Wednesday, November 29, 2017

| कोयतं ©

आज डोंगरातल्या वाटेने एकटाच गाडीवर घराकडे निघालो होतो. सुर्य लवकरच मावळल्याने अंधार पडला होता. गाडीची लाईट पडताच दुरवर काहीतरी चमकलं. गाडी जस जसी जवळ गेली तस तशी पांढऱ्या पोशाखाची अंधुक प्रतिमा स्पस्ट दिसु लागली. एक वृद्ध माणुस हातात धारदार कोयतं घेऊन पाऊलवाटेवर दगडं चुकवत आणि झुडपं हुकवत चालत होता. पांढरं मळकं धोतर त्यावर तिन गुंड्यांचा शर्ट आणि डोक्याला एक गमजा बांधलेला. डोळ्याला फारसं दिसत नसल्याने अंदाजे पावलं टाकत चाललेल्या त्या माणसा मागे; त्याला वाट दिसण्यासाठी मी गाडी हळू-हळू चालवू लाजलो. थोडं पुढे गेल्यानंतर मात्र मी हाक मारून त्यांना थांबवलं.
ओऽऽऽ बाबा, हिकडं कुठं निघालांव आंधारात? बाबा बोलले "ऊस टुळीतला हाय म्या, टॅक्टर आल्तं भरायला म्हणुनशा उशीर झाला. आंधार पडल्यानं डोळ्यास्नी दिसनाय नीट." मग मी म्हणलं "बसा गाडीवर सोडतो राहुट्यांजवळ"
एका क्षणात काष्टा खवुन ते बाबा गाडीवर बसले. तसं पाहीलं तर हातात कोयतं बघुन त्यांना कुणी लिफ्त देण्याचा विषयच नव्हता परंतु हातातल्या हत्याराला घाबरण्यापेक्षा चेहऱ्यावरचा भाव पाहुण त्यांना मदत करणं मला जास्त महत्वाचे वाटले.
गाडीवर बसुन खुप गप्पा टप्पा झाल्या. बाबांचे नांव रामा चव्हाण वय वर्ष ९५, गांव यवतमाळ जिल्ह्यातले पण सध्या उसतोडीसाठी मुक्कामी उक्कडगांवात आलेत. स्वतःच्या गावापासुन शेकडो किलोमिटर दुरवर दिवसाकाठी २०० रूपये मिळवण्यासाठी त्यांनी आज दिवसभर ऊस तोडलाय.
एव्हाणा गाडी उक्कडगांवच्या वड्याजवळ पोहोचली, वड्याच्या काठावर वसलेल्या त्यांच्या झोपड्यातुन धुर निघत होता. गाडीवरून उतरताना बाबांसोबत एक सेल्फी घेतला. अचानक फ्लॅश चमकल्याने बाबांनी मला विचारलं "काय चमकलं ?" मी एका क्षणात उत्तरलो "तुमचं कष्ट चमकलं"
अखेर माझ्या डोक्यावर हात फिरवुन हा ९५ वर्षीय युवक त्याच्या राहुटीकडं निघाला. मी खुप वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत तसाच उभा राहीलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की "वयाच्या ९५ व्या वर्षी काम करणाऱ्या या बाबांच्या कष्टाच्या श्रीमंतीपुढं आपण युवा अवस्थेत करत असलेलं काम खुपच गरिब आहे"

