Friday, January 20, 2017

| रानटी मच्छी ©

आज रानात आमच्या आण्णानी जेवायचा बेत केलता. त्यंच्या हातची मच्छी खाणं म्हंजी जेवायचा शिन निघाल्यासारखंच. रानातल्या शेततळ्यात सांच्याला त्यंला सुपरनिस घवलं व्हतं, म्या नेटकंच कालेजातुन घरी आल्यावर आज रानात यं जेवायला मनलं. लई दिसातुन आज रानात जेवाय जायचा बेत झालता. बारक्यापणी आण्णा संग हिरू व्हंडावर टाकीवर बसुन  रानात जायचु. तवा चुलवानाला फकस्त जाळ लावायचं काम आसायचं. आण्णा आन् आजिनाथ भऊ कांडाकुटा करायचं, आन्या मगर जाळायला सरपान हुडकायचा, ह्ये समदं बारक्यापणीच्या सई आज पुन्ह्यादा जित्या झाल्या.
ईतकी वरीस गिली पण आण्णाची शेतातल्या गड्यांसोबत पार्टी करायची परंपरा सुरूच हाय. आजची भाजीबी एकदम फुर्रर्रका माराय सारखी झाल्ती काला कुस्करून दोन भाकरीचा फडशा पाडला तुंडी लावायला रानातल्या वावरातलं पातीचं कांदं व्हतं. खरंच रानातल्या वाऱ्यातच भुक लागायचं रसायन आसतंय का काय कुणास ठऊक. गेल्या दोन दिसापसुन रोजच्या फिरण्यानं आन् जागरणानं पोटातलं पित्त उसळलं व्हतं पण रानात जेवाय आलु आन् मच्छीवर जब्बराट ताव मारला पित्त कुठच्या कुठं गायब झालं राव.
कालंच म्या समुद्रातला सुरमई मासा खाल्ला व्हता आन् आज आण्णाच्या हातचा सुपरनिस; दुनिबी मासं खायला भारी पण त्या माशाचा रस्सा प्यावा तर फकस्त आण्णानं क्येलेल्या भाजीचाच. आण्णा माझं चुलतं हायतं पण जन्मल्यापसुनच त्येनी मला बारक्या भावागत वाढीवलंय त्येज्यामुळं कधी मधी आमच्यात पार्ट्या चलत्यात्या. बारक्यापणी म्या घरात समद्यात जास्त आण्णाला घाबरायचु. पण आण्णा जितक्या रागानं मला हुंबवायचं तितक्याच पिरमाणं जेवायलापण घालायचं. आजसुद्धा रानात एकांदी शिकार घवली की रातीचा बेत फिक्स आसतुय.
आता आमचं जेवान संपलंय, राह्यल्याली आमटी फुरक्या मारून पिऊन टाकली, नाकातलं पाणी टपा-टपा गळुस्तोर जेवणावर ताव मारलाय, आपापली ताटं पण धुवुन झाल्याती. चुलवानात राह्यलेल्या आरावर तापत बसलोय आन् सोबतच ह्या रानटी मच्छी चा बेत मोबाईलवर टाईपीत बसलोय. गार-गार थंडीत गोधडी आणि घुंगडी घुमटुन दुमता हुन पडलोय आता सकाळी डोळ्यावर ऊन येत नाय तवर काय म्या उठत नाय.
सुभ्रात्री !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २० जानेवारी २०१५
वेळ : रात्री ९ ते १० वाजता

