Monday, September 5, 2016

| वाडीबुवा ©

झाडं जिवंत असताना ती सर्वांप्रमानेच हिरवीगार असतात. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर सर्व झाडं सारखीच भासतात जणु अंगावरची कापडं उतरवुन उघडीबंब ऊन खात बसल्यासारखी. श्रावणात मात्र हिरव्यागार पानांची वस्त्र परिधान करून डौलाने झुलत राहतात. परंतु हिरवागार शालु पांघरलेल्या डोंगरावर जर एखादं वटलेलं झाड असलं तर ते प्रत्येकाच्या नजरेत भरतं. असंच एक झाड मी गेली दोन वर्ष पहात होतो आज मात्र या स्थळाला आवर्जुन भेट दिली. माझ्या काॅलेजकडे जाणाऱ्या पायवाटेलगतच्या छोट्याश्या टेकडीवर वाडीबुवा म्हणुन दर्गा आहे. याच दर्ग्यापुढं फक्त मातीचा आणि दगडांनी बांधलेला अर्ध ढासळलेल्या अवस्थेतला बुरूज आहे, बुरूजाखाली एक वडाचे मोठे झाड आहे. एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शोभावं असं हे स्थळ परंतु दुर्लक्षीत.
फोटोत जरी हे स्थळ सुंदर दिसत असलं तरी या टेकडीच्या आजुबाजुला राहणारे लोक ह्या टेकडीचा पायथा हागनदारीसाठी वापरतात. वरती दर्ग्याच्या पुढं जुगारीच्या पत्त्यांचा ढिग साचलाय. अस्ताव्यस्त पडलेले दगडी अवशेष आणि फक्त स्वकर्तुत्वार उभी असलेली चारदोन झाडं; एवढंच काय ते वैभव. हा जुना वारसा जतन करण्याचे कधी कुणाच्या मनातही येत नसेल. कदाचीत रोज दृष्टीत पडणारं सौदर्य कालांतराने जुनाट होत जातं किंवा गावातल्या देवाचं फारसं आप्रुप नसतंय म्हणुनही असं होत असावं.
ग्रामिण भारत अशाच जुन्या ठेव्यांची खाण आहे. हा अमुल्य ठेवा जतन करनं आपलं कर्तव्यच आहे. या टेकडीवरचं वाळलेलं झाड जरी फोटोत सुंदर दिसत असलं तरी मोठ मोठी झाडं वटण्याचे प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सैराट चित्रपटातल्या फक्त एका दृष्यामुळं जरी सगळी वटलेली झाडं सेलिब्रीटी झाली असली तरी आजवर त्या झाडाचे गळलेले प्रत्येक पानं; त्यानं पर्यावरणात आजवर दिलेल्या योगदानाची साक्ष देत राहील.
झाडे लावा, झाडे जगवा !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३ सप्टेंबर २०१६
वेळ : सायं ६ ते ७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...