Monday, August 26, 2024

शिवशिल्प उभारताना

खरं सांगू जेव्हा हे उद्घाटन झाले तेव्हाच मी महाराजांच्या या शिल्पाबद्दल लिहिणार होतो. पण आपली माणसं परखड गोष्टी मांडल्यावर सुद्धा टिकेचे धनी करतात. याआधीही जेव्हा महाराजांचा देखावा राजपथावर मिरवला होता त्यावेळी मी “महाराजांची मान खाली का ?” या शिर्षकाखाली लेख लिहिला होता. जो मुंबईच्या नवा काळ या आघाडीच्या दैनिकाने पहिल्या पानावर हेडिंग करून छापला होता. एक कलाकार या नात्याने प्रत्येक कलाकृतीकडे बघण्याची आमची एक नजर असते. आता या फोटोतले शिवशिल्प पाहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला शोभणारे हे शिल्प होते का ? तर अजिबात नाही. अगदी सुमार दर्जाची ही शिल्पकला होती. निसर्गालाच ती बघवली नाही म्हणून वादळाने ते शिल्प ढासळले असावे. त्या कामाचा दर्जा वगैरे काय असेल हे तर पुतळ्याच्या ठेवणीवरूनच समजून येते. खरंच सांगा आजवर तुम्ही जेवढे केवढे अश्वारूढ पुतळे पाहिले असतील त्याहून हा पुतळा तुम्हाला कसा


महाराष्ट्रात शिल्पकलेतील कलकारांची अजरामर नावे असताना हा पुतळा नेमका कोणाकडून बनवून घेतला असेल ? अरे महाराज उभे करताना किमान त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून तरी त्यांच्या पुतळ्याला न्याय द्यायला हवा. अर्ध्याहून अधिक भारत ज्यांच्या नावावर होता त्यांचे शिल्प उभा करताना सुद्धा तेवढी भव्यता साकारणे शक्य होत असेल तरच धाडस करत जावा. अन्यथा अशी सुमार दर्जाची शिल्पकला उभी न केलेली बरी. पुतळे उभा करण्याचा सरकारचा हेतू जरी चांगला असला तरी बांधकामे पक्की होण्यासाठी जरा वेळ जाऊच द्यावा लागतो. असे नेते वगैरे येणार म्हणून घाई गडबडीत उभारायला तो काय तात्पुरता देखावा वाटला की काय ? सदर पुतळा उभारलेल्या ठेकेदारांनो. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर लावलेला एक दगड सुद्धा प्रचंड ऊन, वारा, पाऊस झेलत अजून जागचा हालत नाही रे पण तुमची कामे ही अशी जर वाऱ्यावर उडून चालली तर कसे चालायचे. आता पुन्हा त्याच जागी शिवशिल्प उभा करायचे असेल तर ते अतिशय सुबक, दर्जेदार आणि महाराजांचा तलवार घेवून उभारल्याचा आवेश आणि आत्मविश्वास लख्ख प्रकट होणारे असावे एवढीच एक शिवविचारांचा सेवक नात्याने माझी माफक अपेक्षा. जय शिवराय !


विशाल गरड

२६ ऑगस्ट २०२४, पांगरी


(टिप : महापुरुषांच्या पडलेल्या किंवा तुटलेल्या पुतळ्याचे फोटो शेअर करणे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण ते पाहून जर माझ्याच भावना दुखावल्या जात असतील तर इतरांच्याही त्या दुखावण्याचा मला अधिकार नाही. आपणही त्या घटनेचे फोटो शेअर करणे टाळता आले तर टाळा ही विनंती.)






