प्रति,
मनोज जरांगे पाटील.
आंतरवाली सराटी, जि.जालना
युद्धात सुद्धा थोडी उसंत आवश्यक असतेच. ताकद एकवटून पुन्हा नेटाने लढता येते. जेव्हा आपल्या पाठीशी लढणारी बलाढ्य फौज उभाराहते तेव्हा सेनापतीने त्यांच्यासाठी रणभूमीवर जिवंत असणे गरजेचे असते. धारातीर्थी पडलेला सेनापती पाहून सैन्याचे खच्चीकरण होते, लढा दिशाहीन होतो. आरंभिलेले कार्य तडीस जात नाही. म्हणून वाटतेय सरकारसाठी नाही पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या करोडो मराठ्यांसाठी तुम्ही उपोषण स्थगित करावं.
विचार करा पाटील, जर मागच्या वेळेसच उपोषण करता करता तुमच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर मराठ्यांची १४ऑक्टोबरची ऐतिहासिक एकजूट शक्य झाली असती का ? सभेसाठी पहाटेपर्यंत तुमची वाट पाहणारे मराठे तुम्हाला दिसले असते का ? यावरून एवढंच सांगायचंय की या घडीला आम्हाला आरक्षणापेक्षाही तुमचा जीव मोलाचा वाटतोय. जर तो टिकला तर टिकणारे आरक्षण सुद्धा मिळेलच.
तसेही आरक्षणाची आजवर पन्नास वर्ष वाट पाहिली आहे त्यात अजून चार दोन महिने आम्हाला जास्त नाहीत पण तुमच्या मरणाची मात्र आम्ही कदापी वाट पाहू शकत नाहीत. ही भावना माझ्या एकट्याची नाही तर देशभरातील सकल मराठ्यांची आहे. आपल्या आरक्षणाच्या लढाईला पूर्णविराम द्यायचाच नाही पण सतत खालावत चाललेली तुमची प्रकृती पाहता आता तुम्ही उपोषणाला स्वल्पविराम द्यावा ही नम्र विनंती.
विशाल गरड
२ नोव्हेंबर २०२३, पांगरी ता.बार्शी
No comments:
Post a Comment