ही एका नारळासारखी गोष्ट आहे. बापलेकाचे वर वरून एकमेकांबद्दल टणक दिसणारे स्वभाव पण आतून मात्र तुडुंब भरलेलं प्रेम आणि खळखळून वाहणारी माया. सर्वांचा अभिनय अतिशय नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी झालाय. काही डायलॉग्स पात्रांच्या डोळ्यातून आणि हुंकारातून व्यक्त झालेत. आपल्या हक्काच्या माणसांवरच चिडता येतं ओरडता येतं कारण कितीही भांडलोत तरी एकमेकांना कुशीत घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यातच असते.
पायल जेवढी पण दिसली त्यातली अर्धी तर व्हिडिओ कॉलवरच दिसलीये तरीही गोड दिसलीये. चित्रपटात तिच्यासोबत अजून एक हिरॉईन आहे आणि ती म्हणजे सागरची होंडा शाईन. बापलेकांच्या प्रवासाची ती एकमेव साक्षीदार ठरलीये. विठ्ठलने ही कथा लिहिताना नात्यांची उसवलेली वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ही गोष्ट फक्त बापलेकाची नाही तर आईबापाच्या नात्यात जेवढे केवढे येतातत्या सर्वांची आहे. जुने वाद, रूसा फुगी, हेवेदावे या सर्वांना मूठमाती देण्याची शिकवण हा चित्रपट देतो.
जुन्या रितीभाती, खवड्या, हेंगाड, बीनअब्रूचा असे ग्रामीण ढंगाचे शब्द, पिराला ठेवलेला मालिद्याचा निवद, कंपनीचा फोन, म्हशीची धार काढताना फोनवरून तात्यांनी म्हशीशी साधलेला संवाद. सागर तात्यांना गाडीवरून दवाखान्यात नेतानाचा सिन आणि `भूतकाळाला कुणी भेटत असतंय व्हय !’ हे वाक्य आपल्याला आवडलेल्या गोष्टी आहेत. मसाला बघण्याची सवय असलेल्यांना बापल्योक संथ चालणारा चित्रपट वाटेल पण स्टोरीच तशी असल्याने मकरंदला कॅनवास वाढवता आला नसावा.
राक्षस मधला परसू, कागर मधला भाऊड्या, पुनश्च हरी ओम मधला रवी, हॉटेल मुंबई मधला डी. सी कनू, एक थी बेगम मधला इक्बाल खान,द मिसिंग स्टोन मधला सोमनाथ, घर बंदूक बिर्याणी मधला जॉर्ज, आणि आता बापल्योक मधून सागर या पात्रातून आमच्या विठ्ठल काळेने त्याच्या अभिनयाची चंद्रभागा वाहू दिली आहे. परंतू बापल्योक मधे तो फक्त पाणी म्हणून नाही तर पाण्याला वळण देणारी नदी म्हणून दिसलाय कारण चित्रपटाची स्टोरी त्यानेच लिहिली आहे त्यामुळेच वरील सर्व पात्रांपेक्षा आपणच आपल्यासाठी लिहिलेलं पात्र जवळचं वाटतं त्यामुळे विठ्ठलसाठी बापल्योक जवळचा आहे.
आपण यशाची उंची गाठली की त्या वाटेवर असलेल्यांना हात देत राहायचा असतो. नागराज आण्णांनी बापल्योकच्या प्रेझेंटरची भूमिका पार पाडत नेमकं तेच केलंय. उमगाया बाप रं हे गाणे जणू या चित्रपटाचा आत्मा बनला आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी ज्या परिस्थितीत हे सगळं शूट पूर्ण केलंय त्याबद्दल त्यांचे व सर्व टीमचे कौतुकच करायला हवे. बापल्योक पाहून आल्यावर तुम्हालाही तुमच्या बापाला घट्ट मिठी मारावीशी वाटेल. बाकी सगळं जाऊ द्या पण निदान या कारणासाठीतरी बापल्योक बघायलाच पाहिजे.
प्रा.विशाल गरड
५ स्पेटेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment