कधी जर माझं एक वेळेचं जेवण चुकलं तरी माझी आई कासावीस होते, रोजच्या जेवणाला थोडा उशीर केला तरी बायको ओरडते. विचार करा आज जरांगे पाटील तब्बल १५ दिवस उपाशी आहेत. त्यांची आई, बायको आणि लेकरांच्या मनाची काय अवस्था असेल. आज त्यांची तब्ब्येत खालावल्याची बातमी समजली आणि डोळे आपसूक पाणावले. एवढी दुर्दम्य ईच्छाशक्ती, धैर्य, सहनशीलता, निश्चय, त्याग सोपी गोष्ट नाही. गेली पंधरा दिवस पाटील उपाशी आहेत पण उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या पोटाला अन्न गोड लागेना गेलंय.
पाटील, तुमच्या रूपाने मराठा समजाला एक सर्वसामान्य लोकांमधला निस्वार्थी लढवैया नेता मिळालाय. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल. असेही थांबलोच होतो अजून थोडे थांबू पण `तुमच्या बलिदानापेक्षा समाजाच्या हितासाठी, लढाईसाठी तुम्ही जिवंत असणं जास्त गरजेचे वाटतेय.’ पाटील, तुम्ही सिस्टिमच्या आत या किंवा बाहेरून लढा पण समाजाला जितकं आरक्षण गरजेचं आहे तेवढेच तुम्हीही गरजेचे आहात हे ही ध्यानात ठेवा. तुमचा जीव आता फक्त तुमचा नाही राहिला तो सकल मराठ्यांचा झालाय. तुमची ही ढासळलेली प्रकृती पाहून प्रत्येक सच्चा मराठ्याची हीच भावना असेल याची खात्री आहे.
विशाल गरड
१२ सप्टेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment