Monday, January 31, 2022

ऑफलाइन परीक्षा व्हायलाच पायजे

अरे येडे का खुळे लका तुम्ही. उलट ऑनलाइन परीक्षेचं तोटं सांगून ऑफलाइनच परीक्षा घ्या म्हणून तुम्ही मोर्चे काढाया पायजे व्हते पण तुम्ही तर परीक्षा नकु म्हणून रस्त्यावर आलाव. तुम्हाला शिकणारी पोरं म्हणावं का ? तुमची तरी काय चुकी म्हणा दोन वर्षे शाळेतल्या शिक्षकांची ऑनलाइन लेक्चर्स सुडून बरेचजण मोबाईलवर भलतंच कायतरी बघत बसली. शिकण्याच्या नावाखाली तुमची बोटं नकु तिथं टच करीत बसली आन् त्येज्या मुळंच मेंदूत नकु ती कंटेंट घुसला म्हणूनच आता परिक्षेचीबी भिती वाटायली तुम्हाला. काळजी घ्या पण परीक्षा द्या बाबांनो.

आरं, आधीच तुमची पासिंग सोप्पी करून तुम्हाला अधू करून ठिवलंय. जागतिक स्पर्धेच्या तुलनेत लका तुमचा सध्याचा सिल्याबस सावलीला सुदा उभा राहू शकत न्हाय. तुमची बोर्डाची पेपरं तपासताना सुधा वडून ताणून का व्हईना पण पस्तीस मार्कापर्यंत आणून ठिवाव म्हणत्यात. प्रॅक्टिकलची फुल्ल मार्क दिवून लेखी परीक्षेत जर पंधरा वीसबी मार्क पाडायला जमणार नसत्याल तर आता काय हाणून घ्यावं का ? ठिक हाय एवढं वर्ष निघूनबी जाईल रं पण कवर असं लांब लांब पळणार हाव ? नीट आन् जेईईबी असंच घरी बसून देणार हाव का ?

शाळेत गुरुजींनी मारलं, कॉलेजात सरांनी अपमान केला, वर्गात पोराकडून पुरीचा आन् पुरीकडून पोराचा प्रेमभंग झाला, परीक्षेत नापास झाला/झाली, घरची खवळली असल्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही फाशी घ्यायलाव म्हणल्यावर तुमच्याकडून अपेक्षा तरी काय ठिवावी. घरात आईबापाला, शाळेत मास्तरांना आन् आता सरकारला भिडवू भिडवू तुम्ही तुमच्याच पायावर दगड नाही तरं मोठ मोठं चिरं मारून घेतल्यात. जागं व्हा मर्दांनो ! उगं भयकू नका कवळ्या वयात.

ती राष्ट्रनिर्मिती युवकांच्या हातात वगैरे हाय म्हणं. विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य वगैरे असत्यात म्हणं. युवकांनी आंदोलने किली की क्रांती ब्रिंती घडती म्हणं. ह्या समद्या वाक्यांनी हिरीत उडी टाकून जीव द्यायचा का लका. उलट सांगा सरकारला "घ्या म्हणावं पेपर. हाफ बीफ नाय तर फुल सिल्याबसवर घ्या. करताव आम्ही अभ्यास." असला कोरोना व्हता पण तुमच्या शिक्षणासाठी तुमचा बाप रक्ताचं पाणी करून काबाड कष्ट करत व्हता, आई दिसरात काम करून तुमच्या दोन घासाची सोय करत व्हती. का ? तर लेकरू शिकून मोठं कायतरी व्हईल. हितं तर ही परीक्षाच नकु म्हणायलंय.

झालं एवढं नुकसान लंय झालं. जावा गप घरी आन् लागा परीक्षेच्या तयारीला. आई बापाच्या कष्टापुढं आपला अभ्यास करायचे काम म्हंजी उगं ठिपक्या एवढं हाय आन् ती बी नसल जमत तर ती गाबुळी मार्क घिऊन मारा उडी बेरोजगारीच्या समुद्रात आन् बसा बापाच्या जीवावर तुकडं मोडीत वयाची तिशी पार हुस्तोवर. आजची माझी ही पोस्ट जरी परखड वाटत आसली तरी तुमच्याच तळमळीने लिहिली हाय. राग मानू नका आन् तरीबी आलाच तर मग हीच पोस्ट आजून चार पाच वर्षांनी वाचा मग तुम्हीच म्हणचाल राईट बोलत व्हता लका ईशाल गरड.


