Wednesday, August 2, 2017

| रायगड ते पन्हाळगड ©

सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाहुन आणि शेवट छत्रपती संभाजी महाराजांच्या पन्हाळगडावर अशा हिंदवी स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेल्या किल्यांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा ३० व ३१ जुलै रोजी पुर्ण केला. आजवर वाचलेलं, ऐकलेलं, आणि पाहिलेलं याची देही याची डोळा पुन्हा-पुन्हा अनुभवल्याने तो ईतिहास ह्रदयावर अधोरेखीत झालाय. रायगडावर आजवर खुपवेळा गेलो परंतु भर पावसाळ्यात रायगड अनुभवण्याचा आनंदच पहिल्यांदाच घेतला.
दिवस ढळेपर्यंत रायगडाच्या प्रत्येक भागाचे निरिक्षण करून पावसाळ्यातली टिपनं नोंदवली. टिपलेलं सर्वच इथे लिहिणे शक्य नाही परंतु रायगडावर कधीच न गेलेल्या व्यक्तींनाही स्फुर्ती मिळावी म्हणुन हा छोटासा अट्टाहास. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात, पडत्या पावसात आणि धुक्याच्या गर्द छायेत दुर्गराज उतरण्याचा चित्तथरारक अनुभव अविस्मरणीय होता. आजवर उन्हाळा आणि हिवाळ्यात रायगड चढलो होतो परंतु आज पावसाळ्यातही रायगड चढुन वर्षातल्या तिन्ही ऋतुत गडावर जाण्याचे स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान लाभले.
टकमक टोकावरून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारा शेकडो किलोमिटरचा परिघ बघताना आणि डोंगरांनी पांघरलेल्या हिरव्या शालुवरून वाहणारे शेकडो धबधबे पाहताना स्वर्गाची व्याख्या अनुभवता आली आणि पाषाणाची उभी कातळ पाहुण गडाच्या भव्यतेची जाणिव झाली. महाराजांच्या समाधीपुढे गुडघे टेकवुन माथा पायरीवर टेकवल्यानंतर जी उर्जा शरिरात संचारते ती शब्दात व्यक्त करणे फारच कठीण आहे ती प्रत्येकाने तिथे जाऊनच अनुभवायला हवी.
रायगडाचा निरोप घेऊन रात्री उशीरा चिपळुन मुक्कामी थांबलो व सकाळी लवकर उठुन थेट पन्हाळगडाकडे प्रयान केले. जाता जाता छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने ज्या ठिकाणी फितुरीने पकडले त्या संगमेश्वराच्या संगमावर कणकेश्वरला थांबुन ईतिहास जाणुन घेतला. नंतर सायंकाळी पन्हाळगडावर पोहचलो तिथल्या प्रत्येक स्थळाला भेट देऊन रात्रीच्या अंधारात अंबरखाणा पाहिला. आपल्याला माहित असणारे सांगत सांगत आणि माहिती नसणारे जाणुन घेत घेत अभ्यास दौरा पुर्ण केला. सदर दौऱ्यात आणखीनही बऱ्याच प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.
या दोन दिवसाच्या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य गुप्तवार्ता अधिकारी कृष्णात पाटील साहेब, कृषी अधिकारी दत्तात्रय क्षिरसागर साहेब, अॅड.श्रीरंग लाळे साहेब, दिपक क्राॅप केअर कंपनीचे संस्थापक दिपक थिटे साहेब आणि त्यांच्या डस्टर गाडीची साथ लाभली. या सर्व मित्रांच्या सह्रदयी साथीमुळे प्रवास सुखकर झाला एवढ्यातही कृष्णा पाटलाचे आयकार्ड, दत्ता सरांची बदललेली आडनावे, रंगाची बिसलेरी, आणि दिप्याच्या ड्रायव्हींगने मजा आणली.
येत्या हिवाळ्यात पुन्हा जाण्याचा विचार करतोय तुम्हा सर्वांसोबत; ईच्छुक असाल तर नक्कीच नियोजन करू तोपर्यंत जय शिवाजी, जय संभाजी !

✍🏼प्रा.विशाल गरड | दिनांक ३० व ३१ जुलै २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...