Saturday, August 19, 2017

| लिंबा ©

या फोटोतला एक चेहरा आहे अठ्ठावीस वर्षाचा आणि दुसरा चेहरा आहे नव्वद वर्षाचा परंतु दोन्ही चेहऱ्यात एक साम्य आहे; ते म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद. एकाला मदत मिळाल्याचा तर दुसऱ्याला मदतीला आल्याचा. होय, काल काॅलेज सुटल्यावर बऱ्याच दिवसांनी माझ्या हिरो होंडावर बार्शीला निघालो होतो. घारी पुरी नंतर येणाऱ्या वळणावरूनच साई मंदीराच्या अलिकडे एक गुलाबी फेटा घातलेला वृद्ध व्यक्ती रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या गाडीस्वारांना हात दाखवताना दिसला. शाळकरी मुले आणि वृद्ध व्यक्ती दिसल्या की माझ्या गाडीचा ब्रेक आपोआपच लागतो. मला ते गृहस्त दिसल्यापासुनच त्यांना लिफ्ट द्यायचे पक्के झाले होते. 
त्यांच्या जवळ गाडी थांबवुन मी जेव्हा "बसा आजोबा" म्हणलो तेव्हा ते म्हणले "व्वा रं पठ्ठया, हात न दाखीवता थांबलाच की, आरं गाड्यांला हात दाकवुन कटाळुन गेल्तो, मगापसुन दहा पाच गाड्या गेल्या, तुज्याच शिंदपाकी पोरं व्हती पण नाय थांबली. तवा मनलं आता पोरा ठोराला हातच नगं करायचा". हे बोलता-बोलताच ते आजोबा काठी सावरत गाडीवर बसले. पाठीवर एक थाप टाकली आन् म्हणले "चलं मला कुसळंबला सोड"
गाडी आणि आमच्या गप्पा दोन्ही वेगात सुरू झाल्या आजोबांचे नांव लिंबा गपाट, वय वर्ष ९०, एक मुलगा एक मुलगी, पोरगं पिकअपवर डायवर हाय, मालकीन मरून तिस वर्ष झाली, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, शाळा काय ते माहित नाही, दुसऱ्यांच्या शेतात ८० रूपये सालानं काम करून पाच एकर जमिन घेतली, आज नव्वद वर्ष वयातही शेतातली कामे करतात, हातात काठी आली पण चाल तेवढीच हाय, दात, डोळे आन् गुडघे अजुनबी मजबुत हैत, जवानीत असताना ४-४ घागरी रतिबाचं दुध सायकलीवर बार्शीला वाहिलंय, हे सारं मला लिंबा आजोबांनी कुसळंबला येईपर्यंत सांगितलं.
जुन्या माणसांवर झालेला कष्टाचा संस्कार हिच त्यांच्या दिर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. ऐशोआराम जिंदगीच्या विळख्यात सापडलेल्या युवापिढीला लिंबा गपाट सारख्या शेतकऱ्याकडुन खुप काही शिकायला मिळतं फक्त आपल्या गाडीच्या रिकाम्या सिटवर त्यांना बसवण्याची दानत ठेवायला हवी. आयुष्य खुप सुंदर आहे आणि अशा व्रतस्थ वाटसरूशी झालेल्या योगायोगाच्या भेटीने ते अजुन समृद्ध बनतं.
तब्बल नव्वद वर्षाच्या अनुभवाचं जिवंत पुस्तक अगदी काही क्षणात मला वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. सरतेशेवटी एवढंच वाटते की, "वृद्धांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या मरणाकडे होत असलेल्या वाटचालीच्या निशाण्या नसुन त्या अनुभवाच्या वाटा असतात; फक्त त्या शोधण्याची नजर असायला हवी".

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...