विशाल गरड
दिनांक ३१ डिसेंबर २०२२, पांगरी

Saturday, January 29, 2022

रायरी

प्रिय वाचकहो, तुम्हाला ही गोष्ट सांगताना मला मनस्वी आनंद होतोय की माझी 'रायरी' ही पहिली वहिली कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. शरद तांदळे यांचे न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे ती प्रकाशित करीत आहे. आजवरच्या आयुष्यात बरीच बिरुदं व्यक्तिमत्वाला चिटकलीत पण आज विविधांगी पाच पुस्तकांच्या लेखनानंतर प्रथमच कादंबरीकार म्हणून साहित्याच्या उंबरठ्यावर उभा राहिलोय. तुमच्या प्रेमाच्या आणि पाठबळाच्या जोरावर हेही पाऊल दमदार पडेल याची खात्री देतो. बाकी कादंबरी संदर्भातील पुढील अपडेट्स वेळोवेळी देत राहील, तब तक के लिए स्टे ट्यून. आणि हो माझ्या कुंचल्यातून साकारलेली 'रायरी' टायटलची ही कॅलिग्राफी कशी झालीये तेही सांगा.

विशाल गरड
२९ जानेवारी २०२२, पुणे

Monday, January 24, 2022

रस्त्यावरचं श्रीमंत दुकान

आज कामानिमित्त बार्शीच्या चंदन झेरॉक्स येथे गेलो असता श्री.शिवाजी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर पुस्तकाचा स्टॉल दिसला म्हणून थांबलो. सर्व पुस्तकांवरून नजर फिरवली आणि एक पुस्तक विकत घेतले. पुस्तकाचे पैसे देण्यासाठी मी त्यांचा क्यू आर कोड स्कॅन केला आणि पैसे ऑनलाइन पे केले. दुसऱ्याच क्षणात पुस्तक विक्रेत्याने त्यांचा मोबाईल खिशातून काढून पैसे आल्याची खात्री केली आणि सहज माझे नाव वाचले. त्यांनी लगेच माझ्याकडे पाहत विचारले "तुम्ही विशाल गरड का ?" मी म्हणले "हो".  "ते वक्ते लेखक आहेत तेच ना ?" मग मी तोंडाचा मास्क बाजूला सारत म्हणालो "हो तो मीच" मला पाहून त्यांना इतका आनंद झाला की अगदी दुसऱ्याच क्षणात ते खूप प्रेमाने माझ्या जवळ येऊन म्हणाले "चला बरं सर तुम्हाला चहा पाजतो, अहो तुमची पुस्तके असतात माझ्याकडे, ते 'व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय' हे पुस्तक मी बऱ्याच जणांना वाटली" यावर मी त्यांना म्हणालो "अहो काका,उलट आम्हीच तुम्हाला चहा पाजायला पाहिजे, आमच्या साहित्यरूपी अपत्याला तुम्ही एवढे नटवून थटवून त्याची प्रसिद्धी करता. चला चहा घेऊ" असे म्हणत शेजारच्या कॅन्टीनवर आम्ही चहा प्यायला गेलो.

तिथे चहा पीत पीत मी त्यांना त्यांचे नाव वगैरे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की "मी भगवानदास तापडिया, इथेच व्हि.के. मार्ट जवळ राहतो. पुस्तक विक्रीचा व्यवसाय मी सेवा म्हणून करतो". त्यांचा व्यवसायातला सेवाभाव पाहून छान वाटले. पिशव्यात पुस्तके भरायची, ठरलेल्या जागेवर आल्यावर तिथे तीन टेबल मांडायचे आणि त्यावर सगळी पुस्तके ठेवायची. सहज जरी कोणी तिथे पाहत उभारले तरी पुस्तकांची माहिती सांगत राहायची. खरंच लेखकाला घराघरात आणि सर्वसामान्यांत पोहोचवणारा हा पारंपरिक आऊटलेट असाच सुरू राहायला हवा. अशी जीवतोड मेहनत करून रस्त्यावरच विचारांचे दुकान थाटलेल्या माणसांचा आपल्याला मोक्कार अभिमान वाटतो. यातून ती किती श्रीमंत होतात हे माहीत नाही पण ते कित्येकांना विचारांची श्रीमंती बहाल करतात हे महत्वाचे. तापडिया काकांच्या पुस्तक व्यवसायास माझ्या शुभेच्छा

विशाल गरड
२४ जानेवारी २०२२

Saturday, January 22, 2022

डिसले गुरुजींना आडकाठी

अशा कितीतरी शिक्षण  संस्था आहेत ज्या संस्थेत संबंधित संस्थाचालकांच्या घरातील व्यक्तींच्या नियुक्त्या असतात जे फक्त महिना पगार उचलण्यापूरतेच शाळेत सही करण्यासाठी येतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत जिथल्या संस्थाचालकांच्या निवडणुकीसाठी आणि वाढदिवसासाठी शिक्षकांच्या पगारीतून पैसे कपात केले जातात अशा संस्थाचालकांवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतल्या शिक्षकांचा वापर शिकवण्याव्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठीच जास्त केला जातो अशा व्यक्तींवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतले शिपाई शाळा सोडून संस्था चालकांच्या घरची धुनी भांडी करण्यासाठी कामावर असतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली ?

असे कित्येक शिक्षक आहेत ज्यांना झूम मिटिंगद्वारे लेक्चर घेता येत नसल्याने लॉक डाऊन काळात त्यांनी ऑनलाइन शिकवलेच नाही. मग अशा शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

भारतात असे कितीतरी शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक वाचून दाखवण्यापालिकडचे शिक्षण देऊ शकत नाहीत. वर्गात जसे काही विद्यार्थी हुशार तर काही ढ असतात तसेच आपल्या देशातही काही शिक्षक हुशार तर काही ढ आहेत मग अशा 'ढ' शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

ज्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी जागतिक पातळीवर शाब्बासकी मिळवली त्यांच्या तीन वर्षाच्या कामात अनियमितता आहे असा ठपका ठेऊन त्यांना पी.एच.डी करिता अमेरिकेला जाण्यासाठी रजा मंजूर न होणे दुर्दैवी वाटते. जागतिक सन्मान मिळवणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यात जर इथली व्यवस्था पाणी आणणार असेल तर अशा व्यवस्थेला काय म्हणावे ?

दुःख याचेच जास्त वाटते की डिसले गुरुजींना अमेरिकेने संशोधनासाठी स्कॉलरशिप दिली मग तशी स्कॉलरशिप त्यांना आपल्या भारतातच का नाही दिली गेली ? शिक्षकांसाठी पण तशी एखादी स्कॉलरशिप आपल्या देशात का नाही ? बाहेरच्या कुणी आपल्यावर मोहर उमटवल्याशिवाय त्यांचे कौतुक करायचेच नसते का ?

दिसले गुरुजींचे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला जाण्याने फक्त एका शाळेला किंवा तालुक्याला नव्हे संपूर्ण देशासह जगाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. शिक्षक म्हणून प्रशासन पातळीवर काही त्रुटी असतीलही कदाचित पण माननीय शिक्षण विभागाने डिसले गुरुजींच्या प्रस्तावाचा धोरणात्मक विचार करायला हवा असे वाटते.

