Sunday, December 23, 2018

सुगरण ©

आजच्या स्पेशल संडेची सुरूवात चिघळच्या भाजीची भाकरी, ठेसा, आंब्याच्या कैरीची चटणी आणि दही अशा पौष्टिक व रूचकर जेवणाने झाली. अर्थात विराच्या आधी आमच्या मातोश्री जर कधी भाकरी थापत बसल्या तर गरम-गरम पापुडा आलेल्या भाकरीचे चार घास पोटात घातल्याशिवाय कुठे जाऊ देत नव्हत्या. आता लग्नानंतर मातोश्रींसोबत विराचीही भर पडली. मास्टर ऑफ काॅमर्स असलेली विरा चुलीवर भाकऱ्या करण्यात सुद्धा मास्टरच आहे. माझ्या घरात किचन आहे, त्यात गॅस, ईलेक्ट्रिक इंडक्शन वगैरे आहेच पण आईला मात्र चुलीवरच भाकरी करायला आवडते त्यामुळे आमच्या वाड्याच्या मागे चुलीवरच्या स्वयंपाकासाठी विशेष सोय केली आहे. लग्नाआधी आईसमोर असंच बसुन जेवायचो आज विराने तिची जागा घेऊन 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केलंय.

मुलीला सुगरण करण्यासाठी आईची भुमिका महत्वाची असते. माझी विरा 'सुशिक्षित सुगरण' आहे याचे श्रेय आमच्या सासुबाईंना जाते. शिक्षणात मास्टर डिग्री घेऊन स्वयंपाकात सुद्धा मास्टरी केलेली विरा जेव्हा चुलीवर भाकरी करते तेव्हा काटवटीवर फिरणाऱ्या पिठाच्या भाकरीवर तिच्या हातांची पडणारी प्रत्येक थाप प्रेमाचा धपाटा वाटू लागते आणि हातातल्या पिठाच्या गोळ्याला आकार देता देता आपसुकच ती संसारालाही आकार देत असल्याची प्रचिती होते. मुळात चुलीवर स्वयंपाक करणे मोठे जिकिरीचे काम. गॅस बटनावर कमी जास्त करता येतो पण चुलीवर मात्र एक भाकर काटवटीवर थापता-थापता दुसरी भाकर तव्यावर भाजत असते या दोन्हीकडे लक्ष देत-देत गरजेनुसार जळतं सरपन चुलीतुन आतबाहेर करणे व फुकारीने जाळ फुंकणे ही क्रिया समांतर सुरू ठेवावी लागते. त्यातुनही भाकरी तव्यावर टाकताना हाताला चटका लागणार नाही याचीही विशेष खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा कुठं दुरडीत भाकर पडते. त्याच भाकरीचा पापुडा काढल्यावर त्यातुन सुगरणीच्या कष्टाचा सुगंध दरवळतो.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ डिसेंबर २०१८


Wednesday, December 19, 2018

सुखी संसाराचे १२३ दिवस ©

घरात आलेली नवी नवरी जेव्हा घरात रूळून जाते तेव्हा ती खऱ्या अर्थाने मालकिन होते. नवरी, बायको, मालकिन आणि आई असा तीचा प्रवास प्रचंड कष्टाचा आणि तडजोडीचा असतो. रोजचा स्वयंपाक, स्वच्छता, धुणे, भांडी हे सगळं करत करत कुटुंबातील सर्व व्यक्तिंच्या मर्जी सांभाळत तीचं जगणं सरू असतं. सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळण्याच्या नादात तीचे स्वतःच्याच आवडी निवडीकडे दुर्लक्ष होते. आपल्या धनसंपत्तीची आणि शरिर संपत्तीची योग्य काळजी घेणारं बायको नावाचं व्यक्तिमत्व स्वतःची काळजी घ्यायचं मात्र विसरून जातं. अशावेळी दैनंदिन संसारिक गोष्टींच्या पलिकडच्या सुखाची तिची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी नवरा म्हणुन आपणही आपली रोजची कामे बाजुला ठेऊन तिच्यासाठी वेळ द्यायला हवा.

