Wednesday, January 12, 2022

शाळाबंदी

एक गाव आहे जिथे मोबाईलला रेंजच नाही. पालक अशिक्षित आहेत त्यांचा विद्यार्थी ऑनलाइन वर्गात कसा उपस्थित राहील ? एक पालक थ्रेशिंग मशीनवर कामगार आहे. त्याच्याकडे स्मार्ट फोन नाही त्याने त्याच्या पाल्याला कसं शिकवायचं ? पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना अनन्य साधारण महत्व असते. गेल्या दोन वर्षात एम.एस्सी केलेले, डिग्री घेतलेले किती प्रात्यक्षिक अनुभव घेऊन पास झालेत ? कित्येक विद्यार्थी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे गेमिंग आणि पॉर्नोग्राफीकडे वळले आहेत हे कसं थांबवायचं ?

समजा पालकांचा मोबाईल असेल आणि जर ते त्यांच्या मोबाईलवर अश्लील कंटेंट पाहत असतील आणि लेक्चर च्या वेळेपुरताच ते त्यांचा मोबाईल पाल्याला देत असतील तर फेसबुक, गुगल किंवा यू ट्यूब हे ऍप्स मोबाईल धारकाने जो कंटेंट सर्च केलेला असतो त्यासंबंधीचाच कंटेंट मोबाईल स्क्रिनवर सतत दाखवत राहतात. उत्सुकतेने जर आपल्या पाल्याने त्यावर क्लीक केले तर नको त्या वयात तो गुलाबी दुनियेत रंगून जातो अगदी बेमालूमपणे. हे कसं रोखायचं ?

एक ऊसतोड कामगाराची मुलगी होती. ती सातवीच्या वर्गात शिकत होती. मार्च २०२० मध्ये झालेल्या लॉकडाऊन मध्ये ती शाळाबाह्य झाली. मध्यंतरी शाळा सुरू झाल्यावर पालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण सतत मोबाईल नॉट रीचेबल लागल्याने आजतागायत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षात तिने ऑनलाइन शिक्षण घेतले असेल ?

ग्रामीण भागात ७० टक्के विद्यार्थी सर्वसामान्य घरातून येतात त्यापैकी किमान २२ टक्के विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन शिकत असतात. धनदांडग्या पालकांची लेकरं शिकली नाहीत, त्यांना नोकरी मिळाली नाही म्हणून काय भविष्यात त्यांची उपासमार होणार नाही पण रिक्षा चालक, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, अशा गरीब पालकांसाठी त्यांच्या लेकरांचे शिक्षण हीच त्यांच्या भविष्याची भाकरी असते. मग त्यांच्या लेकरांचे शिक्षण थांबवणे कितपत योग्य ?

"एकदोन वर्ष नाही शिक्षण झालं तरं कुठं बिघडतंय" या वाक्याची किंमत विद्यार्थ्यांना फार उशीरा लक्षात येईल. उदाहरण म्हणून सांगायचं झालंच तर आठवी नववी हे दोन वर्ग दहावीचा पाया असतात. आज आठवीतले विद्यार्थी ऑनलाइन शाळेतून थेट दहावीपर्यंत आलेत मग बारावी नंतर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नीट, जेईई परीक्षेला ते अर्धगाबुळ्या ऑनलाइन शिक्षणाच्या जोरावर तोंड देऊ शकतील का ?

गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण हाच उद्धाराचा एकमेव मार्ग असतो त्यांची लेकरं शिकली तरच त्यांचे जीवनमान उंचावते असे पालक आज हात जोडून पाया पडून शिक्षकांना विनंती करत आहेत की  "सर, लेकरं घरी नका हो पाठवू, मी लिहून हमी देतो पण माझा पाल्य हितंच राहू द्या. घरी नाहीत ती अभ्यास करत. वाटूळं होईल ओ लेकरांचं" शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा गुन्हा नाही का याबद्दल कुणाला दोषी धरायचे ? प्रशासन थेट शाळा बंदच्या ऑर्डर काढून मोकळे होते. संबंधित अधिकारी जसे वरून आलेल्या ऑर्डर तत्परतेनं खालपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात तसेच त्यांनी पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे म्हणणे देखील खालून वरपर्यंत पोहोचवायला हवे.

आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? कोरोना झाल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? आणि सलग तीन वर्षे ऑनलाइन शिकून भविष्य गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ? ही आकडेवारी जर अचूक काढली तर शाळा सुरू ठेवण्यास बळ मिळू शकते. असं भिऊन भिऊन कुठवर पळायचं ? ऑनलाइन शिक्षण म्हणजे रडणाऱ्याचे डोळे पुसण्यासारखं आहे. ते कधी न भरून निघणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची तात्पुरती मलमपट्टी आहे. भविष्यात नुसत्या पास झालेल्या पत्रावळ्या घेऊन जेव्हा ही ऑनलाईन पिढी नोकरीच्या मार्केट मध्ये जाईल तेव्हा त्यांच्या त्या मार्कलिस्टला केराच्या टोपल्या दाखवल्या जातील तेव्हा आता शाळा बंद करणारे प्रशासन त्यांच्या नोकरीची जबाबदारी घेईल का ?

विशाल गरड
१२ जानेवारी २०२२

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...