Thursday, August 22, 2024

विस्कटलेल्या वासना

कोपर्डी काय ? हिंगणघाट काय ? मणिपूर काय ? कलकत्ता काय ? आणि आता बदलापूर काय ? ते नराधम आपल्या लेकी बाळींना कधी जाळून मारतील, कधी सामूहिक बलात्कार करून मारतील, कधी नागडी धिंड काढतील, कधी मारून तुकडे करतील तर कधी अंगणात खेळायच्या वयात तिला कॉटवर नेतील. कारण मारणाऱ्यालाही एक पक्क माहित झालंय की मी काहीही केले तरी लगेच मरणार नाही. प्रकरण सोशल मीडियावर उचलले तरच मेन स्ट्रीम मिडिया मधे येईल, मेन स्ट्रीम मिडिया मधे आल्यावरच आंदोलन उभे राहील आणि आंदोलन झाल्यावरच सरकार खडबडून जागे होईल. आजवर अशा हजारो निर्भया हेडलाईन बनण्याआधीच डेड झाल्यात. काळ बद्दललाय, माणसं बदलली तश्या त्यांच्या मानसिकताही बदलत गेल्या पण न्यायव्यवस्था अजूनही म्हणावी तशी बदलली नाही. बलात्काराच्या घटना घडणार, फेसबुक, व्हाट्स ऍप निषेधांच्या पोस्टनी भरून वाहणार, मेणबत्त्या जळणार, मोर्चे निघणार, दुकाने बंद होणार. काही दिवसांनी, महिन्यांनी हे पुन्हा करावे लागणार.


चिमुकल्या जिवाकडे बघताना या लिंगपिसाट नराधमांच्या मनात असे विचार येतातच कसे ? चांगलं चुंगलं खाऊनही या मानवी शरिरात हे नासकं वीर्य उत्पन्न होतेच कसे ? अशा प्रकारच्या अत्याचाराचा विकार डोक्यात येणाऱ्या मेंदुचा खिमा करून गिधाडांना खायला टाकायला हवा. जिवंतपणीच यांच्या अंगावरची चामडी काढुन हे नागडे देह तळपत्या उन्हात पशु पक्षांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकायला हवेत. अशा बलात्काऱ्यांचे मांस खाताना त्या पशुपक्षांनाही उल्टी येईल एवढा वाईट विचारांचा वास त्या नरदेहातुन सुटलेला असेल. जितक्या यातना बलात्काऱ्यांनी त्या स्त्रीला दिलेल्या असतात त्याहून हजारपटीने सोपे मरण त्यांना फाशीच्या रूपात मिळते. अशा शिक्षा ठोठावल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आरोपी जेलमध्येच आरामात दहा बारा वर्षाचे बोनस आयुष्य जगून निघतात. मग याला न्याय म्हणायचा का ? 


नेहमीच पहिल्या गियर वर चालणाऱ्या न्यायव्यवस्थेने अश्या भयंकर घटनांसाठी तरी निदान टॉप गियर टाकायला हवा. बलात्कार रोज होण्याच्या, मर्डर रोज होण्याच्या, खूप घटना आहेत पण नराधमांना फाशी झालेल्या बातम्याच हल्ली ऐकू येत नाहीत. हेच खरं दुखणं आहे. “हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे” हे तर मी पण वाचलंय ओ, पण ते सुटलेले हजार किती निरपराध्यांना मारत असतील याचा विचार अक्षरशः छळतो मनाला. हे माननीय न्यायदेवते, तुला एवढंच मागणे आहे. मान्य आहे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे पण तरीही अश्या घटनांचे निकाल देऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंत तुझी पट्टी थोडीशी सैल ठेवत जा. पोरींच्या आत्म्यास शांती मिळेल गं.


पशू, पक्षी आणि किटक सुद्धा प्रजननाचे नियम पाळतात. कुत्र्यांच्या हांडगुळी भाद्रपदातच दिसतात. गाईने माज केल्याशिवाय बैल तिच्याजवळ फिरकत नाही. लांडोरी जवळ आल्याशिवाय मोर प्रणय करत नाही. अहो एवढंच काय भुंगा सुद्धा फूल उमलण्याची वाट पाहतो, तो कधीच कळी कुरतडत नाही. पण माणूस हाच या पृथ्वीवरील असा एक प्राणी आहे ज्याला बारा महिन्यात कधीही, कुठेही आणि केव्हाही प्रणयाची भूक लागू शकते. आणि ती मिटवण्यासाठी निसर्गाचे नियम डावलून तो हैवान बनतो. कधी कधी त्याची क्रूरता पाहून त्यांना रक्षस म्हणणे त्या राक्षस समूहाचा सुद्धा अपमान असतो. अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या अंगावर विष्ठा टाकणे हा त्या विष्ठेचा अपमान आहे, अशांना जनावरांची उपमा देणे हा जनावरांचा अपमान असतो. इतके ते भयंकर वागतात. 


