आज माझ्या थोरल्या लेकीचा वाढदिवस. ती चार वर्षांची झालीये. आपली लेकरं हाता खांद्यावर खेळत मोठी होताना पाहणे आई बापासाठी वेगळाच आनंद असतो. प्रत्येक मायबापाला त्यांची लेकरांची काळजी वाटणे नैसर्गिक असते पण जेव्हा तेच लेकरू बोबड्या आवाजात आणि इवल्याशा हातांनी जेव्हा आपली काळजी घ्यायला लागतं तेव्हा जगात भारी फिलिंग असते ती. सध्या आम्ही साऊची ती स्टेज अनुभवतो आहोत. कधी काही कारणास्तव जर चुकून मी आईवर किंवा विरावर ओरडलो तर साऊ लगेच माझ्या तोंडाला हात लावत मला रागावते. आमचं एकत्र कुटुंब असल्याने तिची मातृभाषा जबरदस्त वृद्धिंगत झाली आहे. आई बाबांसह घरात तीन आज्या आणि तीन आजोबा ही साऊची श्रीमंती आहे. ग्रामीण शैलीतले सगळे बारकावे तिने या चार वर्षांत अनुभवले असल्याने भविष्यात ते तिच्या कामी येतील.
तिला दारासमोरचा सडा माहीत आहे, चुलीतला जाळ माहीत आहे, पत्र्यावर पडणारा पावसाचा आवाज माहीत आहे, बहुतांशी प्राणी आणि पक्षांचे आवाज ती प्रत्यक्ष अनुभवते, चेहऱ्यावरचे सगळे हावभाव तिला स्पष्ट कळतात, तिला नाती माहीत आहेत, तिला माणसं माहीत आहेत आणि इवल्याशा मेंदूला आता माणुसकीही कळत आहे. लेकरांचे पालन पोषण ही पालकांची प्राथमिक जबाबदारी असते पण मी माझ्या कामात प्रचंड व्यस्त असताना विरा आणि माझे सर्व कुटुंबीय ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात म्हणूनच मी माझ्यातल्या अभिव्यक्तींना वेळ देऊ शकतो. असो लेखक बापाने ठरवले तर माझ्या या कादंबरीची एक कादंबरी तयार होईल. तूर्तास एवढं च लिहून थांबतो. माझ्या पिल्लीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
विशाल गरड. (साऊचे बाबा)
५ एप्रिल २०२४, पांगरी
Hello, तुम्ही खूप छान लिहिता! I enjoy reading your blog.
ReplyDelete