Wednesday, September 28, 2016

| तरवट ©

सध्या गावाकडे सगळ्या रस्त्याच्या दुतर्फा तरवटाची हिरवळ उभी राहीली आहे. एखाद्या रोड साईड गार्डनिंग स्पेशालिस्ट ने आवर्जुन लागवड करून वेळोवेळो छटाई व खत पाणी व्यवस्थापन केलेले असावे एवढ्या शिस्तित हि तरवटं वाढली आहेत. अर्थातच हा रोड साईड गार्डनिंगचा स्पेशालिस्ट दुसरा तिसरा कोणी नसुन निसर्गच आहे.
काल सायंकाळी पांगरीहुन कारीमार्गे अंबेजवळग्याला जाताना रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली तरवटं पाहुन कुठेतली स्मार्ट सिटीतल्या रस्त्यावरून जात असल्याचा भास झाला. "तरवट" हे एक शेताच्या बांधावर वाढणारं तन आहे. डिक्टो भुईमुगासारखं दिसणारं हे झुडुप तब्बल सहा फुट उंच वाढते. हिरवीगार पाने आणि त्याला लागलेली पिवळी फुले मन मोहुन टाकतात. तरवटाला जनावरं अजिबात तोंड लावत नाहीत म्हणुन हे मोठ्या झपाट्याने वाढते. झुडुपाची ठेवण दाट असल्याने; जर ती सलग असतील तर हिरवळीचे एक कुंपणच तयार होते.
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने तरवटाने गाजर गवतालाही मागे टाकलंय. जिकडं बगावं तिकडं फक्त तरवटाचाच जलवा आहे. अजुन दोन महिने तरी तरवटं दिमाखात उभी राहतील पुढे पानगळ आणि फांद्यागळ होऊन उगवलेल्या ठिकाणीच नेस्तनाभुत होतील पुढच्या पावसाळ्यापर्यंत.
कोणी लागवड केली नाही, कोणी पाणी दिले नाही, कोणी खत दिले नाही, कोणी छाटणी केली नाही आणि कोणी फवारणीही केली नाही तरीही निसर्गाच्या पांघरूनात राहुन स्वयंशिस्तीने सोबतच्या शेकडो गवतांसोबत स्पर्धा करून तरवटानं यंदाच्या पावसाळ्यात हवा केली आहे.
आपली शहरं स्मार्ट सिटी कधी होतील माहीत नाही पण काही का असेना यंदा पावसानं मात्र शेवटच्या अवघ्या चारच दिवसात आपली सगळी गांव स्मार्ट व्हिलेज करून दाखवली त्याबद्दल त्याला लक्ष लक्ष धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २८ सप्टेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ५ : ३०

Saturday, September 24, 2016

| पांगिरा ©

गेल्या दोन दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे आमच्या पांगरीतली गांवनदी, जिला मी आजपासुन "पांगिरा" असं नाव देतोय. ती आज दुथडी भरून वाहत आहे. गेल्या चार पाच वर्षात पुलावरून पाणिच वाहिलं नव्हतं. आज मात्र ते वाहताना पाहुन डोळ्याचं पारणं फिटलंय आणि जुन्या आठवणी त्या पाण्यात पोहायल्यात.
गेल्या कित्येक दशकांपासुन गावच्या पाण्याची तहाण भागवणारी हि नदी निनावी वाहत आहे. कदाचित तिला एखादे जुने नांव असेलही परंतु आजपर्यंततरी मला तसा दाखला कोणी दिला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नदीला विशिष्ठ अशी नावे आहेत पण माझ्या पांगरीतल्या या नदीला विशिष्ठ असं नाव नाही याची खंत खुप वर्षापासुन मनात होती. म्हणुनच आज मी तिचं  "पांगिरा" हे अर्थपुर्ण नांव देऊन बारसं करतोय. सगळ्या गावाची घान पोटात घेऊन, गावकऱ्यांची वरदायिनी ठरलेल्या या नदीशी माझी नाळ खुप घट्ट जोडलेली आहे. माझ्या लहाणपणीच्या कित्येक सकाळ आणि दुपार श्रीरामपेठेतील दऱ्याबुवा जवळच्या ढवात पोहण्यात घालवल्यात. डोळे लाल होईपर्यंत पोहणे हा जणु छंदच जडलेला. याच नदीत दसऱ्यात घरातल्या फळ्या धुताना आणि पोळ्यात गोठ्यातली जनावरं धुताना विशेष आनंद व्हायचा. आई कापडं धुवायला मसुबाच्या पिंपळाजवळच्या खडकावरं गेली कि तिच्या मागे लागुन पोहायचा हट्ट धरायचो. "माझ्या डोळ्यादेखतंच पोहायचं, जास्त खोल ढवात जायचं नाही" या अटीवर ती मला सोबत घेऊन जायची. मला पाण्यात पोहायला आमच्या आप्पा मामांनी शिकवलं पण जिवनात पोहायला आईनंच शिकवलं.
आल्मासच्या दुकानातुन आठाण्याचा गळ आणायचा मग दावणं (गांडुळ) शोधण्यासाठी जनावराच्या दवाखान्यातल्या वडाखाली दलदलिच्या जागेत खांदुन तिथले दावणे पकडुन ते गळात गुंफायचे. एक काचीदोरा आणि महानंदीचं एक जाड लाकुड घेऊन याच पांगिरा नदीवरच्या पुलावर दुपारपर्यंत मासं पकडंत बसायचं. बहुतांशी चिंगळ्याच सापडायच्या पण एखादा मोठा मासा गळाला लागला की "अयऽऽऽ मरीआईचा डोकडा सापडला...हुर्ररे" करून आनंद व्यक्त करायचा. दहा-बारा चिंगळ्या आणि दोन-चार डोकड्यांची आमची पार्टी मस्त रंगायची. कोणी तेल आणायचं, कोणी तिखट आणायचं तरं कोणी पातेलं आणायचं मग हे सगळं दगडाच्या चुलीवर शिजवुन खायचं. नाहिच काही जमलं तर थेट भाजुन खायचं. ईसल्या(मी) राहुल्या, पिंट्या, महाद्या, इनुद्या, शऱ्या, सच्या, सुहास्या, आतुल्या हि आमची पांगरीची गँग मासं पकडायला, चिंचा फोडायला, पोहायला, आंबे खायला, सायकलीवर निळोबाला जायला नेहमीच सोबत असायची. हि माझ्या भुतकाळातील पांगिराची  आठवण परंतु वर्तमानातली पांगिरा जरा वेगळीच आहे.
पांगरी पंचक्रोशीची वरदायीनी ठरलेल्या या पांगिराची आजची परिस्थिती पाहिली तर; आजमितीला गावातल्या सर्व गटारी इथेच येऊन संपतात, ज्यांच्या घरी शौचालये नाहीत ते सगळे इथेच येऊन हागतात, गावात सर्वात जास्त वापरली जाणारी मुतारी इथेच आहे, ज्यांच्याकडे उकिरडा नाही ते सगळा कचरा इथेच टाकतात. एका समाजाचा मसनवाटाही इथेच आहे. गावात कोठेही लग्न कार्य असो उष्ट्या आणि थर्माकाॅल व प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा ढिग इथेच पडतो, आणि हिच ती पांगिरा सगळ्या पांगरीची घान स्वतःच्या पोटात घेऊन पावसाळ्यात जणु साबण लावुन धुतल्यासारखी स्वच्छ होते. पुलावरचे पाणी ओसरल्यावर त्या स्वच्छ जागेवर पुन्हा पहाटेच कुणीतरी हागुन जाते. ती मात्र संथगतीने वाहतच राहते गावासाठी आणि तहानलेल्या घशांसाठी...