Sunday, January 15, 2017

| भाकरीचा 'मुटका' ©

काल सक्रात व्हती. पुरणपोळ्याचा सयपाक आन् तिळगुळ खाऊन-खाऊन त्वांड ग्वाड झ्यार पडलं व्हतं. आज कालेजला निघाल्यावर आई चुलिवर भाकऱ्या भाजताना दिसली. रोज थोडा का हुईना पण नाष्टा करूनच कालेजला जात असतुय मी. पण आज फकस्त भाकऱ्याच झाल्या व्हत्या; भाजीला जरा टायम व्हता पण मला जायची गडबड, तेवढ्यात आई मनली "आरं थांब की भाजी करते, थ्वाडा तरी दम हाय का रं तुज्या जिवाला...नाहीतर जाऽऽ मग मुटका खाऊन" आईचा पर्याय झ्याक व्हता. म्या बी लगीच सयपाक घरात जाऊन समदं डबं आईपशी आणलं. टम फुगल्याली भाकरी आरावरून काढली आन् आईला मुटका कराय लावला.
भाकरीचा मुटका माझ्या लई आवडीचा परकार हाय. "पसरल्याली गोष्ट जवा गोळा व्हती तवा तिला 'मुटका' म्हणत्यात" हि डिफीनीशन माजी म्याच तयार केल्याली हाय. ह्यो शब्द तसा लईच कमी वापरत्यात पण पवायला गेल्यावर मुटक्याबीगीर मज्याच नाही. ह्ये आपलं पसराट शरिर गोळा करून उचावरून हिरीत उडी हाणायची आण मग हिरीच्या कोरड्या दगडाला पाण्याच्या शितुड्यांनी चिंबाट करून टाकायचं. आसाच असतोय भाकरीचा मुटका; चुलिच्या आरावर भाजलेल्या भाकरीचा पापुडा काढुन त्येच्यावर तेल मिठ आन् शेंदाण्याची चटणी टाकुन चिंबाट करून टाकायचा आन् मग बाजुला काढल्याला खमंग पापुडा झाकुन भाकरीचा मुटका करायचा म्हंजी गोल रोल करायचा. ना भाजीची गरज ना आमटीची फकस्त मुटका जिंदाबाद. आईनं केलेल्या आखंड एका भाकरीचा आपुट मुटका म्हंजी एक जेवणंच म्हणायचं चार पाच तास तर भुक नाय लागत. ह्यो आसला रानटी आहार खातुय म्हणुनच भिंगरीसारखा फिरतुय नाहीतर म्हागंच इंजन काम निघालं आसतं.
कायबी मना पण आईच्या हातच्या भाकरीच्या मुटक्यापुढं नाष्ट्याचं समदं परकार फिक्काट हायत बगा....

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १५ जानेवारी २०१७
वेळ : सायंकाळी ४ ते ४:३० वाजता

