Wednesday, June 12, 2024

शिवलक्ष्मीचा पहिला वाढदिवस

माझी लहान मुलगी शिवलक्ष्मीला तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिचं पडणारं पहिलं पाऊल, उगवणारा पहिला दात, आलेले पहिले जावळ, तोंडातला पहिला हंकार, उच्चारलेला पहिला शब्द, डोळ्यातून आलेला पहिला अश्रू, सगळं सगळं लक्षात ठेवण्यासारखं होतं. तिचा पहिला उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अनुभवून झालाय. मायमराठी मातृभाषेचे सॉफ्टवेअर तिच्या मेंदूत इन्स्टॉल केलंय. एकत्र कुटुंब असल्याने तिला आजी, आजोबा, चुलते, आत्या भरपुर आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात ती जमिनीवर कमी कडेवरच जास्त राहिलीये. आता तिचे बोबडे बोबडे शब्द ऐकण्यात आणि घरभर पळणारे पाय आवरण्यात पुढील वर्ष व्यस्त जाणार आहे. माझ्या अनेक वैचारिक कलाकृती तुम्ही पाहिल्या आहेत, ‘शिवलक्ष्मी’ ही माझी आणि विराची बायोलॉजिकल कलाकृती आहे. इतकं सुंदर आणि परिपूर्ण रत्न आमच्यापोटी दिल्याबद्दल निसर्गाचे आभार. लेकरावर तुमचे आशीर्वाद राहू द्या. 


विशाल गरड

१२ जून २०२४






Thursday, June 6, 2024

संभाजी डॉक्टर होणार

हे आहेत धनाजी वाघमोडे. राहणार शिराळा ता.परांडा. ते आज कॉलेजवर पेढे द्यायला आले होते. पेढे कशाचे ते सांगतो. यांचा मुलगा संभाजी वाघमोडे आमच्याकडे अकरावी साठी आला होता. दोन वर्ष पोराने प्रचंड कष्ट घेवून, मन लावून अभ्यास करून NEET परीक्षेत ६६८ गुण मिळवून MBBS साठी पात्र ठरला. धनाजीराव एक सामान्य शेतकरी माणूस पण आज त्यांना त्यांच्या खांदानातला पहिला डॉक्टर संभाजीच्या रूपाने मिळालाय. माझ्या हातावर पेढा ठेवताना बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा होता.


संभाजीला मी वेळोवेळी सांगायचो. “तुझ्या परांडा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला यायचंय बरंका, गावातला पहिला MD डॉक्टर बनून तुला तुमच्या गावच्या इतिहासात नाव अजरामर करायचंय. रस्त्याने जाताना वडिलांना अदबीने लोकांनी नमस्कार घातला पाहिजे असे वाटत असेल तर ही दोन वर्ष फक्त अभ्यासाला वाहुन दे” पोराने ऐकले आणि बापासोबत आमच्या कॉलेजचे नाव काढले. पहिल्याच प्रयत्नात त्याने NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत ६६८ गुणांचा झेंडा फडकावून AIIMS ची पायरी शिवलीये. 


आमच्या कॉलेजवर विश्वास ठेवणाऱ्या धनाजीरावांसारख्या पालकांमुळेच सोनवणे कॉलेजचा डंका वाजतोय. आमचे संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे सरांसह  कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संभाजीच्या यशात वाटा आहे. जो विद्यार्थी अभ्यास करण्याचा वाटा उचलतो त्याला वाट दाखवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. शिस्तबद्ध वातावरणात आमच्या सिस्टिमवर विश्वास ठेवून जो अखंड, अविरत झटतो त्याच्या वाट्याला हे यश मिळतेच. संभाजीसारख्या शेकडो यशोगाथा माझ्या कॉलेजने घडवल्या आहेत हेच आमचे वेगळेपण.


प्रा.विशाल गरड

६ जून २०२४, सोनवणे कॉलेज, उक्कडगांव.




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...