एक, दोन, तीन म्हणता-म्हणता आज विराच्या आणि माझ्या लग्नाला १२३ दिवस पुर्ण झाले. त्याबद्धल मी तीला १९ तारखेच्या पुर्वसंध्येला शाॅपिंग, फिल्म आणि डिनरची ट्रिट दिली. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या खुप मोठ्या अपेक्षा नसतातच मुळी बस्स एवढंसं रिचार्ज महिनाभर पुरतं. राहिली गोष्ट वेळेची तरं ती आपोआप कुणालाच मिळत नसते निदान महिनाभरात एकदा तरी बायकोसाठी एवढासा वेळ काढायला हवा. अहो, ती आपल्यासाठी तिच्या आयुष्यातला एवढा मोठा वेळ राखीव ठेवते मग "बिझी शेड्युल" हा अवजडर शब्द खुंटीला टांगुन आपणही चार दोन तास तरी तिच्यासाठी राखिव ठेवायलाच हवे कारण लग्न म्हणजे दोन शरिरांसोबत दोन मनांचं मिलन असतं हे सगळं एकरूप झालं की संसाराची गाडी रस्ता सोडत नाही.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ डिसेंबर २०१८



Tuesday, December 18, 2018

आहेर ©

आज आमच्या गल्लीतल्या एका शेतकरीकन्येच्या विवाहाप्रसंगी आवर्जुन उपस्थित होतो. त्यांच्या घरासमोरच मंडप टाकला होता. एका गरिब शेतकरी कुटुंबातल्या या मुलीच्या विवाहासाठी मी काॅलेजहून खास वेळ काढून आलो.
शेवटची मंगळअष्टिका झाली की वऱ्हाडाची लगबग जेवणासाठी सुरू झाली आणि काही मंडळी त्याच मंडपात आहेर देण्यासाठी झुंबड करू लागली. कांतीलाल आबा आणि दिपक; आहेर घेण्यासाठी हापश्याजवळच बसले होते. गोरगरिबांच्या लग्नात आहेर स्विकारण्याची तत्परता दाखवणे ही सुद्धा एक सेवाच असते.

काही श्रीमंत मंडळी 'आहेर देणे घेणे नाही' असे अभिमानाने पत्रिकेवर छापतात ते योग्यही आहे परंतु गरिब शेतकरी कुटुंबाच्या अशा लग्नात मात्र आपण आवर्जुन आहेर करायलाच हवा. मुलीच्या बापाने अतिशय काबाडकष्ट करून पै पै गोळा केलेली असते. पोरीच्या सुखासाठी हा शेतकरी बाप त्याच्या आयुष्यातली बहुतांशी मुद्दल खर्च करित असतो अशावेळी आहेर संस्कृतीमुळे त्यांना वऱ्हाडी मंडळींचा थोडाफार आर्थीक हातभार लाभतो.

आजही ग्रामिण भागात लग्नानंतर आहेराची यादी वाचून दाखवण्याची पद्धत असते. कधीकाळी अकरा रूपयाचा आहेर आता महागाईच्या काळात एक्कावन्न रूपयापर्यंत येऊन ठेपलाय अशातही आपला शंभर रूपयाचा आहेर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी कारणीभुत ठरू शकतो. म्हणुनच ज्या लग्नात लाखो करोडोंची उधळपट्टी होते अशा लग्नात आहेर देणे आवर्जुन टाळा पण गोर गरिब शेतकरी जर त्याच्या मुलीचे लग्न करत असेल तर त्या लग्नात आवर्जुन आहेर करा.

एकिकडे अंबानीच्या मुलीच्या लग्नाची एक पत्रिका तीन लाख रूपयाची असते. तर दुसरीकडे पोरीचं लग्न उरकण्यासाठी एक शेतमजूर तीस हजार रूपयावर सालगडी म्हणून वर्षभर काम करत असतो. हेच आपल्या भारताचे खरे वास्तव आहे. गरिबी आणि श्रीमंतीतली ही दरी आपण बदलू शकत नाही फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी केलेली आपली छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य उभा करू शकते हे नक्की.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ डिसेंबर २०१८



Monday, December 17, 2018

शिवरायांचे दैवतीकरण थांबवा ©

शिवाजी महाराज हे छत्रपती होते त्यासोबतच ते एक सर्वसामान्य माणूसही होते. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक माणूस दोन हात आणि दोन पाय घेऊनच जन्माला येतो. यापेक्षा जास्त हात असणारा व्यक्ती आपण माणूस म्हणुन संबोधित नाही तर देव म्हणुन संबोधतो. महापुरूषांना देव करणं वेगळं आणि त्यांना देवासारखं मानणं वेगळं. जर आपण महापुरूषांना देव केलं तर त्यांनी उभारलेले सर्व कार्य चमत्कार होईल. कर्तुत्वाची जागा जेव्हा चमत्कार घेतो तेव्हा महापुरूषांच्या समकालिन पराक्रमाला फक्त उदबत्त्या लावून पुजलं जातं त्याचे अनुकरण वगैरेतर दुरचं राहतं; कारण माणुस माणसाचे अनुकरण करिन देवांचे थोडी करणार.