Saturday, January 14, 2017

| फांदी ©

आज सायंकाळी संक्रांतीनिमित्तानं आमच्या आईने शेतातल्या समाध्यांना कसलातरी निवद दाखवायचा होता म्हणुन आमच्या लाड शेतात जाण्याचे फर्माण सोडले. आम्हाला एकुन दोन शेतं; एक डोंगरमळा आणि दुसरं लाड शेत. पांगरीपासुन दोन्हीही जवळच आहेत, यापैकी डोंगरमळ्यात जाण्याचा योग नेहमीच येतो पण लाड शेतात आम्ही कधीतरीच जातो. सध्या ते शेत आजिनाथ भऊला बटईने दिले आहे. माझ्या जन्माआधीपासुन आजिनाथ भऊ आमचं शेत करतात. माझं बहुतांशी बालपण लाड शेतातच गेलंय त्यापैकी विहिरीजवळच्या चिंचेच्या झाडाचा आणि माझा विशेष संपर्क होता. तसं हे झाडं खुपच जुणे आहे. कारण मी लहान असताना आमच्या पणजोबाला विचारले होते; हे झाडं कुणी लावलंय म्हनुन तेव्हा त्यांनी सांगीतलं होतं की मला नाय आठवत. माझ्या आधीच्या चार पाच पिढ्या तर या चिंचेच्या सावलीत नक्कीच खेळल्या असतील परंतु आता मात्र हि चिंच जिर्ण झाली आहे. खुप दिवसांनी भेटल्यावर एखाद्याला कडकडुन मिठी मारावी अगदी तशी मिठी मी या चिंचेच्या त्या फांदीला मारली ज्या फांदीवरून मी कित्येकदा पडलो, तिच्यावर चढलो, लोंबकाळलो, गाबुळ्या चिंचा खाण्याच्या नादात कधी वरकांडलं, कधी खरचटलं तर कधी थेट जमिनीवरही आपटलो पण त्या फांदीचा आणि माझा स्नेहच वेगळा होता. जमिनीपासुन सर्वात कमी उंचीवरच्या या फांदीवर चढुन सगळ्या झाडावर फेरफटका मारता येतो. अगदी चालण्याचा दुपदरी रोड म्हटलं तरी हरकत नाही. सुरपारंबा खेळताना तर या फांदीवरून कसलाही आधार न घेता पळता येईल एवढ्या रूंदीची खोडं या चिंचेला आहेत.
आमच्या शेताच्या ऐतिहासिक वारश्यापैकी हे झाडं एक आहे. जवळ-जवळ अर्धा एकर शेत या एकट्या चिंचेने व्यापुन टाकले आहे. या चिंचेचा बुंधा जणु शरिरसौष्टव स्पर्धेतल्या पैलवाणाच्या दंडासारखा पिळदार आहे. आणि फांद्यांचा पसारा जणु सौदर्य स्पर्धेतील सुंदरीच्या बटांसारखा आहे. या चिंचेला शेकडो फांद्या आहेत परंतु माझ्या आवडीची ती एकच फांदी आहे जी मला त्या झाडावर चढण्यास मदत करते. तिचा आणि माझा जिव्हाळा गेल्या कित्येक वर्षाचा आहे परंतु ती अजुनही मला विसरली नाही. आजही शेतात गेल्यावर मी या फांदीवर चढलो, फिरलो, आणि निवांत बसलो. एखाद्या आईने लेकराला कवेत घ्येतल्यावर जो अनुभव असतो त्यासम आनंद मला तेव्हा वाटला. लहानपणी झाडावर चढाई केल्याचा आनंदच निराळा होता परंतु आज त्यातुन काहीतरी शिकण्याची दृष्टी मिळाली आहे. चिंचेच्या झाडावरतर या फांदीसारख्या आणखीणही असंख्य फांद्या होत्या परंतु जमिनीवरच्या लेकराला उंचावर जाण्यासाठी एक मदतीचा हात देण्याची वृत्ती त्यांच्याकडे नव्हती म्हणुनच माझा लळा त्या फांदीशी अधिक होता जिने मला वर जाण्यास मदत केली.
आपल्या आयुष्यातही सभोवताली अशी अनेक माणसे  आपल्यापेक्षाही जास्त उंचीवर असतात त्यापैकी काहीच आपल्याला मदतीचा हात देतात तर काही फक्त आपली मजा बघत बसतात. परंतु ज्यांनी आपल्याला वरती जाण्यास मदतीचा हात दिला आहे तेच हात आपण यशोशिखर गाठल्यावरही कधीतरी हातात घेऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे हेच खरे यश असते.
आज मी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराची यशस्वी चढाई करून परत आल्यावर ज्या फांदीने मला चढाई शिकवली तिच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली. झाडाला मन असतं का नसतं मला माहीत नाही पण ती सजिव असतात हे नक्की आणि सजिवांना संवेदनाही असतात म्हणुनच हा शब्दप्रपंच.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १४ जानेवारी २०१७
वेळ : सायंकाळी ५ ते ६ वाजता

Thursday, January 5, 2017

| कळसुबाई ©

सोलापुरच्या ईकोफ्रेन्डली क्लबने आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत मोहिमेत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन नववर्षाचा संकल्प केला. आजवर फक्त जनरल नाॅलेज म्हणुन पुस्तकात वाचलेली गोष्ट आज पायाखालुन घातली. खरंतर ट्रेकिंगचा मला फारसा अनुभव नव्हता परंतु ईको फ्रेन्डली टिमने त्याचे प्रशिक्षण दिल्याने हि मोहिम फत्ते करण्यास मदत झाली.
माणुस कितीही कष्ट करायला तयार असतो, धोका पत्करायला तयार असतो फक्त त्याला तसे स्वप्न दाखवावे लागते. माझंही असंच काहीतरी झालं, दिड वर्षापुर्वी परशुराम कोकणे आणि एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च उंचीवर बोलण्याचे स्वप्न दाखवले आणि आज ते स्वप्न पुर्ण झाले. स्वप्न पाहण्यापासुन ते सत्यात उतरण्यापर्यंतचा कालखंड प्रेरणादाई असतो आणि तितकाच जोखमीचाही.
कळसुबाई मोहिमेवर जायचं म्हणुन गेल्या पंधरवड्यापासुन माझ्या काॅलेज प्रक्षेत्राच्या बालाघाट डोंगररांगात रोज चार किलोमिटर चालण्याचा सराव करत होतो. दिनांक ३१ डिसेंबरला सुरू झालेली पायाची भिंगरी १ जानेवारी रोजी कळसुबाई सर करूनच थांबली. या आधी गड किल्ले चढाई केलेली पण शिखर सर करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातुन शिखराकडे उंच मान करून पाहताना चालण्याचा अंदाज येत नव्हता पण जस जशी पाऊले पडायली तस तशी त्या शिखराची भव्यता लक्षात येऊ लागली. सह्याद्रीची विशालता अनेक शिवचरित्रांतुन वाचुन अनुभवलेली परंतु आज ती साक्षात अनुभवायला मिळाली. उंचावर गेल्यावर नजर तर मोठी होतेच शिवाय स्वप्नही मोठी होतात. अवाढव्य काळ्या पाषाणातुनही माणसाने पाडलेली वाट कठिण संकटांमधुन मार्ग काढण्याची शिकवण देते. वाऱ्याच्या प्रचंड वेगात सुद्धा चालत राहण्याची सवय प्रवाहाविरूद्ध लढण्याचे बळ देते, शरिरातली सर्व ताकत संपुन पायाला क्रॅम्पस येतात, शरिर घामाने चिंब होतं, तोंड कोरडं फट्ट पडतं, तळपाय पांढऱ्या पालीसारखे होतात आणि अशा स्थितीत उंच शिखरावर फडकणारा भगवा ध्वज दिसतो आणि सर्व गोष्टी विसरून पाऊल पुढं पडतं हे सारं माझ्यासाठी अविस्मरणीय होतं.
मोहिमेत साडेचार वर्षा पासुन शहात्तर वर्षापर्यंतचे सत्तरहुन अधिक गडप्रेमी सहभागी झाले होते. सर्वच आपापल्या परिने चढाईचा प्रयत्न करत होते. कधी कधी माझ्यापेक्षाही कमी व जास्त वयाची माणसं मला ओव्हरटेक करायची तेव्हा स्वतःच्या शरिराला तुझं वय किती? असा प्रश्न विचारावासा वाटायचा. खरंच एखादं शिखर सर करण्याचा प्रवास म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अभिमानाचाच क्षण असतो कारण प्रचंड उर्जा खर्च करून त्याच्या दुपटीत ती मिळवण्याचे यासारखे दुसरे माध्यम नाही.
कळसुबाई डोंगराच्या पायथ्यापासुन शिखरापर्यंतची सात किलोमिटरची खडी चढण पार करायला मला चार तास वेळ लागला अखेर दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी १ वाजुन १८ मिनिटांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर मी माझं पहिलं पाऊल टाकलं. चढाई करताना शरिरातुन संपलेली उर्जा त्या एका पाऊलानं भरून निघाली. घामाने डबडबलेलं शरिर वाऱ्याच्या वेगाने वाळुन गेलं, सभोवतालचे क्षितिज पाहताना डोळ्यांची बुबुळं रूंदावली, शुद्ध ऑक्सिजन फुफ्फुसात भरून बोलण्यासाठीची शक्ती एकवटली. कळसुबाईचे दर्शन घेतले आणि पुढील कार्यक्रमास सुरूवात झाली.
ईकोफ्रेन्डली क्लब आयोजित नववर्ष दिनदर्शिकेचे अनावरण, संभाजी भोसलेंचा वाढदिवस, डाॅ.अरविंद कुंभार सरांचा सन्मान, महेन्द्र राजेंचे चित्र, मनोज देवकरांच्या मुलाचं बारसं, शिवछत्रपतींच्या आणि भारतमातेच्या घोषणा, संविधानाचे वाचन, माझे व्याख्यान, सोनवणे महाविद्यालयाचा झेंडा आणि गायक सोनकर मॅडमच्या वेडात मराठे हे गाणे या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
हि मोहिम यशस्वी करण्यासाठी अरविंद म्हेत्रे, मनोज देवकर, परशुराम कोकणे, भाऊराव भोसले आणि डाॅ. संभाजी भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच हे शिखर सर करताना बाळा, विश्वास आणि अभय या पंढरपुरच्या पोरांनी मला खुप मदत केली. हे सर्व क्षण शिखराएवढ्याच उंचीच्या खोलीवर माझ्या ह्रदयात कोरले गेलेत. सर्वोच्च उंचीवर पोहचण्याचे स्वप्न पुर्ण झालंय आता त्याच उंचीवरून पाहिलेली स्वप्न पुर्ण करण्याचा प्रवास पुन्हा सुरू झालाय...

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १ जानेवारी २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...