Wednesday, July 12, 2017

| सरपन ©

आज रोडवरून जाता जाता रस्त्याच्या कडेला तीन लहाण मुली स्वतःच्या छोट्याशा भावासह सरपन वेचताना दिसल्या. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी चुलवनाला जळण पाहिजे म्हणुन त्या लाकडाची सोय  करत होत्या. जवळच दोन झोपड्या होत्या त्या झोपडीत त्यांचे कुटुंब राहते. फिरस्तीमुळे शाळा बिळाच्या भानगडीत बहुधा त्या नसाव्यात. पोरगी झाली तर घरकामासाठी आईला मदत करणे आणि पोरगं झालं तर गुरे ढोरे राखण्यात बापाला मदत करणे एवढंच काय ते करिअर त्यांच्या हाती असतं.
हे सरपन गोळा करताना या लेकरांच्या मनात फक्त चुलीची सोय करने एवढेच काय ते डोक्यात असते परंतु ज्या देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा आहे त्याच देशात अशा लेकरांना हि कामे देणे कितपत योग्य आहे याचा विचार पालकांनी करावा.
अशिक्षीत माणसांची अवस्था देखील वाळलेल्या लाकडासारखी असते पडलेलं दिसलं की कुणीबी जळणासाठी वापरू शकतं. परंतु शिक्षित माणसांच्या आयुष्याला यशाची फळं लागतात ज्याच्यावर ईतरही माणसं जगु शकतात. हे उमगण्यासाठीही शिक्षणच असावं लागतं नाहीतर अशा हजारो काट्या मोडुनही जगण्याचं मर्म त्यात सापडत नाही.
परिस्थितीने आपण कितीही गरिब असलो तरी शिक्षणाने श्रीमंत असायला हवं कारण परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणातच असते.
ज्या प्रकारे हातातल्या लाकडाच्या फांदीला अनेक फाटे असतात तसेच ते आयुष्याला सुद्धा असतात परंतु कडेचे लहान थोर सगळे फाटे तोडुन आपण जो सरपनाचा ढिग लावतो अशीच काहीशी अवस्था आपण आपल्या आयुष्याचीही करून घेत असतो.
अनेक पर्याय उपलब्ध असतानाही सर्वांना फाटा देऊन आम्ही पुन्हा तेच ते पारंपारीक काम करत राहतो. आजवरचं आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, बिजनेस, कल्चर, रितभात काहीही असो परंतु शिक्षणापासुन जर ते वंचीत ठेवत असेल तर आपणच आपल्यावर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. त्या पोरींशी थोडावेळ संवाद साधुन घरी गेल्यावर "आई बाबांना शाळेत घालण्याचा हट्ट करा" असे सांगुन त्यांच्या होकारार्थी मानांचा ईशारा पाहत-पाहत मी पुढे निघालो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : १२ जुलै २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...