Saturday, August 22, 2026

विद्यार्थ्यांनो जागे व्हा !

​

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरून एका १८ वर्षाच्या मुलाने (वाचलेल्या बातमी नुसार) आय फोनचे हाफ्ते तटले म्हणून उडी मारून जीव दिला त्यात त्याला वाचवायला गेलेले वडीलही पडले व त्या दोघांना पडताना पाहिल्याने पाठीमागून आईनेही उडी घेवून जीवनयात्रा संपवली. आईबापाचा जीव त्या पोराने घेतला. कसली भयंकर गोष्ट आहे ही. चार पाच दिवस चर्चा करून सगळे पुन्हा आपापल्या कामाला लागतील पण थोडे थांबून विचार करा हे का घडतंय ? इवलीशी लेकरं इतकी टोकाचे वागायली. पालकांचा लेकरांसोबत संवाद कमी होत चाललाय. कमी वयात त्यांना जास्तीचे एक्सपोझर मिळतंय. सोबतच्या मित्र मैत्रिणीकडे असलेल्या गॅझेटचे आकर्षण वाढतंय. आपल्या आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाजा न घेता वाट्टेल त्या गोष्टींची मागणी करत वेळप्रसंगी आत्महत्येची भीती दाखवून ते ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत आहेत. दहावीत ९२ % मार्क मिळवूनही जर त्या मुलाला ही औदसा सुचली असेल तर लक्षात ठेवा तुमची लेकरे शाळेत हुशार असली म्हणजे ती समजूतदार असतील असे नाही.


शालेय असोत किंवा महाविद्यालयीन असोत सध्या या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेशनाची, प्रबोधनाची गरज आहे. सध्या किती संस्थामध्ये पूर्णवेळ काउन्सेलर आहेत ? सगळ्यांना फक्त विद्यार्थ्यांचे मार्क हवे आहेत ? What about thier Physical or Mental health ? मोबाईलच्या विळख्यात अडकलेली पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळवणे मोठे दिव्य आहे पण प्रयत्न व्हायलाच हवा. फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागलेल्या पालकांना जेव्हा कळेल की आपली लेकरे हीच खरी संपत्ती आहे तेव्हाच बदल व्हायला सुरुवात होईल. आज पोरं पोरी स्मार्ट फोन घेवून त्यावर वाट्टेल तो कंटेंट सहज बघत आहेत याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतोय व त्यांच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा म्हणूनच गांव व शहरात गणपती, नवरात्री किंवा महापुरुषांच्या जयंती निमित्त बहुतांश जागी समाज प्रबोधनपर व्याख्यानांऐवजी फक्त डॉल्बी आणि नर्तिकांच्या कार्यक्रमांना पसंती दिली जात आहे. पोरं प्रचंड नादावलेली आहेत. एखादी नर्तिका बीभत्सपणे नाचत असताना एकदा त्या तरुणाच्या डोळ्याकडे आणि त्यांच्या हावभावांकडे बघा, कोवळ्या जीवांना किती विषारी नजरेने ग्रासले आहे हे दिसेल. तरीही पालक म्हणून, गावकरी म्हणून, पोलिस म्हणून आणि सरकार म्हणून आपल्याला काहीच करायचे नसेल तर मग पोरांच्या आत्महत्या आणि मुलींचे बलात्कार शांतपणे बघत बसा.


ही मोबाईलच्या सहवासात जन्माला आलेली पिढी आता आई वडिलांचे, वडिलधाऱ्यांचे ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. चांगले सांगणाऱ्याला तर पहिल्यांदा वेड्यात काढतात हे. बेधुंद होवून थिरकण्याचे हे विष या युवा पिढीला प्रचंड काळोखाच्या गर्तेत घेवून जात आहे याची त्यांनाही कल्पना नाही. फोन घ्यायला, गाड्या घ्यायला, मजा करायला आई बापाचा प्रचंड पैसा आहे. कमवायची अक्कल शून्य असणारे तर नर्तिकांचे कार्यक्रम आयोजित करायला भाया सारून पुढे आहेत. ती नर्तिका बेधुंद होवून नाचत असताना तिच्या अदाकाऱ्या पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी ते आयफोनमधे कैद करून ठेवण्यासाठी आपल्याकडेही एक आयफोन असावा असेही अनेक युवकांना वाटते. यामध्ये पैसेवाल्या बापांची वाया गेलेली अनेक मुले तुम्हाला दिसतील पण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही त्या संगतीचा परिणाम लागला की मग घरेची घरे उध्वस्त होतात. हे बिहारी कल्चर महाराष्ट्रात रुजण्याआधी जर सरकार आणि समाजाने मिळून नाही थोपवले तर स्वतःची लेकरे डोळ्यादेखत वाया जाताना पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही.


त्या मुलाने एका आयफोनसाठी आईला वेठीस धरले. अरे जरा बापाकडे बघायला हवे होते तुझ्या पोटासाठी आणि शिक्षणासाठी तो घराबाहेर राहून अहोरात्र ट्रक चालवत होता. ट्रकमधे फक्त सामानाचे ओझे नव्हते तर त्याच्या संसाराचेही होते. त्याचा स्वतःचा मोबाईल किती तरी वेळा त्याने नीट करून घेतला असेल. तुम्हाला सगळे आयते बसून मिळत आहे ना म्हणून हे चोचले वाढत जात आहेत. पालकांनीही ध्यानात ठेवावे तुमच्याकडे पैसे असतील नसतील. लेकरांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करत बसू नका. त्याला एखादे काम द्या ते पूर्ण केल्यावरच मोबदल्याच्या स्वरूपात त्याला पैसे द्या. एक दिवस तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या कामावर घेवून जा, त्यांनाही कळूद्या तेवढे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती शारीरिक आणि मानसिक श्रम करावे लागते. मी लहान असताना जे मला मिळाले नाही ते सगळे माझ्या मुलाला मिळायला हवे हीच मानसिकता तुमच्या लेकरांना अधू करत आहे. आपल्याला काही गोष्टी आपल्या बापाकडून मिळाल्या नाहीत म्हणूनच त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण कष्ट केले, शिक्षण घेतले, व्यवसाय केला आणि आता श्रीमंत झालोत.  आता जर तुमची श्रीमंती तुमच्या लेकरांत दिसायली तर त्याची स्वतः कष्ट करून कमवण्याची ईच्छा कशी वृद्धिंगत होईल ? 


