Friday, August 25, 2017

| पर्यावरणपूरक गणोशोत्सव ©

लाहान-लहान अनाथ आणि दिव्यांग असलेल्या मुलींनी तयार केलेला मातीचा गणपती विकत घेऊन देवाचे खरे रूप घरी आणल्याचा आनंद झालाय. उस्मानाबाद जिल्हयातील आळणी पाटीवर असलेल्या स्वआधार मतिमंद मुलींच्या वसतीगृहास सदिच्छा भेट देऊन; या मुलींनी गेल्या दोन महिण्यांपासुन घेतलेल्या कष्टाचे कौतुक करून बाप्पाची मुर्ती घेतली. ऐकीकडे भव्य दिव्य मुर्त्यांसाठी  लाखो करोडो रूपये खर्च करून देव तयार करण्याचे कारखाने उभारले जात आहेत तर दुसरेकडे पर्यावरणपूरक गणपती निर्माण करण्यासाठी हजारो लाखो हात झटत आहेत. बाजार हा मागणी तसा पुरवठा या सुत्रावर चालत असतो. आजवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना आपणच प्रोत्साहन देत आलो म्हणुन लाखो मुर्त्या दरवर्षी पाण्यात टाकण्यास आणि नंतर त्यापासुन होणाऱ्या पाणी प्रदुषणास व मुर्ती विटंबनेस काहीअंशी आपणही जबाबदार आहोत. परंतु आपली श्रद्धा अबाधित ठेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे आपण लक्ष देणे हिच आजची गरज आहे.
आपल्या देशात पर्यावरण रक्षणासाठी अनेक संघटना कार्य करत आहेत. त्या सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहेत; परंतु त्यांच्यावर फक्त कौतुकाची थाप मारण्यापेक्षा निसर्ग संवर्धनासाठी वैयक्तीयपणे टाकलेले आपले एक कृतीशील पाऊलही या चळवळीला बळकटी देईन. सोलापुर मध्येही ईकोफ्रेन्डली क्लब सारख्या संस्था अशा पर्यावरणपूरक उपक्रमासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबवत आहेत. अशा संस्थांना सर्वच स्तरातुन पाठबळ मिळायला हवे तेव्हाच आणखीन हात झटण्यासाठी उभे राहतील.
सरतेशेवटी आपण सर्वजन या पृथ्वीवरचे भाडेकरू आहोत. या सृष्टीचे निर्माते आणि मालक आपण मानलेले देव, ईश्वर, अल्लाह, गाॅड हे आहेत. आपल्याच संरक्षणासाठी त्यांनी निसर्ग नावाची शक्ती निर्माण केली आहे. त्या शक्तीचे भान ठेऊनच आपण प्रत्येक उपक्रम राबवायला हवा अन्यथा असे उत्सव साजरे करायला आपल्या पुढच्या पिढ्या मुकतील.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ ऑगस्ट २०१७ (गणेश चतुर्थी)


Monday, August 21, 2017

| चुकलेलं वासरू ©

आज काॅलेज सुटल्यावर उक्कडगांवहुन येडशी मार्गे पांगरीला निघालो होतो. गावाकडं पोळ्याची धामधुम सुरू होती. सायंकाळी घरी "चौर चौर चांगभले, पौस आला चांगभले" असं म्हणत घरच्या बैलांची लग्न लावायची उत्सुकता लागली होती. डोक्यात सगळं हेच चालु होतं तेवढ्यात माझ्या काॅलेजहुन येणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक वासरू एकटच चालताना दिसलं. मी गाडी थांबवुन आजुबाजुला पाहिलं. गुरांचा कळप दिसेना आणि गुराखीही. मी क्षणात ओळखलं कि हे वासरू वाट चुकलंय. ऐण पोळ्याला आईपासुन दुर झालेलं हे वासरू पाहुन; घरची लग्न लेट का होईना पण या वासराला त्याच्या आईजवळ पोहचवल्याशिवाय घरी नाही जायचं, असं ठरवुन मी त्या वासराजवळ गेलो. गाडीत बसण्याएवढं ते छोटं नसल्याने तो पर्याय बंद झाला. त्याला धरण्याचा प्रयत्न केला तर दुरवर पळत  जायचं, अनोळखी माणसाशी कुणीही असंच वागत असतं त्याला ते तरी कसा अपवाद ठरणार म्हणा.
शेवटी मी बराच वेळ तसाच थांबुन राहिलो, एकटक त्या वासराकडे पाहत राहिलो. नंतर त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते वासरू स्वतःहुन माझ्याजवळ आलं. कदाचित माझ्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलची आत्मियता दिसली असावी आणि तसंही एवढ्या बाबतीत माणसांपेक्षा जनावरं हुशारच असतात. बोलता येत नाही पण डोळ्यातलं प्रेम वाचतात.
वासराला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर हात फिरवला, वसवंड खाजवली, तशी त्याने शेपटी वर केली. बस्स झाली आमची मैत्री. वासराला तिथेच गाडीजवळ थांबवुन; रस्ता सोडुन साधारणतः एक दिड किलो मिटरची पायपीट केल्यावर एका माळावर मला जनावरांचा कळप आणि गुराखी दिसला. मी मोठ्याने हाक मारून त्या गुराख्याजवळ गेलो आणि सर्व हकिकत सांगितली. संजय नावाच्या त्या गुराख्याला माझ्या मोबाईल मधला फोटो दाखवताच तो आनंदात उत्तरला "आवं ह्येच कि जर्सीचं ख्वांड, हळु-हळु चालत व्हतं; म्या मनलं यिल म्हागुण. पण लई उपकार झालं बघा न्हायतरं हुकलं आसतं बगा ऐण सणासुदीचं"
मी म्हणालो "माझ्या गाडीजवळ उभा करून ठेवलंय चला लवकर" आम्ही दोघेही रोडवर आलो तर गाडीजवळ ते वासरू निवांत बसलं होतं. मालकाला पाहुण ते आनंदीत झालं. मग मी गाडीत बसुन पांगरीकडे आणि ते दोघेजण कळपाकडे निघाले. जाता-जाता त्या वासराने माझ्याकडे वळुन पाहिलेली नजर या जन्मात तरी विसरू शकत नाही. नेमकं कोणत्या विश्वासावर ते माझ्याजवळ आलं आणि मी येईपर्यंत गाडीजवळ थांबलं हाच विचार करत-करत मी घरी पोहोचलो. शेवटी बैल पोळ्या दिवशी एका चुकलेल्या वासराला त्याच्या आईपर्यंत पोहचवल्याचे समाधान लाभले. काहीही म्हणा पण माणसांपेक्षा मुके प्राणीच जास्त प्रेम करतात राव, कारण त्यांना खोटं वागता येतंच नसतं.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ ऑगस्ट २०१७ (बैल पोळा)

Saturday, August 19, 2017

| लिंबा ©

या फोटोतला एक चेहरा आहे अठ्ठावीस वर्षाचा आणि दुसरा चेहरा आहे नव्वद वर्षाचा परंतु दोन्ही चेहऱ्यात एक साम्य आहे; ते म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद. एकाला मदत मिळाल्याचा तर दुसऱ्याला मदतीला आल्याचा. होय, काल काॅलेज सुटल्यावर बऱ्याच दिवसांनी माझ्या हिरो होंडावर बार्शीला निघालो होतो. घारी पुरी नंतर येणाऱ्या वळणावरूनच साई मंदीराच्या अलिकडे एक गुलाबी फेटा घातलेला वृद्ध व्यक्ती रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या गाडीस्वारांना हात दाखवताना दिसला. शाळकरी मुले आणि वृद्ध व्यक्ती दिसल्या की माझ्या गाडीचा ब्रेक आपोआपच लागतो. मला ते गृहस्त दिसल्यापासुनच त्यांना लिफ्ट द्यायचे पक्के झाले होते. 
त्यांच्या जवळ गाडी थांबवुन मी जेव्हा "बसा आजोबा" म्हणलो तेव्हा ते म्हणले "व्वा रं पठ्ठया, हात न दाखीवता थांबलाच की, आरं गाड्यांला हात दाकवुन कटाळुन गेल्तो, मगापसुन दहा पाच गाड्या गेल्या, तुज्याच शिंदपाकी पोरं व्हती पण नाय थांबली. तवा मनलं आता पोरा ठोराला हातच नगं करायचा". हे बोलता-बोलताच ते आजोबा काठी सावरत गाडीवर बसले. पाठीवर एक थाप टाकली आन् म्हणले "चलं मला कुसळंबला सोड"
गाडी आणि आमच्या गप्पा दोन्ही वेगात सुरू झाल्या आजोबांचे नांव लिंबा गपाट, वय वर्ष ९०, एक मुलगा एक मुलगी, पोरगं पिकअपवर डायवर हाय, मालकीन मरून तिस वर्ष झाली, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, शाळा काय ते माहित नाही, दुसऱ्यांच्या शेतात ८० रूपये सालानं काम करून पाच एकर जमिन घेतली, आज नव्वद वर्ष वयातही शेतातली कामे करतात, हातात काठी आली पण चाल तेवढीच हाय, दात, डोळे आन् गुडघे अजुनबी मजबुत हैत, जवानीत असताना ४-४ घागरी रतिबाचं दुध सायकलीवर बार्शीला वाहिलंय, हे सारं मला लिंबा आजोबांनी कुसळंबला येईपर्यंत सांगितलं.
जुन्या माणसांवर झालेला कष्टाचा संस्कार हिच त्यांच्या दिर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. ऐशोआराम जिंदगीच्या विळख्यात सापडलेल्या युवापिढीला लिंबा गपाट सारख्या शेतकऱ्याकडुन खुप काही शिकायला मिळतं फक्त आपल्या गाडीच्या रिकाम्या सिटवर त्यांना बसवण्याची दानत ठेवायला हवी. आयुष्य खुप सुंदर आहे आणि अशा व्रतस्थ वाटसरूशी झालेल्या योगायोगाच्या भेटीने ते अजुन समृद्ध बनतं.
तब्बल नव्वद वर्षाच्या अनुभवाचं जिवंत पुस्तक अगदी काही क्षणात मला वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. सरतेशेवटी एवढंच वाटते की, "वृद्धांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या मरणाकडे होत असलेल्या वाटचालीच्या निशाण्या नसुन त्या अनुभवाच्या वाटा असतात; फक्त त्या शोधण्याची नजर असायला हवी".

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

Friday, August 11, 2017

| मोडी लिपी ©

भाषा हे माणसांच्या संवादाचे माध्यम आहे. आपल्या देशातही शेकडो वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात परंतु यापैकी मराठी भाषा लिहीण्याची मोडी लिपी खुप जुणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोडी लिपीत स्वाक्षरी करायचे; तत्कालीन बहुतांशी पत्रव्यवहारही याच लिपीत असायचा. म्हणुनच महाराजांची पत्र वगैरे वाचत असताना मला या लिपीची आवड निर्माण झाली. खरंतर तेव्हापासुनच मला सुद्धा हि लिपी लिहायला यावी असे वाटायचे परंतु मोडीची बाराखडी अवघड असल्याने ती शिकायलाही तितकाच वेळ लागला. आज अखेर मी माझे स्वतःचे संपुर्ण नांव या लिपीत लिहु शकल्याने फार समाधान वाटले.
आजच्या आधुनिक काळात भाषेच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होत असताना आपल्या मराठी भाषेची मोडी लिपी मात्र हळु-हळु लोप पावत चालली आहे याची खंत वाटते. भाषेसोबतच तिच्या लिपीचेही संवर्धन होण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन ती वापरायला हवी. आपल्या ईतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारी हि लिपी जोपासणे म्हणजे ईतिहासाचा वारसा पुढे चालवण्यासारखेच आहे.
आज मात्र मोडी लिपी फक्त शिवकालिन पत्र आणि जुने दस्ताऐवज वगैरे एवढ्यापुरतीच शिल्लक उरली आहे. माझे आजोबा अजुनही मोडी लिपीतच स्वाक्षरी करतात; जेव्हा मी त्यांना याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले कि "मी चौथीत असताना आम्हाला मोडी शिकवायचे त्यानंतर बंद झालं" याचा अर्थ सतराव्या शतकात रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी हि लिपी एकोणीसाव्या शतकापर्यंत जगत आली परंतु आता मात्र ती शेवटच्या घटका मोजत आहे. शिकवणारेच शिल्लक नाहीत राहिले तेव्हा शिकणारे तरी कुठुन तयार होतील.
आज रोजच्या व्यवहारात जरी मोडी लिपीचे महत्व राहिले नसले तरी शिवकालिन संदर्भ अभ्यासण्यासाठी मात्र आजही मोडी लिपीचे ज्ञान तितके आवश्यक आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०१७

Wednesday, August 2, 2017

| रायगड ते पन्हाळगड ©

सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाहुन आणि शेवट छत्रपती संभाजी महाराजांच्या पन्हाळगडावर अशा हिंदवी स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेल्या किल्यांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा ३० व ३१ जुलै रोजी पुर्ण केला. आजवर वाचलेलं, ऐकलेलं, आणि पाहिलेलं याची देही याची डोळा पुन्हा-पुन्हा अनुभवल्याने तो ईतिहास ह्रदयावर अधोरेखीत झालाय. रायगडावर आजवर खुपवेळा गेलो परंतु भर पावसाळ्यात रायगड अनुभवण्याचा आनंदच पहिल्यांदाच घेतला.
दिवस ढळेपर्यंत रायगडाच्या प्रत्येक भागाचे निरिक्षण करून पावसाळ्यातली टिपनं नोंदवली. टिपलेलं सर्वच इथे लिहिणे शक्य नाही परंतु रायगडावर कधीच न गेलेल्या व्यक्तींनाही स्फुर्ती मिळावी म्हणुन हा छोटासा अट्टाहास. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात, पडत्या पावसात आणि धुक्याच्या गर्द छायेत दुर्गराज उतरण्याचा चित्तथरारक अनुभव अविस्मरणीय होता. आजवर उन्हाळा आणि हिवाळ्यात रायगड चढलो होतो परंतु आज पावसाळ्यातही रायगड चढुन वर्षातल्या तिन्ही ऋतुत गडावर जाण्याचे स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान लाभले.
टकमक टोकावरून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारा शेकडो किलोमिटरचा परिघ बघताना आणि डोंगरांनी पांघरलेल्या हिरव्या शालुवरून वाहणारे शेकडो धबधबे पाहताना स्वर्गाची व्याख्या अनुभवता आली आणि पाषाणाची उभी कातळ पाहुण गडाच्या भव्यतेची जाणिव झाली. महाराजांच्या समाधीपुढे गुडघे टेकवुन माथा पायरीवर टेकवल्यानंतर जी उर्जा शरिरात संचारते ती शब्दात व्यक्त करणे फारच कठीण आहे ती प्रत्येकाने तिथे जाऊनच अनुभवायला हवी.
रायगडाचा निरोप घेऊन रात्री उशीरा चिपळुन मुक्कामी थांबलो व सकाळी लवकर उठुन थेट पन्हाळगडाकडे प्रयान केले. जाता जाता छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने ज्या ठिकाणी फितुरीने पकडले त्या संगमेश्वराच्या संगमावर कणकेश्वरला थांबुन ईतिहास जाणुन घेतला. नंतर सायंकाळी पन्हाळगडावर पोहचलो तिथल्या प्रत्येक स्थळाला भेट देऊन रात्रीच्या अंधारात अंबरखाणा पाहिला. आपल्याला माहित असणारे सांगत सांगत आणि माहिती नसणारे जाणुन घेत घेत अभ्यास दौरा पुर्ण केला. सदर दौऱ्यात आणखीनही बऱ्याच प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.
या दोन दिवसाच्या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य गुप्तवार्ता अधिकारी कृष्णात पाटील साहेब, कृषी अधिकारी दत्तात्रय क्षिरसागर साहेब, अॅड.श्रीरंग लाळे साहेब, दिपक क्राॅप केअर कंपनीचे संस्थापक दिपक थिटे साहेब आणि त्यांच्या डस्टर गाडीची साथ लाभली. या सर्व मित्रांच्या सह्रदयी साथीमुळे प्रवास सुखकर झाला एवढ्यातही कृष्णा पाटलाचे आयकार्ड, दत्ता सरांची बदललेली आडनावे, रंगाची बिसलेरी, आणि दिप्याच्या ड्रायव्हींगने मजा आणली.
येत्या हिवाळ्यात पुन्हा जाण्याचा विचार करतोय तुम्हा सर्वांसोबत; ईच्छुक असाल तर नक्कीच नियोजन करू तोपर्यंत जय शिवाजी, जय संभाजी !

✍🏼प्रा.विशाल गरड | दिनांक ३० व ३१ जुलै २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...