Saturday, January 1, 2022

हे जपायला हवं

साऊ दिड वर्षाची झालीय तिच्या मेंदूवर छापलेली मराठी भाषा आता तोडक्या मोडक्या शब्दात आणि बोबड्या आवाजात उमटू लागली आहे. सांगितलेले सगळं तिला कळायला लागलंय. मोठ्यांच्या कृतीचे अनुकरण करायला तिच्याकडून सुरुवात झाली आहे, त्यामुळेच आज घरच्या अंगणाचा उंबरठा ओलांडून शेती संस्कृतीचा सिलॅबस शिकवण्यासाठी साऊला दुचाकीवर शेतात फिरायला घेऊन गेलो. जाता येता रस्त्याने हजारो गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. शेतात गेल्यावर कुत्र्याचे भौ भौ, गाईचा हंब्या, पक्ष्यांची चिऊ चिऊ, मांजराचे म्याव म्याव, वाऱ्याचा जुई जुई आवाज, फुलांचा सुगंध, विहिरीतले पाणी, हे सगळं तिने लाईव्ह अनुभवलं.

विरा रोज साऊला ज्या गाईचे दूध पाजते, आज तेच दूध नेमकं कुठून येतं आणि कसं काढलं जातं हे तिने प्रत्यक्ष पाहिले. आमचे आबा जेव्हा गाईची धार काढायला बसले तेव्हा तर साऊ एकटक सडातून बादलीत पडणारी दुधाची धार कुतूहलाने पाहत बसली. धारेचा आवाज ऐकण्यात ती तल्लीन झाली. शेतातल्या अनेक जिवंत गोष्टींशी तिचा संवाद आणि सहवास झाला. आपल्या ग्रामीण सांस्कृतीला फार मोठा इतिहास आहे ती शाश्वत आणि पौष्टीक आहे. वाढते शहरीकरण आणि वेस्टर्न लाईफच्या जाळ्यातून आपली सुटका होणे शक्य नसले तरी कधी कधी जमेल तसे आपल्या लेकरांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.

आपल्या लहानपणात बैलगाडी, चाबूक, चिपाडं, खिळ्या, सापट्या, दावी, चंगाळ्या, सायकलची टायर, गाढवन हे खेळण्याची साधने असायची. शेतात चिंचा गोळा करायला जाणे, विहिरीत पोहायला जाणे, मोठमोठ्या झाडांवर चढाणे हा खेळ असायचा. सुर्यफुलाच्या लाकडाची साल काढल्यावर त्यात निघणाऱ्या मऊ गाभ्या पासून नांगर, कुळव तयार करणे, दिवाळीत महानंदी च्या पोकळ लाकडात सायकलची तार आणि रबर लावून टिकल्या वाजवायची बंदूक तयार करणे, चिखलापासून घरं तयार करणे, वाळूच्या ढिगाऱ्यात पाय घालून त्यावर हाताने थोपटून खोपा तयार करणे अशा गोष्टीतून नवनिर्मितीचा आनंद मिळायचा.

हाकलून लावताना कुत्र्याला 'हाड' म्हणायचं, मांजराला 'थेर' म्हणायचं, जनावरांना 'हाईक' म्हणायचं तेच त्यांना बोलावतात कुत्र्याला 'कू कू' म्हणायचं, कोंबड्यांना 'पा पा' मांजराला फिस फिस करायचं आणि जनावरांना टिट्याव टिट्याव करायचं. चालती बैलगाडीत बसल्यावर ती थांबवतात हाताने कासरा  ओढून दोन्ही ओठ घट्ट मिठून हवा आत ओढताना तोंडाने एक विशिष्ठ प्रकारचा आवाज करायचा जो ऐकून बैलं लगेच जाग्यावर थांबायची. आता हे सगळं लुप्त होत चाललं. इंटरनेटच्या जमान्यात आपली लेकरं मोबाईलवरून परदेशात संवाद साधायली पण आपल्या पाळीव प्राण्यांसोबतची भाषा मात्र ते विसरत चालली. ती विसरत चालली असे म्हणण्यापेक्षा आपणच त्यांची ग्रामीण संस्कृतीची नाळ हळू हळू तोडू लागलो आहोत असेच म्हणावे लागेल.

लेकराला शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी लागावी एवढाच उद्देश ठेवून जर आम्ही आपल्या लेकरांना शिकवत असू तर या निसर्गाच्या शाळेत हिंडताना त्याचा जो अभ्यास होणार आहे त्यापासून त्याला दूर ठेवून घरात वन बी एच के किंवा टू बी एच के मध्ये डांबून, शहरात मैदान नसलेल्या शाळेत शिकवून. घर टू शाळा आणि शाळा टू घर बस्स एवढ्यातच त्याच्या सुरुवातीच्या शालेय जीवनातील सुमारे दहा पंधरा वर्षे घालवणार असू तर ही लेकरं भविष्यात डिप्रेशनचे शिकार का नाहीत होणार. निसर्गात वावरताना त्याच्या घटकांसोबत जगताना ताण तणाव हलका होतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे मग चार भिंतीत मिळणाऱ्या शिक्षणव्यतिरिक्त झाडांशी, पक्षांशी, पाळीव प्राण्यांशी संवाद साधण्याचे प्रात्यक्षिक शिक्षण घेण्याचा त्यांना अधिकार नाही का ?

कोणतीही गोष्ट शिकण्याचं, त्या मनावर बिंबवण्याचं एक वय असतं. आपल्या लेकराभोवती एक ठराविक चौकट टाकून आपण त्याला मर्यादित अनुभव देतोय का ? त्याची अभिव्यक्ती संपन्न करण्याची प्रणाली आपण सिमीत करतोय का ? आपलं सभोवताल जाणून घ्यायचा त्यातील घटकांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधायचा त्यांना अधिकार नाही का ? याचा विचार व्हावा. विकासाच्या इमारतीवर तुम्ही कितीही उंच उंच चढत राहा पण अखेर मातीत यावच लागतं तेव्हा त्या मातीची आणि त्या मातीतल्या सगळ्यांची ओळख ठेवायला हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्यासहित आपल्या मागच्या सगळ्या पिढ्या याच शेतीने पोसल्या आहेत आणि पुढेही तीच पोसणार आहे म्हणून आपल्या लेकरांची शेतीसंस्कृतीची नाळ तुटू देऊ नका अन्यथा कालांतराने जागो ग्राहक जागो ऐवजी जागो पालक जागोच्या जाहिराती टिव्हीवर यायल्या तर नवल वाटू नये.

प्रा. विशाल गरड
मु.पो.पांगरी, ता.बार्शी, जि.सोलापूर
पिन : ४१३४०४
ई मेल : vishalgarad.18@gmail.com



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...