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २४ सप्टेंबर २०१६
वेळ : सकळी १० ते १२

Tuesday, September 20, 2016

| मी मराठा ©

मी "मराठा" या शब्दाला जात मानत नसुन तो जगण्याचा एक अंगार आहे. मराठा हा शब्द प्रत्येकाच्या मनात एक स्पुल्लींग पेटवतो. मराठा हा तिनच अक्षरांचा समुह जो जगण्याची दिशा दाखवतो.
मरा मातीसाठी, राठ बना स्वसंरक्षणासाठी, ठार करा दहशतवाद्यांना, ठाम रहा पाठीशी, राम असुद्या आदर्श, हा सगळा बोध मला म रा ठा या तिन अक्षरांच्या जोडणीतुन होतो.
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सबंध महाराष्ट्राभर निघत असलेले मराठा क्रांती मोर्चे हे मराठ्यांच्या स्वयंशिस्तीचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे.
लाखो लोक एकत्र येत आहेत तेही व्यवस्थेला कसलाही त्रास न देता आणि एकही शब्द न उच्चारता. आता याच लाखोंच्या हातात ढाली आणि तलवारी येऊ नयेत हि जबाबदारी शासनाचीच आहे. कारण या मोर्च्यातील सर्व मागण्या शासनाकडे आहेत. काही ठरावीक समाजकंठकांचा विषारी प्रचार जर सुरू झाला तर मग त्यातुन उसळलेल्या दंगली, कत्तली आणि रक्ताचे सडे महाराष्ट्राला नविन नसतील.
हे मोर्चे मराठा आरक्षण व ईतर मागण्यांसोबतच मराठा समाजाच्या आजवरच्या अधोगतीला कारणीभुत ठरलेल्या प्रस्थापितांविरोधातही आहेत. म्हणुनच एवढा मोठा लाखोंचा जनसमुदाय नेत्यांना वगैरे न जुमानता स्वयंप्रेरणेने एकत्र येत आहे. आजवर ज्यांनी मराठ्यांना गृहीत धरूण राजकारण केले, फक्त शिवरायांचे नांव घेऊन राजकारण केले त्या सर्वांचा राग या मोर्च्याच्यामाध्यमातुन व्यक्त होत आहे, कारण आजवरची सर्वाधीक सत्ता मराठ्यांच्याच हातात असतानाही त्याच समाजातील बहुतांश मराठे मागासलेलेच राहीले हे दुर्देव.
तत्कालिन मराठाद्वेशी माणसांनी मराठा कधीच एकत्र येऊ नये म्हणुन आपल्यातच ईतर पोटजाती आणि प्रकार पाडले. आपल्या पुर्वजांपासुन आजवर आपणही ते पोसले. तु त्यांचा पाहुणा; का आमचा पाहुणा, आसल्या फालतू गोष्टीवर सोयरीकी केल्या. अरे लग्न करण्यासाठी  योणी असलेली एक स्री लागते आणि शिश्न असलेला एक पुरूष लागतो. परंतु त्यातही खोलवर जाऊन पोटजाती शोधणाऱ्या अवलादींनी मराठा या शब्दातच विभाजन करून ठेवले. म्हणुनच आजवर मराठा समाज विखुरलेला राहीला. 
आपला जन्म हि तर एक नैसर्गीक प्रक्रिया झाली. यातुनच आई आणि वडीलांच्या मिलनातुन निर्माण झालेले आपण; सर्वात आधी माणसाचं पिल्लु असतो परंतु आपण जन्मल्यानंतर आपल्यावर जे संस्कार होतात त्यावरूनच आपली जात ठरते. आजवर ज्या-ज्या मातेनं तिच्या लेकरावर लढाईचा, युद्धाचा, क्षत्रियाचा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि मातीसाठी मरण्याचा संस्कार केला तो हरएकजण "मराठा" आहे मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो.
युद्धाचा संस्कार असलेल्या मराठ्यांनी बुद्धाच्या संस्काराप्रमाणे शांततेत मोर्चे काढणे हे तथागत गौतम बुद्ध आणि भारताच्या संविधानाप्रती आदर दर्शवते. अशा परिस्थितही दलित-मराठा संघर्ष व्हावा म्हणुन प्रयत्नशील असणाऱ्या काही अवलादी ठेचुन मारल्या पाहीजेत.
तु देशमुख, तु पाटील , तु अक्करमाशी , तु बारामाशी, तु कमी पैक्याचा, तु जास्त पैक्याचा, तु बॅन्नव कुळी, तु शह्यान्नव कुळी, तु लेवा पाटील, तु हालका पाटील, असली जळमटं फेकुन देऊन फक्त मराठा या एका शब्दाखाली एकत्र येऊयात.
एक गोष्ट लक्षात ठेवा दोस्तहो,
"अरे हालकं भारी या वस्तु असतात, माणसं नाही" हे माझं वाक्य समाजातील सर्व जातीपातींसाठी आहे.
चलातर मग मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी होऊयात आणि पुन्हा एक इतिहास घडवुयात.
एक मराठा, लाख मराठा.
जयोस्तु मराठा !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २0 सप्टेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६

