Wednesday, July 5, 2017

| वेळ ©

आज बऱ्याच दिवसांनी पांगरीच्या स्टॅण्डवर राहुलच्या टपरीमध्ये बसलो होतो. निवांत ईकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. स्टुलवर बसुन बालु कुंभार वजन कमी करण्यासाठी "सर, तुम्ही सोयाबीन मधलं गवत काढायला जात जावा" असंल काहीचे काही भन्नाट नुस्खे सांगत होता. तेवढ्यात टपरीवर फेसबुकवर हवा करणाऱ्या एस.आर भैची एन्ट्री झाली. हाताला सतत फेव्हिस्टीकने चिकटवल्यासारखा ऑप्पोचा मोबाईल आणि मोबाईलसारखीच शरिरयष्टी असणारा सद्दाम रईस उर्फ एस.आर भै स्क्रिनला बोटाने स्र्काॅल करत करत राहुल सोबत संवाद साधु लागला. कमेंन्ट, लाईक, ब्लाॅक, हॅक, रिपोर्ट, आॅनलाईन, डाटा, जियो, शेअर, फाॅलोअर्स, टॅग अशा मोबाईल साहित्यातील शब्दांनी टपरी हाऊसफुल्ल झाली. मी खुर्चीवर बसुन निवांत या मोबाईल अॅडिक्टेड युवा पिढीच्या संवादाचा आस्वाद घेत होतो. एस.आर भैचा सोशल मेडीयातला गाढा अभ्यास पाहता जर त्याने पारंपारिक शिक्षण सोडुन मोबाईल जगतातले काही शिक्षण घेतले असते तर नक्कीच गोल्ड मेडल मिळवलं असतं असं वाटलं.
अरे एस.आर तु दिवसातला किती वेळ मोबाईलवर घालवतोस ? असे जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा तो मला म्हणाला आहो विशाल सर, अख्खा दिवसच ह्येज्यात घालिवतो. त्याच्या या उत्तरावर राहुल आणि मी पोटभरून हसलोत. पुढे तो आणखीन बोलु लागला. अहो सर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल डवचवाच लागतो नाहीतर चैन पडत नाही. राडा करणारा रव्या, पांगरीचा पिल्या, महाराष्ट्राची लाडकी क्वीन आरोही, पप्याचा लाडका आरू, आण्णांचा लाडका गण्या, जाळ धुर करणारा परशा ह्यांच्या पोष्टला लाईक करूनच आपल्या दिवसाची सुरूवात व्हती.
त्याचे हे बोलणे ऐकुन खरंच सोशल मेडीयाने सध्याच्या युवा पिढीवर किती जम बसवलाय हे अधोरेखीत झाले. कुणाला किती लाईक मिळाल्या, कुणाचा फोटो एडीट करायचा, कुणाला शुभेच्छा द्यायच्या, किती जणांना स्वयंघोषित नेते करायचे, कुणाचा वाढदिवस साजरा करायचा हाच विचार सध्याच्या युवा पिढी मध्ये जास्त रूजताना दिसतोय. फेसबुकच्या अभासी दुनियेत लाईक मिळवण्यासाठीची धरपड करताना अॅटोलाईक सारख्या साॅफ्टवेअरवरून फोटो सोडुन वन के, टु के लाईक मिळवण्यातही बरेच युवक गुंतले आहेत तर काहीजण पोरींच्या फेक अकाऊंटवर रात ना दिन चॅटींग करू करू झुरत आहेत. हे सारं तत्वज्ञान आज एस.आर भै सोबत मारलेल्या गप्पांमधुन समजलं. हे वास्तव खरंच फार भयानक आहे. अभ्यास सोडुन अॅण्ड्राॅईडवर प्रचंड वेळ खर्चीणाऱ्या युवक वर्गाने सोशल मेडीयाचा वापर सोसल एवढाच करणे हितावह ठरेल. हि सगळी बिऱ्हाडं व्यक्त होण्यासाठी, कला प्रदर्शित करण्यासाठी किंवा मैत्री जपण्याचे माध्यम म्हणुन वापरणे ठिक आहे परंतु यालाच जर कोणी बेसिक निड म्हणुन स्थान देत असेल तर भविष्यात आपला खुप मोठा कार्यक्षम वेळ याच्यासाठीच खर्ची पडेल हे नक्की. आपण वेळेत पैसे कमवु शकतो पण पैशाने वेळ नाही कमवु शकत; कारण वेळ हा फक्त घालवण्यासाठीच असतो. तेव्हा तो कुठे, कसा, किती व का घालवायचा हे समजलं की यशाची सारी गणितं सहज सुटतात.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ जुलै २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...