या एकट्याचे वजन आता पाच कोटी मराठ्यांच्या वजनाएवढं झालंय. जरांगेला अंगावर घेणे कुणालाही सोसणार नाही. आरक्षण द्याच !
प्रा.विशाल गरड
१ नोव्हेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment