Saturday, September 24, 2016

| पांगिरा ©

गेल्या दोन दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे आमच्या पांगरीतली गांवनदी, जिला मी आजपासुन "पांगिरा" असं नाव देतोय. ती आज दुथडी भरून वाहत आहे. गेल्या चार पाच वर्षात पुलावरून पाणिच वाहिलं नव्हतं. आज मात्र ते वाहताना पाहुन डोळ्याचं पारणं फिटलंय आणि जुन्या आठवणी त्या पाण्यात पोहायल्यात.
गेल्या कित्येक दशकांपासुन गावच्या पाण्याची तहाण भागवणारी हि नदी निनावी वाहत आहे. कदाचित तिला एखादे जुने नांव असेलही परंतु आजपर्यंततरी मला तसा दाखला कोणी दिला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नदीला विशिष्ठ अशी नावे आहेत पण माझ्या पांगरीतल्या या नदीला विशिष्ठ असं नाव नाही याची खंत खुप वर्षापासुन मनात होती. म्हणुनच आज मी तिचं  "पांगिरा" हे अर्थपुर्ण नांव देऊन बारसं करतोय. सगळ्या गावाची घान पोटात घेऊन, गावकऱ्यांची वरदायिनी ठरलेल्या या नदीशी माझी नाळ खुप घट्ट जोडलेली आहे. माझ्या लहाणपणीच्या कित्येक सकाळ आणि दुपार श्रीरामपेठेतील दऱ्याबुवा जवळच्या ढवात पोहण्यात घालवल्यात. डोळे लाल होईपर्यंत पोहणे हा जणु छंदच जडलेला. याच नदीत दसऱ्यात घरातल्या फळ्या धुताना आणि पोळ्यात गोठ्यातली जनावरं धुताना विशेष आनंद व्हायचा. आई कापडं धुवायला मसुबाच्या पिंपळाजवळच्या खडकावरं गेली कि तिच्या मागे लागुन पोहायचा हट्ट धरायचो. "माझ्या डोळ्यादेखतंच पोहायचं, जास्त खोल ढवात जायचं नाही" या अटीवर ती मला सोबत घेऊन जायची. मला पाण्यात पोहायला आमच्या आप्पा मामांनी शिकवलं पण जिवनात पोहायला आईनंच शिकवलं.
आल्मासच्या दुकानातुन आठाण्याचा गळ आणायचा मग दावणं (गांडुळ) शोधण्यासाठी जनावराच्या दवाखान्यातल्या वडाखाली दलदलिच्या जागेत खांदुन तिथले दावणे पकडुन ते गळात गुंफायचे. एक काचीदोरा आणि महानंदीचं एक जाड लाकुड घेऊन याच पांगिरा नदीवरच्या पुलावर दुपारपर्यंत मासं पकडंत बसायचं. बहुतांशी चिंगळ्याच सापडायच्या पण एखादा मोठा मासा गळाला लागला की "अयऽऽऽ मरीआईचा डोकडा सापडला...हुर्ररे" करून आनंद व्यक्त करायचा. दहा-बारा चिंगळ्या आणि दोन-चार डोकड्यांची आमची पार्टी मस्त रंगायची. कोणी तेल आणायचं, कोणी तिखट आणायचं तरं कोणी पातेलं आणायचं मग हे सगळं दगडाच्या चुलीवर शिजवुन खायचं. नाहिच काही जमलं तर थेट भाजुन खायचं. ईसल्या(मी) राहुल्या, पिंट्या, महाद्या, इनुद्या, शऱ्या, सच्या, सुहास्या, आतुल्या हि आमची पांगरीची गँग मासं पकडायला, चिंचा फोडायला, पोहायला, आंबे खायला, सायकलीवर निळोबाला जायला नेहमीच सोबत असायची. हि माझ्या भुतकाळातील पांगिराची  आठवण परंतु वर्तमानातली पांगिरा जरा वेगळीच आहे.
पांगरी पंचक्रोशीची वरदायीनी ठरलेल्या या पांगिराची आजची परिस्थिती पाहिली तर; आजमितीला गावातल्या सर्व गटारी इथेच येऊन संपतात, ज्यांच्या घरी शौचालये नाहीत ते सगळे इथेच येऊन हागतात, गावात सर्वात जास्त वापरली जाणारी मुतारी इथेच आहे, ज्यांच्याकडे उकिरडा नाही ते सगळा कचरा इथेच टाकतात. एका समाजाचा मसनवाटाही इथेच आहे. गावात कोठेही लग्न कार्य असो उष्ट्या आणि थर्माकाॅल व प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा ढिग इथेच पडतो, आणि हिच ती पांगिरा सगळ्या पांगरीची घान स्वतःच्या पोटात घेऊन पावसाळ्यात जणु साबण लावुन धुतल्यासारखी स्वच्छ होते. पुलावरचे पाणी ओसरल्यावर त्या स्वच्छ जागेवर पुन्हा पहाटेच कुणीतरी हागुन जाते. ती मात्र संथगतीने वाहतच राहते गावासाठी आणि तहानलेल्या घशांसाठी...

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २४ सप्टेंबर २०१६
वेळ : सकळी १० ते १२

1 comment:

  1. गाव डोळ्यासमोर उभा राहिला

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...