Friday, September 9, 2016

| श्रीराम आप्पा ©

आज सकाळी लवकर कामानिमीत्त लातुरला निघालो होतो. पांगरीच्या स्टॅण्डवर एस.टी ची वाट पाहत होतो.
महीण्याभरात एकदातरी मी एस.टी प्रवास करतोच. आजही गाडीला आराम देऊन एस.टी ने लातुरला निघालो होतो. नियोजित कार्यक्रम आटोपुन पुन्हा संध्याकाळी खामगांव येथे व्याख्यानासाठी सात वाजेपर्यंत परत यायचे होते.
स्टॅण्डवर आमच्या श्रीराम आप्पांचे एस.टी.उपहार गृह आहे. खुप दिवसानी मी असा निवांत त्यांच्या हाॅटेलात बसलेलो. मी महाराष्ट्रभर फिरतो, गावचे नाव करतो याचा त्यांना नेहमीच अभिमान वाटतो आणि तो प्रत्येक पांगरीकरालाही आहे. श्रीराम आप्पा म्हणजे आमच्या पांगरीच्या खवय्येगीरीसाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध ठिकाण. त्यांच्या हातचे भजे, पुरीभाजी, वडे आणि कप बशीतला घट्ट चहा सर्वांच्या आवडीचा आहे. पांगरीच्या स्टॅण्डवरचा श्रीरामचा वडा खाल्याशिवाय एकाही ड्रायव्हरचा दिवस सुरू होत नाही. आप्पांची हि उपहारगृहाची सेवा माझ्या जन्माआधीपासुनची आहे. जेव्हा पांगरी-बार्शी एस.टी टिकीट दिड रूपया होते, चहा दहा पैशाला, साखर दिड रूपया किलो आणि दुध एक रूपया लिटर होते. तेव्हापासुन अवघं चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन आप्पा या धंद्याकडे वळले.
जेमतेम साडे चारफुट उंची, तिन गुंड्याचा शर्ट आणि ढगळी इजार व भट्टीवर असताना छाटन असा आप्पाचा पोशाख. तापलेल्या तेलात खमंग भजी आणि वडे तळायचा तब्बल चाळीस वर्षाचा अनुभव आहे आप्पांचा. म्हणुनच त्यांच्या हातच्या चवीची उंची त्यांच्या उंचीपेक्षा कईकपटीने मोठी आहे. आप्पांना एकुण दोन मुले राजा आणि सुहास. ती सुद्धा मॅट्रीकनंतर नोकरी करण्या ऐवजी आप्पांचा हाच व्यवसाय पुढे चालवत आहेत. हाॅटेलच्या जागेला महिना पाच रूपये भाडे असताना सुरू झालेला आप्पांचा प्रवास आज पाच रूपयाला एक चहा विकेपर्यंत येऊन पोहचलाय.
तसं पहायला गेलं तर आमची पांगरी खवय्येगीरांसाठी नावाजलेली आहे. भवानी चौकातला गोणेकरचा वडा, येडे आप्पांचा पेढा, कुंभार आणि ताटेंची मिठाई,  उमेश पवार आणि काक्याचे पाव वडे, बाभळेची भेळ,  महादेव पवारचं गुलाब जामुन, अरविंद नानाची बुंदी, शिरीन आणि चंदु मामाचा चहा, निळुभाऊचे कोल्ड्रिंक्स, हामु लाडे आणि पिंटु कदमचा ढाबा, या सर्वांनी पांगरीची खवय्येगीरी जोपासली आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन पांगरीकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या माझ्या पांगरीतल्या या तमाम खवय्येगीरांस माझा सलाम.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१६
वेळ : सकाळी ७ ते ९ ( प्रवासादरम्यान)

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...