हे आहेत धनाजी वाघमोडे. राहणार शिराळा ता.परांडा. ते आज कॉलेजवर पेढे द्यायला आले होते. पेढे कशाचे ते सांगतो. यांचा मुलगा संभाजी वाघमोडे आमच्याकडे अकरावी साठी आला होता. दोन वर्ष पोराने प्रचंड कष्ट घेवून, मन लावून अभ्यास करून NEET परीक्षेत ६६८ गुण मिळवून MBBS साठी पात्र ठरला. धनाजीराव एक सामान्य शेतकरी माणूस पण आज त्यांना त्यांच्या खांदानातला पहिला डॉक्टर संभाजीच्या रूपाने मिळालाय. माझ्या हातावर पेढा ठेवताना बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा होता.
संभाजीला मी वेळोवेळी सांगायचो. “तुझ्या परांडा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला यायचंय बरंका, गावातला पहिला MD डॉक्टर बनून तुला तुमच्या गावच्या इतिहासात नाव अजरामर करायचंय. रस्त्याने जाताना वडिलांना अदबीने लोकांनी नमस्कार घातला पाहिजे असे वाटत असेल तर ही दोन वर्ष फक्त अभ्यासाला वाहुन दे” पोराने ऐकले आणि बापासोबत आमच्या कॉलेजचे नाव काढले. पहिल्याच प्रयत्नात त्याने NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत ६६८ गुणांचा झेंडा फडकावून AIIMS ची पायरी शिवलीये.
आमच्या कॉलेजवर विश्वास ठेवणाऱ्या धनाजीरावांसारख्या पालकांमुळेच सोनवणे कॉलेजचा डंका वाजतोय. आमचे संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे सरांसह कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संभाजीच्या यशात वाटा आहे. जो विद्यार्थी अभ्यास करण्याचा वाटा उचलतो त्याला वाट दाखवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. शिस्तबद्ध वातावरणात आमच्या सिस्टिमवर विश्वास ठेवून जो अखंड, अविरत झटतो त्याच्या वाट्याला हे यश मिळतेच. संभाजीसारख्या शेकडो यशोगाथा माझ्या कॉलेजने घडवल्या आहेत हेच आमचे वेगळेपण.
प्रा.विशाल गरड
६ जून २०२४, सोनवणे कॉलेज, उक्कडगांव.
No comments:
Post a Comment