फेसबुकवर जेव्हा मी सचिन जुवाटकर या चित्रकाराने रेखाटलेले शिवरायांचे चार हात दाखवलेले व देवत्व ग्लोरीफाय केलेले चित्र पाहिले तेव्हा एक चित्रकार म्हणुन त्यांच्या कलेचे कौतुक वाटले पण ते चित्र रेखाटण्यामागचा हेतू मात्र विघातक वाटला. अहो, जुवाटकर शिवरायांनी बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर उभा केलेल्या स्वराज्याला उगांच चमत्काराचे ठिगळं लावू नका. देवाला देव राहूद्या माणसांना माणूस राहू द्या. चित्रातुन देव रेखाटण्याची एवढीच ईच्छा असेल तर तेहत्तीस कोटी देवांपैकी काहीच देवांची चित्र आपल्याला ठाऊक आहेत. तुमची कलाकारी त्या अज्ञात देवांना चित्र स्वरूपात आणण्यासाठी वापरा त्याचे स्वागतच होईल.

बाकी चित्र हि ठरवूनच काढली जातात. डोळे बंद करून स्वप्नात आलेली एखादी कलाकृती अशी कागदावर उमटली वगैरे वगैरे भंपक असतं. तुमचा मेंदु ज्या विचारांनी पोसला जातो त्याचेच प्रतिबिंब कलेतुन उतरत असते. महापुरूषांची मान्यताप्राप्त चित्रे ही काय नवनवीन प्रयोग करायची साधने नसतात याचे भान असावे. अरे जे आहे ते दाखवा की, तुमची सृजनशिलता दाखवण्यासाठी महापुरूषच बरे सापडतात तुम्हाला. सरतेशेवटी कुणी कोणते चित्र आपल्या घरात लावावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या भिंतीवर आधीपासुनच खुपसाऱ्या देवीदेवतांची चित्रे आहेत त्यातच एक माणसातल्या देवाचे चित्र आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या माणसातल्या देवाला आता देव करून त्याचे माणुसपण मारू नका एवढीच विनंती.

माणसांच्या चित्रांना देव करू नका
जिवंत ईतिहासाला आख्याईका म्हणू नका,
गड कोट किल्ले आहेत साक्षीला
शिवरायांच्या कर्तुत्वाला चमत्कार म्हणू नका.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ डिसेंबर २०१८


Monday, December 10, 2018

एक नाही हजारो छिंदम जन्मलेत ©

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडून आलाय हि बातमी समजली आणि लोकशाहीत असलं पण काही घडू शकतं याचे आश्चर्य वाटलं. मतदान माणसाच्या शरिराला बघून नाही त्याच्या डोक्यातल्या विचारांना पाहून करायचं असतं. छिंदम कोणत्याही पक्षाकडुन उभा नव्हता तरी त्याच्या वार्डातील लोकांनी त्याला समर्थन दिलंय. आजवर आपल्याला एकच छिंदम माहित होता आज मात्र महाराष्ट्राला हजारो छिंदम पाहायला मिळाले. काय राव लोकशाही आहे आपली तडीपार माणूस सुद्धा प्रचाराला न येता निवडून येतो. ही लोकशाही ज्यांच्या विचारांतुन निर्माण झाली त्या सर्व महापुरुषांच्या महान विचारांना निवडणूक नामक लोकशाहीचे सर्वोच्च शस्त्र वापरून हरवलं गेलंय. ही हरवणारी माणसं आणि छिंदमला समर्थन देणारी माणसं मला त्या छिंदमपेक्षाही विषारी वाटायली आहेत.