नियमानुसार काटेकोर चालायचे म्हणले तर चतुर्थ श्रेणी कामगारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, सह सचिवापासून मुख्य सचिवापर्यंत, पोलिस शिपायापासून महासंचालकापर्यंत आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यांमार्गे पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचीच कधीतरी कुठेतरी कर्तव्यात कसूर होतेच पण त्यातूनही नियम बाजूला सारून ते मार्ग काढतात; नव्हे तो काढवाच लागतो तसंच ग्लोबल टिचर अवॉर्ड विनर रणजितसिंह डिसले गुरुजींना देखील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. अशा हरहुन्नरी, हुशार, विद्वान, सात कोट रुपये जिंकूनही नोकरी करण्याची इच्छा दाखवणाऱ्या टेक्नॉलॉजीप्रिय शिक्षकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे. त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्या विद्वत्तेचा आदर झाला पाहिजे एवढंच.

विशाल गरड
२२ जानेवारी २०२२

Wednesday, January 12, 2022

शाळाबंदी

एक गाव आहे जिथे मोबाईलला रेंजच नाही. पालक अशिक्षित आहेत त्यांचा विद्यार्थी ऑनलाइन वर्गात कसा उपस्थित राहील ? एक पालक थ्रेशिंग मशीनवर कामगार आहे. त्याच्याकडे स्मार्ट फोन नाही त्याने त्याच्या पाल्याला कसं शिकवायचं ? पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना अनन्य साधारण महत्व असते. गेल्या दोन वर्षात एम.एस्सी केलेले, डिग्री घेतलेले किती प्रात्यक्षिक अनुभव घेऊन पास झालेत ? कित्येक विद्यार्थी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे गेमिंग आणि पॉर्नोग्राफीकडे वळले आहेत हे कसं थांबवायचं ?

समजा पालकांचा मोबाईल असेल आणि जर ते त्यांच्या मोबाईलवर अश्लील कंटेंट पाहत असतील आणि लेक्चर च्या वेळेपुरताच ते त्यांचा मोबाईल पाल्याला देत असतील तर फेसबुक, गुगल किंवा यू ट्यूब हे ऍप्स मोबाईल धारकाने जो कंटेंट सर्च केलेला असतो त्यासंबंधीचाच कंटेंट मोबाईल स्क्रिनवर सतत दाखवत राहतात. उत्सुकतेने जर आपल्या पाल्याने त्यावर क्लीक केले तर नको त्या वयात तो गुलाबी दुनियेत रंगून जातो अगदी बेमालूमपणे. हे कसं रोखायचं ?

एक ऊसतोड कामगाराची मुलगी होती. ती सातवीच्या वर्गात शिकत होती. मार्च २०२० मध्ये झालेल्या लॉकडाऊन मध्ये ती शाळाबाह्य झाली. मध्यंतरी शाळा सुरू झाल्यावर पालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण सतत मोबाईल नॉट रीचेबल लागल्याने आजतागायत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षात तिने ऑनलाइन शिक्षण घेतले असेल ?

ग्रामीण भागात ७० टक्के विद्यार्थी सर्वसामान्य घरातून येतात त्यापैकी किमान २२ टक्के विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन शिकत असतात. धनदांडग्या पालकांची लेकरं शिकली नाहीत, त्यांना नोकरी मिळाली नाही म्हणून काय भविष्यात त्यांची उपासमार होणार नाही पण रिक्षा चालक, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, अशा गरीब पालकांसाठी त्यांच्या लेकरांचे शिक्षण हीच त्यांच्या भविष्याची भाकरी असते. मग त्यांच्या लेकरांचे शिक्षण थांबवणे कितपत योग्य ?

"एकदोन वर्ष नाही शिक्षण झालं तरं कुठं बिघडतंय" या वाक्याची किंमत विद्यार्थ्यांना फार उशीरा लक्षात येईल. उदाहरण म्हणून सांगायचं झालंच तर आठवी नववी हे दोन वर्ग दहावीचा पाया असतात. आज आठवीतले विद्यार्थी ऑनलाइन शाळेतून थेट दहावीपर्यंत आलेत मग बारावी नंतर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नीट, जेईई परीक्षेला ते अर्धगाबुळ्या ऑनलाइन शिक्षणाच्या जोरावर तोंड देऊ शकतील का ?

गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग असतो त्यांची लेकरं शिकली तरच त्यांचे जीवनमान उंचावते असे पालक आज हात जोडून पाया पडून शिक्षकांना विनंती करत आहेत की  "सर, लेकरं घरी नका हो पाठवू, मी लिहून हमी देतो पण माझा पाल्य हितंच राहू द्या. घरी नाहीत ती अभ्यास करत. वाटूळं होईल ओ लेकरांचं" शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा गुन्हा नाही का याबद्दल कुणाला दोषी धरायचे ? प्रशासन थेट शाळा बंदच्या ऑर्डर काढून मोकळे होते. संबंधित अधिकारी जसे वरून आलेल्या ऑर्डर तत्परतेनं खालपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात तसेच त्यांनी पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे म्हणणे देखील खालून वरपर्यंत पोहोचवायला हवे.

आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? आणि सलग तीन वर्षे ऑनलाइन शिकून भविष्य गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? ही आकडेवारी जर अचूक काढली तर शाळा सुरू ठेवण्यास बळ मिळू शकते. असं भिऊन भिऊन कुठवर पळायचं ? ऑनलाइन शिक्षण म्हणजे रडणाऱ्याचे डोळे पुसण्यासारखं आहे. ते कधी न भरून निघणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची तात्पुरती मलमपट्टी आहे. भविष्यात नुसत्या पास झालेल्या पत्रावळ्या घेऊन जेव्हा ही ऑनलाईन पिढी नोकरीच्या मार्केट मध्ये जाईल तेव्हा त्यांच्या त्या मार्कलिस्टला केराच्या टोपल्या दाखवल्या जातील तेव्हा आता शाळा बंद करणारे प्रशासन त्यांच्या नोकरीची जबाबदारी घेईल का ?

विशाल गरड
१२ जानेवारी २०२२

Sunday, January 2, 2022

तयार राहा

प्रसार माध्यमांनो, राज्यात लॉकडाऊन ? अशा बातम्या चालवून सरकारवर दबाव टाकण्यास तयार राहा. मंत्र्यांनो, न्यूज चॅनेल्सच्या बातम्या बघून बघून लॉकडाऊनची भीती दाखवणारे स्टेटमेंट द्यायला तयार राहा. सरकार, कोरोना टेस्टची संख्या वाढवायला तयार राहा.

सरकारच्या काही कर्मचाऱ्यांनो, घरी बसून फुल्ल पगार घ्यायला तयार राहा. पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनो, आहे एवढ्याच पगारीत तिप्पट काम करायला तयार राहा. खाजगी नोकरदारांनो, पगार कपातीस तयार राहा. कामगारांनो, पुन्हा बेरोजगार व्हायला तयार राहा.

डॉक्टरांनो, दिड लाख रुपये प्रति पेशंट प्रमाणे उपचार करण्यास तयार राहा. मेडिकलवाल्यांनो, ही औषधे कोरोनावर प्रभावी आहेत का नाहीत माहीत नाही पण रेमडीसीविर, टोसिलिझुमबचा स्टॉक करायला तयार राहा.
काळा धंदा करणाऱ्यांनो, कोरोना उपचाराची औषधे दहापट किंमतीने विकायला तयार राहा.

बार वाल्यांनो, दारूच्या बॉक्सनी गोडाऊन भरायला तयार राहा. टपरिवाल्यांनो, गुटख्याचा स्टॉक करायला तयार राहा. छोट्या मोठ्या दुकानदारांनो, शटर ओढायला तयार राहा. शिक्षकांनो, ऑनलाइन शिकवायला आणि विद्यार्थ्यांनो, मोबाईलवर शिकायला तयार राहा.

कृषी कंपन्यांनो, खते, बी बियाणे आणि औषधांचे भाव वाढवायला तयार राहा. तेल कंपन्यांनो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायला तयार राहा. शेतमाल व्यापाऱ्यांनो, तुम्ही मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतीमालाचे भाव पाडायला तयार राहा. शेतकऱ्यांनो, अवकाळी पाऊस आणि गारपीठीनंतर आता सरकारी नुकसानीसही तयार राहा.

