Sunday, July 16, 2017

| छपरातला वकील ©

मेडीला बांदाट्या बांधुन त्येज्यावर ऊसाचं पाचट हाथरून तयार केलेल्या छपरात एक वकील राहतंय त्यजं नांव श्रीरंग लाळे.
व्हय, ह्यो हाय माझा मोहोळ तालुक्यातील घाटने गांवचा जिवा भावाचा दोस्त. तब्बल तिन डिग्र्या घिऊन आवड म्हणुन छपरात राहतोय. म.फु.कृ.विद्यापिठातुन बी.एस्सी.अॅग्री, आय.एल.एस काॅलेजमदुन लाॅ आन् इग्नु मधुन एम.ए केलंय त्येनं. अभ्यासाचं आन् फिरायचं गड्याला लई याड हाय. हे समदं शिक्षण घ्यात घ्यात वडलांच्या आन् भावाच्या साथीनं हजार दिड हजार टन ऊसाचं उत्पन्नबी शेतात घेतोय. गावात ह्येजा मोठा वाडा हाय पण ह्याला आसंच रानात राहायला आवडतंय. काल मी व्याख्यानाला मोहोळला गेल्तो तेव्हा येताना या दोस्ताच्या छपरातला गावरान पाहुणचार घिऊनच मग गावाकडं आलो.
मी येणारंय हे कळल्यापसुनच बहाद्दरानं समदा बेत आखुन ठिवला व्हता. म्या कायबी कारणं सांगीतली तरी टाळणं आवघाड व्हतं तवा जाता जाताच त्येला सोबतीला घिऊन व्याख्यान आटपुन आलो. वस्तीवर पोहचल्यावर फोर्ड कोट्यावर लावुन, आंगावरच्या व्याख्यात्याच्या झुली उतरून; त्या कोट्यात दिसलं ती शर्ट आन् हाफ चड्डी घालुन मी, हानमा आन् श्रीरंग त्यंच्या शिवारात फिरायला गेलाव. सिनामाईच्या नदिखोऱ्यात चार पाच किलोमिटरची पायपीट करून शिवटी वस्तीवर आलाव.
ईकिकडं कंगवा खवल्याला, ईकीकडं आंड्रेटी वाळवायला एक वळण, टावेल वाळु घालायला एक वळण, कापडं आडकवायला एक खिळं हाणल्याली पट्टी, वायरीला आडकिवल्याला एक साठचा बल्प, मोबाईल चार्जींगसाठी मिडीला आडकिवल्याला एक बोर्ड, यातच पुस्तकाने भरलेलं एक गोदरेजचं कपाट आन् थोबाड बघायला टु व्हिलरचा तुटलेला आरसा आसं एकंदरीत इंटेरीअर असलेल्या या छपरात रहायची मजाच काय और हाय.
श्रीरंग सारख्या बलदंड आणि बुद्धीमान दोस्तांमुळंच म्या विचारांच्या रणांगनात निर्भिडपणे विहार करतुय. हे माझे दोस्त माझ्या दिमतीला एका शब्दावर उभं राहत्यात मनुनच ईषय कोण्चाबी आसुद्या त्या त्या क्षेत्रातला श्रीरंगासारखा तज्ञ दोस्त आपल्याकडं हाय; न्हायतर जग जिंकाया आजुन लागतंयच काय वो ? आसले पाच पन्नास दोस्त कमीवलं कि ईषयच क्लोज.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १६ जुलै २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...