Saturday, July 8, 2017

| रिकामी जागा ©

फोटोतली हि जागा आहे उक्कडगांवच्या माळावर राहणाऱ्या महादु हागवणे यांची. मी त्यांना प्रेमाणे भऊ म्हणतो. माझ्या काॅलेजला जाण्याच्या रस्त्यालगतच त्यांचा कोटा आहे. शेरडं कोंबड्या आणि उसाचा फड अशी त्यांची प्राॅपर्टी. मी गाडीवर काॅलेजला जाताना भऊचा मला ठरलेला राम राम असायचा. पैलवानी शरीर यष्टी, धोतरावर तिन गुंड्याचा ढवळा सदरा, पायात कातडी चप्पल आणि डोक्यावर गुलाबी फेटा असा रूबाबदार पोहरावात कोट्याजवळच्या एका मोठ्या दगडावर हातात काटी घेऊन भऊ निवांत बसलेलं असायचं.
एकदा माझ्या गाडीखाली त्यांचा बेण्याचा कोंबडा आला होता. मला वाटलं जखमी झाला असल पण तो ठार झाला होता. माघारी येताना वाटलं; भऊ आता त्याची भरपाई वगैरे घेतात का काय पण हाक मारून त्यांनी मला त्याच कोंबड्याच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. तुमच्याकडुन मेला म्हणुन खायला तरी मिळाला नायतर आम्ही नसता कापला. त्यांच्या या दिलदारकीने मला जिंकलं होतं. जर बाजारा दिवशी कधी ते गावात आलं तर माझ्या गाडीची वाट पाहत बसायचे मग त्यांना त्यांच्या कोट्यावर सोडुनच मी पुढे काॅलेजला जायचो.
जेव्हा केव्हा मी त्या वाटेवरून गेलो तेव्हा तेव्हा तो दगड आणि त्यावर बसलेलं भऊ हे गणित ठरलेलंच असायचं. आज नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच काॅलेजवर निघालो तोच रस्त्यावरून एक टमटम येताना दिसलं मी हळुच मागच्या हाऊदात पाहीलं तर भऊ निपचीत पडुन होते. मी थांबलो आणि विचारलं काय झालंय त्यावर त्यांच्या भावाने रडत रडत सांगीतलं. "भऊला अटॅक आलता सर, डाक्टरकडं न्हिऊस्तोवरच जिभ बाहीर टाकली...मोठ्याने रडता रडता....भऊ गेलं सर" हे शब्द ऐकुण क्षणभर ह्रदय थांबल्यासारखं झालं, डोळ्यात पाणी साकाळलं. आज अचानक असं काही होईल हे मनाला पटत नव्हतं. सत्तर पंच्चयाहत्तर वय असणारे भाऊ एखाद्या मराठी चित्रपटात सावकार शोभतील अशा व्यक्तीमत्वाचे परंतु झाडाचं पान सहज गळुन पडावं तसं आज ते जिंदगीच्या झाडावरून निखळले.
विधात्याने आपल्याला किती आयुष्य दिलंय माहित नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत दिसणाऱ्या व भेटणाऱ्या हर एक माणसाला सन्मान देऊन मनाची श्रीमंत मिळवणं हिच खरी माणुसकी होय हे त्यांच्याकडुन शिकायला मिळालं, नाहितर आपलंही वागणं आणि जगणं किड्या मुंग्यांसारखं होऊन जाईल; कधी, कुठे आणि कसं मेलं हे देखील लक्षात राहणार नाही.
भऊच्या निर्जीव देहाकडे पाहुन माझ्या डोळ्यातील अश्रुंनी श्रद्धांजली अर्पन केली आणि गाडीची किक मारून पुन्हा त्याच रस्त्याने काॅलेजकडे निघालो. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आज खंडीत झाली होती. काल सायंकाळी येताना ज्या जागेवरून भऊंचा अखेरचा राम राम झाला होता ती रिकामी जागा इथुन पुढे सदैव सलणार होती..

लेखक : प्रा. विशाल गरड
दिनांक : ०८ जुलै २०१७

2 comments:

  1. पैशापेक्षा माऩुस आणि माणुसकी महत्वपूर्ण आहे.ती जपलीच पाहीजे.
    खुपच छान अनुभवी लेख सर

    ReplyDelete
  2. पैशापेक्षा माऩुस आणि माणुसकी महत्वपूर्ण आहे.ती जपलीच पाहीजे.
    खुपच छान अनुभवी लेख सर

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...