सरकारला एवढीच विनंती,
कोरोना झालाच शेतकऱ्याला तर निदान त्याला त्याचा उपचार करण्याऐवढे तरी पैसे कमवू द्या. सलग दोन वर्षे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी आता बऱ्यापैकी लसीकरण झाल्याने लॉकडाऊन होणार नाही या आशेने उरला सुरला सगळा पैसा शेतावर लावला होता पण जर आता लॉकडाऊन झाले तर मायबाप शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जाईल. लॉकडाऊन तर दूरच पण त्याच्या नुसत्या अफवेनेही शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे तेव्हा तुमचं काही ठरायच्या आधी तशा बातम्या पेरणाऱ्यांची थोडी वेसन आवळा. सुगीच्या दिवसात लॉकडाऊन कराल तर चार माणसं वाचवण्याच्या नादात हजार शेतकरी माराल.

सर्वात महत्वाचं,
सुजाण नागरिकांनो, ज्यांनी लस घेतलीच नाही त्यांनी लस घ्यायला, लक्षणे दिसणाऱ्यांनी इतरांपासून दूर राहायला, सर्वांनीच मास्क वापरायला, हात धुवायला आणि सोशल डिस्टंसींग पाळायला तयार राहा. आपण जर ही तयारी ठेवली तर सरकारही लॉकडाऊनची तयारी करणार नाही अन्यथा जिवीत आणि वित्तहानीस तयार राहा.

विशाल गरड
२ जानेवारी २०२२

Saturday, January 1, 2022

हे जपायला हवं

साऊ दिड वर्षाची झालीय तिच्या मेंदूवर छापलेली मराठी भाषा आता तोडक्या मोडक्या शब्दात आणि बोबड्या आवाजात उमटू लागली आहे. सांगितलेले सगळं तिला कळायला लागलंय. मोठ्यांच्या कृतीचे अनुकरण करायला तिच्याकडून सुरुवात झाली आहे, त्यामुळेच आज घरच्या अंगणाचा उंबरठा ओलांडून शेती संस्कृतीचा सिलॅबस शिकवण्यासाठी साऊला दुचाकीवर शेतात फिरायला घेऊन गेलो. जाता येता रस्त्याने हजारो गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. शेतात गेल्यावर कुत्र्याचे भौ भौ, गाईचा हंब्या, पक्ष्यांची चिऊ चिऊ, मांजराचे म्याव म्याव, वाऱ्याचा जुई जुई आवाज, फुलांचा सुगंध, विहिरीतले पाणी, हे सगळं तिने लाईव्ह अनुभवलं.

विरा रोज साऊला ज्या गाईचे दूध पाजते, आज तेच दूध नेमकं कुठून येतं आणि कसं काढलं जातं हे तिने प्रत्यक्ष पाहिले. आमचे आबा जेव्हा गाईची धार काढायला बसले तेव्हा तर साऊ एकटक सडातून बादलीत पडणारी दुधाची धार कुतूहलाने पाहत बसली. धारेचा आवाज ऐकण्यात ती तल्लीन झाली. शेतातल्या अनेक जिवंत गोष्टींशी तिचा संवाद आणि सहवास झाला. आपल्या ग्रामीण सांस्कृतीला फार मोठा इतिहास आहे ती शाश्वत आणि पौष्टीक आहे. वाढते शहरीकरण आणि वेस्टर्न लाईफच्या जाळ्यातून आपली सुटका होणे शक्य नसले तरी कधी कधी जमेल तसे आपल्या लेकरांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.

आपल्या लहानपणात बैलगाडी, चाबूक, चिपाडं, खिळ्या, सापट्या, दावी, चंगाळ्या, सायकलची टायर, गाढवन हे खेळण्याची साधने असायची. शेतात चिंचा गोळा करायला जाणे, विहिरीत पोहायला जाणे, मोठमोठ्या झाडांवर चढाणे हा खेळ असायचा. सुर्यफुलाच्या लाकडाची साल काढल्यावर त्यात निघणाऱ्या मऊ गाभ्या पासून नांगर, कुळव तयार करणे, दिवाळीत महानंदी च्या पोकळ लाकडात सायकलची तार आणि रबर लावून टिकल्या वाजवायची बंदूक तयार करणे, चिखलापासून घरं तयार करणे, वाळूच्या ढिगाऱ्यात पाय घालून त्यावर हाताने थोपटून खोपा तयार करणे अशा गोष्टीतून नवनिर्मितीचा आनंद मिळायचा.