पोरांनो, आईबापाने तुम्हाला जन्म दिलाय हाच खूप मोठा उपकार केलाय तुमच्यावर. चांगले शिक्षण घ्या, नोकरी करा, व्यवसाय करा वेळप्रसंगी रोजंदारी करा अन स्वतः सोबत आईबापाचे हट्ट पूर्ण करा. तुमच्या दोन घासांची सोय करण्यासाठी त्यांनी लय आशा अपेक्षा मारून टाकल्या आहेत रे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी त्यांचा जीव घेऊ नका. खवड्या डोंगरावरून मुलाला वाचवण्यासाठी जीव दिलेल्या त्या बापाला आणि डोळ्यादेखत कुटुंब संपले म्हणून त्याच डोंगरावरून उडी घेवून आत्महत्या केलेल्या त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तो मुलगा मात्र श्रद्धांजलीस पात्र नाही त्याने केलेल्या कृतीचा उलट तीव्र निषेध. 


विशाल गरड 

लोकव्याख्यानकार 


(टिप- या लेखासंदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया इथे कमेंट करून नक्की नोंदवा)

15 comments:

  1. सर, अतिशय सुंदर आणि प्रबोधन करणारं भाष्य🙏

    ReplyDelete


  2. “आपण दिलेला सल्ला खरंच खूप छान आहे आणि तो सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मनाला खूप भावला. तुमचे मनापासून आभार!” 🌷🙏🏻

    ReplyDelete
  3. खूपच छान आता मात्र फार समाजप्रबोधनाची गरज आहे वास्तववादी विचारला सलाम

    ReplyDelete
  4. तुमच्या सारख्या लोकव्याख्यानकरा कडून समाजप्रबोधनाची गरज आहे..

    ReplyDelete
  5. सर खूप मोलाचा सल्ला तसेच उपदेश दिला 🙏

    ReplyDelete
  6. सर खूप छान असे संबोधित केले तुम्ही तरुण पिढीला आणि विद्यार्थी मित्रांना आई बाबाच्या कष्टाची जाणीव करून देत आहेत🙏❤️🙏

    ReplyDelete
  7. जे कोणी तुमचा हा लेख वाचतील त्या प्रत्येकाच्या आईबापांना व मुलांना तुमची समाजाविषयीची तळमळ तसेच मुलांचे हट्ट न पुरवठा त्यांना योग्य प्रकारे चांगले शिक्षण देण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येईल तुम्ही लिहिलेला लेख पूर्ण वाचला सर खूपच सुंदर समाजामध्ये प्रबोधन होणार हे नक्की समाजामध्ये परिवर्तन हे झालेच पाहिजे आणि तुमचा जो कोणी लेख वाचतील ती मुले आपल्या आई बापाकडे आपली परिस्थिती नसताना चुकूनही मोबाईल किंवा चैनीच्या वस्तूची मागणी करणार नाहीत चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन उद्योग धंदा करतील नोकरी व्यवसाय करतील आणि आपल्या आई वडिलांचे नाव नक्की उज्वल करतील सर धन्यवाद

    ReplyDelete
  8. Agr.Rishikesh PujariAugust 22, 2026 at 5:27 PM

    छान सर,आपण अतिशय उत्तम आणि रास्त विचार मांडलेत

    ReplyDelete
  9. आपले विश्लेषण खूप वास्तविक आहे परंतु घडलेल्या घटनेबद्दल निःशब्द आहे

    ReplyDelete
  10. खूप छान सर. मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  11. तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख तसेच पालकांचे सुद्धा प्रबोधन पर लेख अभिनंदन सर अतिशय छान लेख लिहिला

    ReplyDelete
  12. खूप छान सर, पण संस्कार पण आईवडलांकडून यायला पाहिजे आणि आणि त्याची जाणीव राखायला पाहिजे.. पण सध्या तर आई वडिलांची च मानसिकता Genz झालिये असे म्हणायला हरकत नाही..

    ReplyDelete
  13. शब्द अपुरे पडतात SIR G ❤️🙏

    ReplyDelete
  14. आई वडिलांना भावपूर्ण श्रध्दांजली नमस्कार सर सुंदर लेख

    ReplyDelete
  15. सर iphone हफ्ता ही चुकीचा news येत आहे त्याचा वडील सोबत शेतीचा प्रॉपर्टी वर भाडणं झाला oo त्याचा वडील बरोबर...
    मीडिया काय वेगळा cha चालू केले... खूप वाईट वाटते असा चुकीचा माहिती देणार मीडिया...

    ReplyDelete

दुष्काळाच्या उंबरठ्यावर.

​ १९७२ नंतर पहिल्यांदाच आपली पिढी दुष्काळ पाहणार आहे. स्विमिंग टॅंक मधे पोहणाऱ्या, टब बाथमधे आंघोळ करणाऱ्या, शॉवर खाली बसणाऱ्या पिढीला दुष्क...