जिथे महिला रात्री रस्त्यावर एकट्या फिरू शकत नाहीत अशा परिस्थितीत आपल्याला महासत्ता होण्याची स्वप्न तरी कशी पडू शकतात. जिच्या पोटातून जन्म घेतो तिलाच सुरक्षा प्रदान करू शकत नसुत तर आपल्या पुरुषत्वाचा काय फायदा. कायदा, कलमे, कोर्ट, कचेऱ्या, वकील, न्यायाधीश, पोलिस हे सगळं माणसांनीच तयार केलेल्या गोष्टी आहेत ना मग एका रात्रीत दुनिया बदलण्याची हिंमत ठेवणाऱ्यांनी हे कायदे आणि परंपरागत न्यायव्यवस्था नाहीत का बदलू शकत ? कोर्टाला नुसतं फास्ट ट्रॅक नाव देवून काय होणार. अवघ्या दोन तीन दिवसात खटला निकाली काढून चौथ्या दिवशी त्या नराधमाला फासावरलटकवल्याची बातमी बाहेर यायला पाहिजे मग बघा कोणी हिंमत नाही करणार पुन्हा. पण कोपर्डी सारख्या गुन्ह्यातील नराधम अजूनही जेलमध्ये दोनवेळचे जेवण करतात ही किती चीड आणण्यासारखी गोष्ट आहे. आजी माजी राज्यकर्ते याबद्दल फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसतात पण त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी सगळेच शेपूट घालून बसतात. 


अरे बलात्काऱ्यांनो, वासनेची इच्छा ही काही मिनिटांची असते. तुम्हाला तिच्याशी लढता आले पाहिजे. नसेलच येत लढता तर जरा डोळे उघडे ठेवून इतर प्राण्यांकडे बघा. ते उगाच कुणावर बळजबरी करताना दिसणार नाहीत. त्यांच्याहूनही तुमची पातळी घसरली असेल तर मग सरळ दवाखान्यात जाऊन तुमचे अंडकोष काढून या, कारण तसेही तुमचे एक मिलीग्राम वीर्य बाहेर काढण्यासाठी जर तुमची वासनांध नजर तीन-चार वर्षाच्या चिमुरड्या मुलींवर पडत असेल तर त्यापेक्षा तुमची अंडकोष निकामी करुन तुम्ही षंढ म्हणून जगणे तुम्हाला परवडेल अन्यथा आता समाज तुम्हाला कायद्याची तमा न बाळगता ठेचून ठेचून मारेल. 


प्रा.विशाल गरड

२२ ऑगस्ट २०२४, पांगरी




Monday, August 12, 2024

विलक्षण योगायोग

आज वडिलांसोबत सोलापूरला गेलो होतो. त्यांची प्रशासकीय कामे आटोपून परत फिरताना आमची गाडी दुपारी ३ च्या सुमारास सोलापूर-बार्शी टोल नाक्याच्या थोडे पुढे अचानक बंद पडली. अनेक स्टार्टर मारले पण काही केल्या गाडी उचलत नव्हती. मी बाहेर येवून गाडीचे बोनट उघडून ठेवले. इतक्यात रोडवरून जाणारे दुचाकीस्वार ॲड.राहुल जानराव मला पाहून थांबले. याआधी माझी त्यांची ओळख नव्हती पण ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुन माझा कंटेंट पाहत असत त्यामुळे त्यांनी मला थांबून त्याबद्दल कौतुकाची प्रतिक्रिया दिली. आमचे थांबण्याचे कारण समजताच वकील साहेबांनी त्यांच्या परिचयाच्या वसीम शेख या फिटरला तात्काळ फोन करून गाडीजवळ बोलावले.