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७



| मंजुताई ©

अमेरिकेतील कॅलिफोर्नीया येथे तब्बल एकोणीस वर्ष वास्तव्य केलेल्या अनिवासी भारतीय मंजुताई यांनी काल आमच्या महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण, आहार-विहार, लाईफस्टाईल, अशा अनेक विषयांवर मंजुताईंचा अभ्यास तगडा आहे. ताईंशी थोडावेळ चर्चा करणे म्हणजे शेकडो पुस्तकांची काही मिनिटांत उजळणी केल्यासारखेच आहे. 
कधी फ्लुएन्ट अमेरीकन इंग्रजी तर कधी असख्खलित मराठीत 
मंजुताई सोबत मारलेल्या गप्पांमधुन मला एका जागेवर बसुन आख्खी कॅलीफोर्नीया फिरून आल्याचा अनुभव आला. 
परदेशी माणसांची लाईफ स्टाईल आणि विचार स्टाईल जाणुन घेताना खुप काही नवीन शिकायला मिळते. प्रत्येक देशाकडे काही ना काही शिकण्यासारखं असतं. आपल्या राज्यघटनेवर जसा अनेक देशांचा प्रभाव आहे तसाच तो आपल्या जगण्यात आणि वागण्यातही असायलाच हवा. चांगल्या गोष्टी आत्मसाथ करून आणि वाईट गोष्टींना बाजुला सारून आपली वाटचाल अनेक देशातुन जायला हवी कारण त्यानंतर मिळणाऱ्या यशाला जागतिक किर्तीची चव येते.
परदेशातुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण मनसोक्त संवाद साधायलाच हवा. जर भविष्यात कधी गेलोच बाहेरदेशात तर जगणं आणि फिरणं एकदम सोप्प जातंय. अमेरिकेतली मोठ्या पगाराची नोकरी आणि स्वतःचे अपार्टमेंट सोडुन आईच्या वृद्धापकाळात तिच्या सोबत राहण्यासाठी ताई सध्या भारतात आल्या आहेत. तसं पाहिलं तर समाजात अशा कृती फारच कमी दिसतात. खुप सारं कमवुन सुद्धा आई वडीलांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्यांसाठी मंजुताईंची हि कृती आदर्शवत आहे.
प्रखर देशभक्ती, स्वयंशिस्त आणि स्वच्छता या तीन गोष्टी प्रत्येक अमेरिकन्सडुन शिकण्यासारख्या असतात. आठवड्यातील पाच दिवस जीव तोडुन काम करायचे आणि शनिवार रविवार मनसोक्त मजा करायची हे सुत्र जसे भारतातही आता हळु हळु रूढ होत आहे तसेच देशभक्ती, स्वयंशिस्त आणि स्वच्छता या गोष्टीही रूळायलाच हव्या.
ताईंचे आणि माझ्या आईचे वय जवळ-जवळ सारखेच असावे पण त्यांच्याशी बोलत असताना हा वयातला फरक निव्वळ आकडे मोजण्यापुरताच उरतो. कारण समोरच्या व्यक्तीचे वय पाहुन ज्याला त्याच्यासोबत सिंदपाकी होऊन बोलता येते ती व्यक्ती सर्वांना जिंकते. मंजुताईंनी देखील आमच्या कॅम्पसच्या सर्व विद्यार्थ्यांशी असाच संवाद साधुन सर्वांची मने जिंकुण गेल्या. Thanks Manjutai for sharing your valuable time & thoughts with us.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७


Wednesday, November 15, 2017

| सोन्या ©

सोन्या हा आमच्या पांगरीतला एक निरव्यसणी कष्टाळु पोरगा, याने अकरावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि बारावीत इंग्रजी विषयात नापास झाला. पुन्हा तीनदा प्रयत्न करूनही विषय न निघाल्याने शिक्षणाला कायमचा राम राम ठोकून शेतीवाडी आणि कष्टाची कामे करू लागला. आसपासच्या खेड्यातल्या आठवडीबाजारात माळवं विकणे व प्रचंड ताकदीची कामे करणे  हे त्याच्या रोजच्या वेळापत्रकाचा भाग आहे. आज जेवन आटोपुन गावची हालहवा जाणून घ्यायला राहूलच्या टपरीवर गेलो होतो. गावपातळीवर या सारखं माहिती केंद्र दुसरं कोणतंच नसतं. टपरीच्या काऊंटरवर हात ठेऊन आरशात बघत थोडे केस सावरत होतो तेवढ्यात संतोष बाराते उर्फ सोन्या तिथे आला. दिवसभराची कामे आटोपुन गावातले अनेक मित्र विरंगुळा म्हणुन राहुलच्या टपरीवर जमत असतात त्यापैकीच आम्ही एक.
आरं सोन्या ! तु बारावी काढायला पायजेल लका, यावर सोन्या म्हटला " आवं पाॅटापुरतं शिक्षाण बासं झालं की. सर, ती इंग्रजी माझ्या डोक्यातच जात नाय बगा ! आन् घरच्यांलाबी सारखं सारखं पैसं मागू वाटतं न्हायतं. एकदा फाॅर्म भराया सातशे रूपये लागत्यात. आत्तापतुर तिनदा झालंय. वडील शेतकरी हैतं. ईनबीन ईसएक शेरडं आन् एक म्हैस यवढ्यावरच काय ते चालतंय बगा, पण म्या बी काय कच्चा नाय, दिसाकाठी माळवं टाळवं ईकुन आनं हमाली टमाली करून सातशेचा तरी मेळ घालतोच. बाजार नसल्यावर खताची पुती उचलायला, मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंटची पुती उतरायला, कंचबी काम आसुद्या आपुन ढिला नसतोच. वडलांचं लय लक्ष हाय माज्यावर; आजुनबी मला सुडुन जेवत न्हायतं. यीलच बगा आता त्यंचा फोन. ह्यवढं पोरात फिरतो पण सुपारीच्या खंडाचं सुद्धा यसन न्हाय लागलं मला"
सोन्याचे हे बोलणं ऐकुण त्याचा अभिमान वाटला. याआधी खुपदा राहुलकडुन मी सोन्याबद्दल ऐकलं होतं. "आरं विशाल ! हि सोन्या कामाला लई निब्बर पोरगं हाय लका, त्यादिवशी मला ती पंच्याहत्तर किलोचा कट्टा हालतबी नव्हता पण सोन्यानं एका झटक्यात उचलुन डोस्क्यावर न्हेला लका", ह्यवढंच नाय, एकदा त्या खतांच्या पोत्यानं भरलेला पिकअप पठ्ठ्यानं एकट्यानच खाली केला व्हता रांव" राहुलकडुन ऐकलेली हि माहिती सोन्याची धष्टपुष्ट शरिरयष्टी पाहुन विश्वास बसला. प्रत्येक व्यक्तीकडुन काहिना काही शिकण्याचा भाग असतोच तो शिक्षित आहे का अशिक्षित यावर ते अजिबात अवलंबुन नसतं. सोन्याच्या वयातली ईतर पोरं आजही पारंपारीक शिक्षण घेऊन बेरोजगारीचे कारण सांगुण वडीलांच्या जीवावर जगत आहेत. परंतु पडेल ती कामे प्रामाणिकपणे करून घराला हातभार लावणारा सोन्या मला त्या शिकलेल्या पोरांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतो. बोर्डात पहिला आलेल्या, एम्पीएस्सीतुन साहेब झालेल्या, डाक्टर इंजिनीअर झालेल्यांचं तर समदीच कौतुक करत्याती पण समाज नावाच्या व्यवस्थेत सोन्या सारख्या पोरांचे सुद्धा कौतुक व्हायलाच हवे म्हणुन हा अट्टाहास.
"हि पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे" होय, आण्णाभाऊंचे हे वाक्य खरंच हाय !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ नोव्हेबर २०१७

Friday, November 10, 2017

| पायतान ©

उद्या सकाळी लवकर व्याख्यानासाठी पंढरपूरकडे जायचंय. आज दिवसभराचे काॅलेज आटोपुन घरी येऊन उद्या व्याख्यानात मांडायच्या मुद्द्यांचे वाचन, चिंतन आणि मनन पुर्ण केले. वैचारीक मांड पक्की करण्यासोबत मी पेहरावाला सुद्धा तितकच महत्व देतो. त्याचाच एक भाग म्हणुन माझं आवडीचं पायतान असलेल्या कोल्हापुरी चप्पलला तेलपाणी करत बसलो होतो. कोणतेही काम निटनिटके आणि आवडीने करायची सवय असल्याने. घरातली तेलाची बाटली घेऊन पंधरा मिनिटे मन लावुन चप्पलीला तेल लावत बसलेलो. कोल्हापुरी चप्पल तेलात मुरवली की मऊ पडते. पायांना आणि डोळ्यांनाही आराम पडतो. चप्पलची काळजी फक्त चांभारानेच घ्यायची असते का ? त्यांची काळजी मी आजही आवडीने घेतो आणि यात मला काही कमीपणा वाटत नाही, लहाणपणी घरात कोणी पाहुणे माणसं आली की त्यांच्या चप्पला आणि बुटात पाय घालुन चालायची मला भारी हौस असायची. रानात गेल्यावर तर आमच्या सालगड्याच्या बुटात माती भरून गाडी-गाडी खेळायचो. आमच्या दादांनी बाजारातुन नवीन चप्पल आणल्यावर त्या दिवशी शाळेत लई शायनिंग मारीत जायचो. पंचेचाळीस रूपयाची पॅरागाॅन टाचेखाली भोक पडुस्तर वापरायचो. पळता-पळता कधी पन्ना निघाला तर थुका लावुन लगीच बसवायचो. रूळलेल्या चप्पलवर रेनाॅल्ड्स पेनने विशाल गरड लिहायचो, या सगळ्या आठवणी आज माझ्या कोल्हापुरी चप्पलला तेल लावताना जाग्या झाल्या. खरंच लहाणपणीची पायतानाची खेळणी मोठेपणी खेटरं कशी बरं होतात हेच नाही राव कळत. खेटरांना आपल्या संस्कृतीत नेहमीच हिन दर्जा दिला जातो. परंतु आपल्या अंगावरच्या सगळ्या पेहरावाला पायतानाशिवाय शोभा नसते. पायात चप्पल, बुट, सॅडल घालायला सगळ्यांनाच आवडतं. डोळ्याचा आणि पायांचा थेट संबंध असतो असे म्हणतात, त्यामुळेच पायात काय घातलंय यावर डोळ्याचं आरोग्य अवलंबुन असतं. माझे तर कलाकाराचे डोळे असल्याने त्यांची काळजी सुद्धा जरा जास्तच घ्यावी लागते. याच डोळ्यांच्या गरूडासारख्या नजरेतुन 'रिंदगुड' साकार झालंय. तेव्हा पायतान मऊ ठेवण्यासाठी चप्पल तेलात मुरवण्याचे काम आठवड्यात एकदा तरी मी आवडीने करतोच कारण यानिमित्तानेच का होईना मला लहाणपण जगता येते. आपली ऐप्पत कितीजरी मोठी झाली तरी आपल्या आयुष्यातली आपल्या पायतानाची किंमत मात्र कधीच कमी होत नसते. सरतेशेवटी आपली काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वस्तुची आपणही काळजी घ्यायलाच हवी मग ती वस्तू वा माणूस कुणीका असेना !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० नोव्हेबर २०१७