हाकलून लावताना कुत्र्याला 'हाड' म्हणायचं, मांजराला 'थेर' म्हणायचं, जनावरांना 'हाईक' म्हणायचं तेच त्यांना बोलावतात कुत्र्याला 'कू कू' म्हणायचं, कोंबड्यांना 'पा पा' मांजराला फिस फिस करायचं आणि जनावरांना टिट्याव टिट्याव करायचं. चालती बैलगाडीत बसल्यावर ती थांबवतात हाताने कासरा  ओढून दोन्ही ओठ घट्ट मिठून हवा आत ओढताना तोंडाने एक विशिष्ठ प्रकारचा आवाज करायचा जो ऐकून बैलं लगेच जाग्यावर थांबायची. आता हे सगळं लुप्त होत चाललं. इंटरनेटच्या जमान्यात आपली लेकरं मोबाईलवरून परदेशात संवाद साधायली पण आपल्या पाळीव प्राण्यांसोबतची भाषा मात्र ते विसरत चालली. ती विसरत चालली असे म्हणण्यापेक्षा आपणच त्यांची ग्रामीण संस्कृतीची नाळ हळू हळू तोडू लागलो आहोत असेच म्हणावे लागेल.

लेकराला शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी लागावी एवढाच उद्देश ठेवून जर आम्ही आपल्या लेकरांना शिकवत असू तर या निसर्गाच्या शाळेत हिंडताना त्याचा जो अभ्यास होणार आहे त्यापासून त्याला दूर ठेवून घरात वन बी एच के किंवा टू बी एच के मध्ये डांबून, शहरात मैदान नसलेल्या शाळेत शिकवून. घर टू शाळा आणि शाळा टू घर बस्स एवढ्यातच त्याच्या सुरुवातीच्या शालेय जीवनातील सुमारे दहा पंधरा वर्षे घालवणार असू तर ही लेकरं भविष्यात डिप्रेशनचे शिकार का नाहीत होणार. निसर्गात वावरताना त्याच्या घटकांसोबत जगताना ताण तणाव हलका होतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे मग चार भिंतीत मिळणाऱ्या शिक्षणव्यतिरिक्त झाडांशी, पक्षांशी, पाळीव प्राण्यांशी संवाद साधण्याचे प्रात्यक्षिक शिक्षण घेण्याचा त्यांना अधिकार नाही का ?

कोणतीही गोष्ट शिकण्याचं, त्या मनावर बिंबवण्याचं एक वय असतं. आपल्या लेकराभोवती एक ठराविक चौकट टाकून आपण त्याला मर्यादित अनुभव देतोय का ? त्याची अभिव्यक्ती संपन्न करण्याची प्रणाली आपण सिमीत करतोय का ? आपलं सभोवताल जाणून घ्यायचा त्यातील घटकांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधायचा त्यांना अधिकार नाही का ? याचा विचार व्हावा. विकासाच्या इमारतीवर तुम्ही कितीही उंच उंच चढत राहा पण अखेर मातीत यावच लागतं तेव्हा त्या मातीची आणि त्या मातीतल्या सगळ्यांची ओळख ठेवायला हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्यासहित आपल्या मागच्या सगळ्या पिढ्या याच शेतीने पोसल्या आहेत आणि पुढेही तीच पोसणार आहे म्हणून आपल्या लेकरांची शेतीसंस्कृतीची नाळ तुटू देऊ नका अन्यथा कालांतराने जागो ग्राहक जागो ऐवजी जागो पालक जागोच्या जाहिराती टिव्हीवर यायल्या तर नवल वाटू नये.

प्रा. विशाल गरड
मु.पो.पांगरी, ता.बार्शी, जि.सोलापूर
पिन : ४१३४०४
ई मेल : vishalgarad.18@gmail.com



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...