Friday, September 9, 2016

| श्रीराम आप्पा ©

आज सकाळी लवकर कामानिमीत्त लातुरला निघालो होतो. पांगरीच्या स्टॅण्डवर एस.टी ची वाट पाहत होतो.
महीण्याभरात एकदातरी मी एस.टी प्रवास करतोच. आजही गाडीला आराम देऊन एस.टी ने लातुरला निघालो होतो. नियोजित कार्यक्रम आटोपुन पुन्हा संध्याकाळी खामगांव येथे व्याख्यानासाठी सात वाजेपर्यंत परत यायचे होते.
स्टॅण्डवर आमच्या श्रीराम आप्पांचे एस.टी.उपहार गृह आहे. खुप दिवसानी मी असा निवांत त्यांच्या हाॅटेलात बसलेलो. मी महाराष्ट्रभर फिरतो, गावचे नाव करतो याचा त्यांना नेहमीच अभिमान वाटतो आणि तो प्रत्येक पांगरीकरालाही आहे. श्रीराम आप्पा म्हणजे आमच्या पांगरीच्या खवय्येगीरीसाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध ठिकाण. त्यांच्या हातचे भजे, पुरीभाजी, वडे आणि कप बशीतला घट्ट चहा सर्वांच्या आवडीचा आहे. पांगरीच्या स्टॅण्डवरचा श्रीरामचा वडा खाल्याशिवाय एकाही ड्रायव्हरचा दिवस सुरू होत नाही. आप्पांची हि उपहारगृहाची सेवा माझ्या जन्माआधीपासुनची आहे. जेव्हा पांगरी-बार्शी एस.टी टिकीट दिड रूपया होते, चहा दहा पैशाला, साखर दिड रूपया किलो आणि दुध एक रूपया लिटर होते. तेव्हापासुन अवघं चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन आप्पा या धंद्याकडे वळले.
जेमतेम साडे चारफुट उंची, तिन गुंड्याचा शर्ट आणि ढगळी इजार व भट्टीवर असताना छाटन असा आप्पाचा पोशाख. तापलेल्या तेलात खमंग भजी आणि वडे तळायचा तब्बल चाळीस वर्षाचा अनुभव आहे आप्पांचा. म्हणुनच त्यांच्या हातच्या चवीची उंची त्यांच्या उंचीपेक्षा कईकपटीने मोठी आहे. आप्पांना एकुण दोन मुले राजा आणि सुहास. ती सुद्धा मॅट्रीकनंतर नोकरी करण्या ऐवजी आप्पांचा हाच व्यवसाय पुढे चालवत आहेत. हाॅटेलच्या जागेला महिना पाच रूपये भाडे असताना सुरू झालेला आप्पांचा प्रवास आज पाच रूपयाला एक चहा विकेपर्यंत येऊन पोहचलाय.
तसं पहायला गेलं तर आमची पांगरी खवय्येगीरांसाठी नावाजलेली आहे. भवानी चौकातला गोणेकरचा वडा, येडे आप्पांचा पेढा, कुंभार आणि ताटेंची मिठाई,  उमेश पवार आणि काक्याचे पाव वडे, बाभळेची भेळ,  महादेव पवारचं गुलाब जामुन, अरविंद नानाची बुंदी, शिरीन आणि चंदु मामाचा चहा, निळुभाऊचे कोल्ड्रिंक्स, हामु लाडे आणि पिंटु कदमचा ढाबा, या सर्वांनी पांगरीची खवय्येगीरी जोपासली आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन पांगरीकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या माझ्या पांगरीतल्या या तमाम खवय्येगीरांस माझा सलाम.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१६
वेळ : सकाळी ७ ते ९ ( प्रवासादरम्यान)