एक छिंदम प्रवृत्ती ठेचली असती ओ; पण आतल्या गाठीच्या या हजारो सुप्त छिंदमांचं करायचं तरी काय ? खरं तर आपण काहीच करू शकत नाही कारण मतदाराने कुणाला मतदान करायचं हा त्याला घटनेने दिलेला वैयक्तिक अधिकार आहे परंतु घटनापती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन राज्यघटना लिहिली. सबंध राज्यघटनेत शाहू,फुले, आंबेडकरांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या विचारांना अग्रनी स्थान दिलं. समाजातील वाईट राजकिय प्रवृत्तींचा नायनाट करता यावा म्हणुन घटनेने आपल्याला मतदानासारखा श्रेष्ठ अधिकार बहाल केला परंतु आज निवडणूकी सारख्या त्याच पवित्र प्रणालीतुन छिंदमसारखा स्वराज्यद्रोही निवडून देऊन त्या मतदारांनी नेमकं काय साध्य केलंय ? हे सांगायची आणि समजुन घ्यायची गरज आहे.

शिवरायांच्या काळात लोकं स्वराज्यासाठी मरायला तयार होती. स्वराज्यद्रोह्याला टकमक टोकवरून ढकलून दिले जायचे आज मात्र बटनं दाबून अशा नालायकांना निवडून दिलं जातंय हे दुर्दैव. अरे हे फक्त प्रतिस्पर्ध्याला नव्हे तर महापुरूषांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच आव्हान आहे. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडलंय उद्या हेच आपल्या उंबरठयावर घडलं तर नवल वाटू नये. बाकी तुम्ही निषेध करत राहा आम्ही निवडून देत राहतो. छिंदम मुडदाबाद !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० डिसेंबर २०१८


Wednesday, December 5, 2018

श्रीमंती ©

काॅलेजातुन घरी येताना रानात गेल्तो. लय दिवसापसुन त्या आवडीच्या बोरीची बोरं खायची व्हती. लहानपणी वड्यातल्या बोरीची गावरान बोरं खायला दिसं दिसं भटकायचोत. नदीला मासं पकडायला जायचं, हिरीत पवायला जायचं, आळवनात म्हवळं झाडायला जायचं आन् मग बोरं खायला जायचं असा एका दिवसाचा गावठी मिनिस्टरी प्लॅन असायचा आमचा. आता मातर नौकरी, छंद, संसार या त्रिमुर्तीतुन येळंच नाय भेटत. आसंच कधी बोरंबीरं बगीतली की जन्या आठवणींचं म्हवाळ उठतंय डोस्क्यात. तरी बरं तोडकं मोडकं ल्ह्यायला येतंय म्हणुनशान बरंय; नायतर हे आस्लं जब्राट आनुभव तसंच डोस्क्यात कुजत राहिलं आस्तं.

आज येळात येळ काढून रानात गेलो. तिथं गेल्यावर तासभर त्या बोरीखाली हावऱ्यावनी बोरं ईचित बसलो व्हतो. बोरीचं काटं आडकुन शर्टाचं धागं आन् हाताला वरकांडं निघालं. पण पॅन्टीचं आन् शर्टाचं खिसं जवर भरत न्हायतं तवर माझा कार्यक्रम सुरूच व्हता. ताजी बोरं खिशात भरायची आन् वाळल्याली येचत येचत खायची. साखरंवाणी गोड आन् एकबी बोरं किडकं नाय या गुणामुळं उगं डोळं झाकुन वडायचं काम चालू व्हतं. दोन तीन ढेकरा आल्यावरच खादाडखाई बंद झाली.

घराकडं येताना शर्टाचा फुगल्याला खिसा बगुन उगंच लय श्रीमंत आसल्यागत वाटलं. लहाणपणी शेंगदानं, सिताफळं, कणसाचं दाणं, बोरं, उसाच्या बुटकांड्या आसल्या गुष्टींनी भरल्यालं खिस घिऊन फिरणारा पोरगा आमच्यामते श्रीमंत आसायचा. लय हेवा वाटायचा त्येचा, मग उगंच लंडावनी त्याच्या म्हागं म्हागं फिरायचं तवा कुठं त्यातला थोडासा माल हातावर मिळायचं. काय साला लहानपण असतं नाय; आज बोराचा कॅन्टर ईकत घिऊन खायचं म्हणलं तरी शक्य हाय पण ईचुन खायचा त्यो रूबाब मातर त्यात नाय. तवा आसलं काय दिसलं की आपुनबी लहान हुन जायचं. आपली ईज्जत, मोठेपण, आब, रूबाब, पैशांची श्रीमंती हे आस्लं समदं त्या झाडाच्या एका फांदीला टांगायचं आन् जगायचं बिनधास्त बारक्यावानी...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ डिसेंबर २०१८


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...