Monday, August 21, 2017

| चुकलेलं वासरू ©

आज काॅलेज सुटल्यावर उक्कडगांवहुन येडशी मार्गे पांगरीला निघालो होतो. गावाकडं पोळ्याची धामधुम सुरू होती. सायंकाळी घरी "चौर चौर चांगभले, पौस आला चांगभले" असं म्हणत घरच्या बैलांची लग्न लावायची उत्सुकता लागली होती. डोक्यात सगळं हेच चालु होतं तेवढ्यात माझ्या काॅलेजहुन येणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक वासरू एकटच चालताना दिसलं. मी गाडी थांबवुन आजुबाजुला पाहिलं. गुरांचा कळप दिसेना आणि गुराखीही. मी क्षणात ओळखलं कि हे वासरू वाट चुकलंय. ऐण पोळ्याला आईपासुन दुर झालेलं हे वासरू पाहुन; घरची लग्न लेट का होईना पण या वासराला त्याच्या आईजवळ पोहचवल्याशिवाय घरी नाही जायचं, असं ठरवुन मी त्या वासराजवळ गेलो. गाडीत बसण्याएवढं ते छोटं नसल्याने तो पर्याय बंद झाला. त्याला धरण्याचा प्रयत्न केला तर दुरवर पळत  जायचं, अनोळखी माणसाशी कुणीही असंच वागत असतं त्याला ते तरी कसा अपवाद ठरणार म्हणा.
शेवटी मी बराच वेळ तसाच थांबुन राहिलो, एकटक त्या वासराकडे पाहत राहिलो. नंतर त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते वासरू स्वतःहुन माझ्याजवळ आलं. कदाचित माझ्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलची आत्मियता दिसली असावी आणि तसंही एवढ्या बाबतीत माणसांपेक्षा जनावरं हुशारच असतात. बोलता येत नाही पण डोळ्यातलं प्रेम वाचतात.
वासराला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर हात फिरवला, वसवंड खाजवली, तशी त्याने शेपटी वर केली. बस्स झाली आमची मैत्री. वासराला तिथेच गाडीजवळ थांबवुन; रस्ता सोडुन साधारणतः एक दिड किलो मिटरची पायपीट केल्यावर एका माळावर मला जनावरांचा कळप आणि गुराखी दिसला. मी मोठ्याने हाक मारून त्या गुराख्याजवळ गेलो आणि सर्व हकिकत सांगितली. संजय नावाच्या त्या गुराख्याला माझ्या मोबाईल मधला फोटो दाखवताच तो आनंदात उत्तरला "आवं ह्येच कि जर्सीचं ख्वांड, हळु-हळु चालत व्हतं; म्या मनलं यिल म्हागुण. पण लई उपकार झालं बघा न्हायतरं हुकलं आसतं बगा ऐण सणासुदीचं"
मी म्हणालो "माझ्या गाडीजवळ उभा करून ठेवलंय चला लवकर" आम्ही दोघेही रोडवर आलो तर गाडीजवळ ते वासरू निवांत बसलं होतं. मालकाला पाहुण ते आनंदीत झालं. मग मी गाडीत बसुन पांगरीकडे आणि ते दोघेजण कळपाकडे निघाले. जाता-जाता त्या वासराने माझ्याकडे वळुन पाहिलेली नजर या जन्मात तरी विसरू शकत नाही. नेमकं कोणत्या विश्वासावर ते माझ्याजवळ आलं आणि मी येईपर्यंत गाडीजवळ थांबलं हाच विचार करत-करत मी घरी पोहोचलो. शेवटी बैल पोळ्या दिवशी एका चुकलेल्या वासराला त्याच्या आईपर्यंत पोहचवल्याचे समाधान लाभले. काहीही म्हणा पण माणसांपेक्षा मुके प्राणीच जास्त प्रेम करतात राव, कारण त्यांना खोटं वागता येतंच नसतं.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ ऑगस्ट २०१७ (बैल पोळा)

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...