Monday, September 5, 2016

| वाडीबुवा ©

झाडं जिवंत असताना ती सर्वांप्रमानेच हिरवीगार असतात. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर सर्व झाडं सारखीच भासतात जणु अंगावरची कापडं उतरवुन उघडीबंब ऊन खात बसल्यासारखी. श्रावणात मात्र हिरव्यागार पानांची वस्त्र परिधान करून डौलाने झुलत राहतात. परंतु हिरवागार शालु पांघरलेल्या डोंगरावर जर एखादं वटलेलं झाड असलं तर ते प्रत्येकाच्या नजरेत भरतं. असंच एक झाड मी गेली दोन वर्ष पहात होतो आज मात्र या स्थळाला आवर्जुन भेट दिली. माझ्या काॅलेजकडे जाणाऱ्या पायवाटेलगतच्या छोट्याश्या टेकडीवर वाडीबुवा म्हणुन दर्गा आहे. याच दर्ग्यापुढं फक्त मातीचा आणि दगडांनी बांधलेला अर्ध ढासळलेल्या अवस्थेतला बुरूज आहे, बुरूजाखाली एक वडाचे मोठे झाड आहे. एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शोभावं असं हे स्थळ परंतु दुर्लक्षीत.
फोटोत जरी हे स्थळ सुंदर दिसत असलं तरी या टेकडीच्या आजुबाजुला राहणारे लोक ह्या टेकडीचा पायथा हागनदारीसाठी वापरतात. वरती दर्ग्याच्या पुढं जुगारीच्या पत्त्यांचा ढिग साचलाय. अस्ताव्यस्त पडलेले दगडी अवशेष आणि फक्त स्वकर्तुत्वार उभी असलेली चारदोन झाडं; एवढंच काय ते वैभव. हा जुना वारसा जतन करण्याचे कधी कुणाच्या मनातही येत नसेल. कदाचीत रोज दृष्टीत पडणारं सौदर्य कालांतराने जुनाट होत जातं किंवा गावातल्या देवाचं फारसं आप्रुप नसतंय म्हणुनही असं होत असावं.
ग्रामिण भारत अशाच जुन्या ठेव्यांची खाण आहे. हा अमुल्य ठेवा जतन करनं आपलं कर्तव्यच आहे. या टेकडीवरचं वाळलेलं झाड जरी फोटोत सुंदर दिसत असलं तरी मोठ मोठी झाडं वटण्याचे प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सैराट चित्रपटातल्या फक्त एका दृष्यामुळं जरी सगळी वटलेली झाडं सेलिब्रीटी झाली असली तरी आजवर त्या झाडाचे गळलेले प्रत्येक पानं; त्यानं पर्यावरणात आजवर दिलेल्या योगदानाची साक्ष देत राहील.
झाडे लावा, झाडे जगवा !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३ सप्टेंबर २०१६
वेळ : सायं ६ ते ७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...