Wednesday, November 1, 2017

| पाचशे ©

आज सकाळी उठुन आंघुळ बिंगुळ ऊरकुन कापडं घालायला खुलीत गेलो तर काॅलेजचा गणवेश दिसलाच नाय, म्या लगीच हाक मारली " अय आयं, माझा हितला शर्ट कुठाय" आई चुलीवर भाकरी थापत बसली व्हती ती तिथुनच वरडली "आरं काकु आत्ताच कापडं घिऊन गीली नदीला ध्वायला" तिजं हे उत्तर ऐकुण मी पळतच तिज्या जवळ गेलो. "आगं त्या शर्टाच्या खिशात माझी पाचशेची नोट व्हती की" माझं हे शब्द ऐकताच शेजारी दात घासत बसल्याल्या माझ्या लहान बहीणीला आई वरडुन बोलली "अयं रूपाले पळ लवकर जा नदीवर, न्हायतर नोट जाईल बग नदीला वाहून" बहीणीने जरा कटाळाच केला तेवढ्यात आईनं चुली म्होरच्या चरवीत हात धुतलं आन धुमाट नदीवर गिली, यवढ्या गडबडीत पायात पायतान सुद्धा नाही घातलं तिनं, आन् मी म्हागुन वरडत राहीलो फक्त "अयं आयं, राहुदे काकु यील की घिऊन, माझं हे शब्द कदाचित तिला ऐकु सुद्धा आलं नसत्याल एवढ्या गडबडीत ती निघुन गिलती. म्या आपलं चुलीम्होरं बसुन तीची वाट बघत तापत बसलो.
काही येळानं ती भिजलेली पाचशेची नोट घिऊन आई घरी आली. आन् मोठ्यानं म्हणली सापडलं रे ऽऽ, तिज्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन त्या पाचशेच्या नोटंचं मोल तिच्यासाठी किती व्हतं ते समजलं. भाकरी करपीवली म्हणुन पुन्ह्यांदा रूपालीला दोन शिव्या हासडुन लगीच चुलीम्होरं जाऊन तव्यावरची करपल्याली भाकरी काढुन पाचशेची नोट शेकत बसली. एवढं समदं झाल्यावर ती नोट मागायची हिम्मत माझ्याकडं नव्हती तवा गपगुमान गाडीची किक मारली आन् काॅलेजला गेलो. पैशाचं मोल आईच्या या कृतीतुन आसं काय समजलंय की उभ्या आयुष्यात वाह्यात पैसं घालवायची ईच्छा व्हनार नाय.

टिप : सोबतचा फोटो आईच्याच मागं मागं पळत गेलेल्या रूपालीनं काढलाय.

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...