Friday, August 11, 2017

| मोडी लिपी ©

भाषा हे माणसांच्या संवादाचे माध्यम आहे. आपल्या देशातही शेकडो वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात परंतु यापैकी मराठी भाषा लिहीण्याची मोडी लिपी खुप जुणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोडी लिपीत स्वाक्षरी करायचे; तत्कालीन बहुतांशी पत्रव्यवहारही याच लिपीत असायचा. म्हणुनच महाराजांची पत्र वगैरे वाचत असताना मला या लिपीची आवड निर्माण झाली. खरंतर तेव्हापासुनच मला सुद्धा हि लिपी लिहायला यावी असे वाटायचे परंतु मोडीची बाराखडी अवघड असल्याने ती शिकायलाही तितकाच वेळ लागला. आज अखेर मी माझे स्वतःचे संपुर्ण नांव या लिपीत लिहु शकल्याने फार समाधान वाटले.
आजच्या आधुनिक काळात भाषेच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होत असताना आपल्या मराठी भाषेची मोडी लिपी मात्र हळु-हळु लोप पावत चालली आहे याची खंत वाटते. भाषेसोबतच तिच्या लिपीचेही संवर्धन होण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन ती वापरायला हवी. आपल्या ईतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारी हि लिपी जोपासणे म्हणजे ईतिहासाचा वारसा पुढे चालवण्यासारखेच आहे.
आज मात्र मोडी लिपी फक्त शिवकालिन पत्र आणि जुने दस्ताऐवज वगैरे एवढ्यापुरतीच शिल्लक उरली आहे. माझे आजोबा अजुनही मोडी लिपीतच स्वाक्षरी करतात; जेव्हा मी त्यांना याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले कि "मी चौथीत असताना आम्हाला मोडी शिकवायचे त्यानंतर बंद झालं" याचा अर्थ सतराव्या शतकात रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी हि लिपी एकोणीसाव्या शतकापर्यंत जगत आली परंतु आता मात्र ती शेवटच्या घटका मोजत आहे. शिकवणारेच शिल्लक नाहीत राहिले तेव्हा शिकणारे तरी कुठुन तयार होतील.
आज रोजच्या व्यवहारात जरी मोडी लिपीचे महत्व राहिले नसले तरी शिवकालिन संदर्भ अभ्यासण्यासाठी मात्र आजही मोडी लिपीचे ज्ञान तितके आवश्यक आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...