Tuesday, September 5, 2023

बापल्योक

ही एका नारळासारखी गोष्ट आहे. बापलेकाचे वर वरून एकमेकांबद्दल टणक दिसणारे स्वभाव पण आतून मात्र तुडुंब भरलेलं प्रेम आणि खळखळून वाहणारी माया. सर्वांचा अभिनय अतिशय नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी झालाय. काही डायलॉग्स पात्रांच्या डोळ्यातून आणि हुंकारातून व्यक्त झालेत. आपल्या हक्काच्या माणसांवरच चिडता येतं ओरडता येतं कारण कितीही भांडलोत तरी एकमेकांना कुशीत घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यातच असते.


पायल जेवढी पण दिसली त्यातली अर्धी तर व्हिडिओ कॉलवरच दिसलीये तरीही गोड दिसलीये. चित्रपटात तिच्यासोबत अजून एक हिरॉईन आहे आणि ती म्हणजे सागरची होंडा शाईन. बापलेकांच्या प्रवासाची ती एकमेव साक्षीदार ठरलीये. विठ्ठलने ही कथा लिहिताना नात्यांची उसवलेली वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ही गोष्ट फक्त बापलेकाची नाही तर आईबापाच्या नात्यात जेवढे केवढे येतातत्या सर्वांची आहे. जुने वाद, रूसा फुगी, हेवेदावे या सर्वांना मूठमाती देण्याची शिकवण हा चित्रपट देतो. 


जुन्या रितीभाती, खवड्या, हेंगाड, बीनअब्रूचा असे ग्रामीण ढंगाचे शब्द, पिराला ठेवलेला मालिद्याचा निवद, कंपनीचा फोन, म्हशीची धार काढताना फोनवरून तात्यांनी म्हशीशी साधलेला संवाद. सागर तात्यांना गाडीवरून दवाखान्यात नेतानाचा सिन आणि `भूतकाळाला कुणी भेटत असतंय व्हय !’ हे वाक्य आपल्याला आवडलेल्या गोष्टी आहेत. मसाला बघण्याची सवय असलेल्यांना बापल्योक संथ चालणारा चित्रपट वाटेल पण स्टोरीच तशी असल्याने मकरंदला कॅनवास वाढवता आला नसावा. 


राक्षस मधला परसू, कागर मधला भाऊड्या, पुनश्च हरी ओम मधला रवी, हॉटेल मुंबई मधला डी. सी कनू, एक थी बेगम मधला इक्बाल खान,द मिसिंग स्टोन मधला सोमनाथ, घर बंदूक बिर्याणी मधला जॉर्ज, आणि आता बापल्योक मधून सागर या पात्रातून आमच्या विठ्ठल काळेने त्याच्या अभिनयाची चंद्रभागा वाहू दिली आहे. परंतू बापल्योक मधे तो फक्त पाणी म्हणून नाही तर पाण्याला वळण देणारी नदी म्हणून दिसलाय कारण चित्रपटाची स्टोरी त्यानेच लिहिली आहे त्यामुळेच वरील सर्व पात्रांपेक्षा आपणच आपल्यासाठी लिहिलेलं पात्र जवळचं वाटतं त्यामुळे विठ्ठलसाठी बापल्योक जवळचा आहे. 


आपण यशाची उंची गाठली की त्या वाटेवर असलेल्यांना हात देत राहायचा असतो. नागराज आण्णांनी बापल्योकच्या प्रेझेंटरची भूमिका पार पाडत नेमकं तेच केलंय. उमगाया बाप रं हे गाणे जणू या चित्रपटाचा आत्मा बनला आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी ज्या परिस्थितीत हे सगळं शूट पूर्ण केलंय त्याबद्दल त्यांचे व सर्व टीमचे कौतुकच करायला हवे. बापल्योक पाहून आल्यावर तुम्हालाही तुमच्या बापाला घट्ट मिठी मारावीशी वाटेल. बाकी सगळं जाऊ द्या पण निदान या कारणासाठीतरी बापल्योक बघायलाच पाहिजे. 


प्रा.विशाल गरड

५ स्पेटेंबर २०२३, पांगरी





Sunday, September 3, 2023

सोनवणे सरांचे अभिष्ठचिंतन

लातूर मधील दिड हजार क्षमतेचा क्लास बंद करुन, गोरगरिबांची लेकरं डॉक्टर इंजिनिअर व्हावीत म्हणून उक्कडगावच्या डोंगरात येवून कॉलेज उभा करणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


वयाची एकसष्टी पार करून सुद्धा वेळ प्रसंगी तितक्याच ताकदिनं वर्गात जाऊन फिजिक्स शिकवणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


किराणा दुकानदाराचं पोरगं एम्सला लावणं आणि शेतकऱ्याचं पोरगं सीओईपीला लावणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


संस्थाध्यक्षाची भूमिका सांभाळत संभाळतच, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना वडिलांसमान माया लावणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


एकाच दिवशी पहाटे लातूरच्या कॉलेजवर, सकाळी धाराशिवच्या कॉलेजवर, दुपारी उक्कडगावच्या कॉलेजवर आणि रात्री पुण्याच्या कॉलेजवर जाऊन भेट देणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


प्रत्येक विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणं, वेळ पडलीच तर काहींचे पालकत्व सुद्धा स्विकारणं. 

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


स्वतःच्या आयुष्यातली अनंत दुःख विसरून, दुसऱ्यांच्या सुखासाठी झिझत राहणं. 

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


खाजगी संस्था उभारून, कर्मचाऱ्यांना मात्र शासकीय नोकरीसारखी शाश्वती देणं. 

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


वैयक्तिक आयुष्यात कितीही नुकसान होवू देत पण तरीही कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वेळच्या वेळी करणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


तथाकथित संस्थाचालकाच्या टिपिकल मानसिकतेला तिलांजली देवून हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांच्या संकल्प परिवाराचा बाप बनून जगणं.

सोप्पं नसतंय हो, सोनवणे सर होणं


प्रिय सोनवणे सर,

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


विशाल गरड

३ सप्टेंबर २०२३, पांगरी 




गोष्ट एका शस्त्रक्रियेची.

दिनांक १२ सप्टेंबरला मला आणि बार्शीचे प्रसिद्ध सर्जन डॉ.राहुल मांजरे यांना बार्शीत पुरस्कार होता त्यासाठी म्हणून मी पांगरीहून आधी डॉक्टरच्या...