काही मिनिटांत वासिम आला. त्याने गाडी चेक करून लगेच निदान सांगितले. डिझेल सप्लाय व्यवस्थित होत नाही. प्रेशर पंप निकामी झालाय. मी माझ्या नेहमीचा फिटर दयानंद सूर्यवंशीला कॉल करून सेकंड ओपिनियन घेतला तेव्हा त्याचेही तेच म्हणणे आले. आता सर्वात मोठा प्रश्न उभारला की तो पार्ट मिळेल कुठे. कारण गाडी बंद पडण्याचा असा प्रॉब्लेम आधीपासूनच होता. पण गाडी बंद झाल्यावर थोडयावेळाने चालू व्हायची म्हणून जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. फोर्डचे स्पेअर पार्ट सहज उपलब्ध होत नसल्याने तो पार्ट टाकण्यास विलंब होत होता. पण आज ती अशी बंद पडेल याची कल्पना नव्हती. अखेर वसीमने त्याच्या एका मित्राला सेकंद हँड पंप मिळेल का याची विचारपूस केली आणि काय आमचं नशीब थोर म्हणून तो पंप लागलीच उपलब्धही झाला.

एवढ्यात सोलापूरहून पीकअप घेवून निघालेला आमचा गावकरी गणेश बगाडे आमच्याजवळ थांबला. त्याला वाटले बोनट उघडून गाडी कडेला उभी आहे म्हणल्यावर काहीतरी बिघाड झालेला असणार. गणेशच्या येण्याने माझी गाडी टोचण लावून वसिमच्या गॅरेजपर्यंत नेता आली. वासिमजवळ गाडी दुरुस्तीसाठी लावून आम्ही त्याच्या पिकअपमधे वडाळ्यापर्यंत आलो. तिथून सोलापूर परांडा गाडीत बसलो. गाडीत प्रचंड गर्दी होती. तिकीट काढताना कंडक्टर झिरपे साहेबांनी मला ओळखले. त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. तुडुंब भरलेल्या गाडीत त्यांनी त्यांची कंडक्टर सीटवर माझ्या वडिलांना बसवले आणि स्वतः माझ्यासोबत उभारले. पुढे बार्शीत उतरताच प्लेटफॉर्मवर कराड-लातूर गाडी उभाच होती. आम्ही लगेच ती गाडी पकडून अंधार पडण्याच्या आत पांगरीला पोहोचलो.

 


आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली ते सांगतो. यातले ॲड.राहुल जानराव यांना मला भेटण्याची खूप ईच्छा होती. माझी आणि त्यांची भेट व्हावी असे त्यांना सतत वाटायचे. माझ्या व्याख्यानाचे ते चाहते आहेत. यातला गणेश बगाडे हा कधीच इतक्या उशिरा सोलापूरहून निघत नाही नेमके आजच त्याला उशीर झाला. एस.टी.कंडक्टर झिरपे साहेबांची कधीच सोलापूर-परांडा गाडीवर ड्युटी नसते. नेमकी आजच त्यांची त्या गाडीवर ड्युटी लागली. फिटर वसिम शेखने त्याच्या गॅरेजचे सगळे सामान दुसरीकडे शिफ्ट केले होते. काहीवेळात तो सोलापूर शहरात चालला होता. आणि मी माझे वडील विजय गरड (दादा) यांच्यासोबत कधीच त्यांच्या राजकीय किंवा प्रशासकीय कामांसाठी सोबत जात नाही. त्यांचे नेहमीचे सारथी रवी काकडे त्यांच्या सोबत असतात पण आज सहजच त्यांच्यासोबत जाण्याचा विचार माझ्या मनात आला आणि मी गेलो. 

यावरून एक गोष्ट अनुभवली. “अगर किसी चीज को तुम दिलो जानसे चाहते हो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने मे जुटी रेहती है.” हे सगळं नसतं घडलं तर कदाचित आम्हाला  खूप त्रास झाला असता पण संकट आले आणि अगदी दुसऱ्याच क्षणाला ही इतकी माणसं जादू सारखी भेटली आणि सगळं काही सुरळीत होवून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. या पृथ्वीवर अशी कोणतीतरी एक शक्ती नक्की आहे जी जात, धर्म, पंथ, वर्ण याच्या पलीकडे जाऊन हे सगळं इतक्या पध्दतशीरपणे घडवून आणते. आजच्या दिवशीचा हा अनुभव सदैव स्मरणात राहील. ॲड. राहुल जानराव, गणेश बगाडे, वसीम शेख, झिरपे साहेब, रवी काकडे या सर्वांचे मनापासून आभार. 


विशाल गरड

१२ ऑगस्ट २०२४, (सोलापूर-बार्शी रोडवरून)



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...