आज कॉलेजहून घरी येताना माझ्या नेहमीच्या रस्त्याच्या शेजारील एका गोठ्यात वार्धक्याकडे वळलेला हा खिलार जातीचा बैल दिसला. संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली असता त्याचे नाव `कबिऱ्या’ असल्याचे समजले. पुढे कबिऱ्याच्या तारुण्याबद्दल मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले. की “सर, ह्यो कबिऱ्या लय ताकदीचा आन रागीट बैल व्हता, म्होरं कितीबी म्होटा बैल असुद्या; ही टक्कर धरायचाच, झ्याट भेत नव्हता कुणालाच उलट समदी बैलं भ्ययची ह्याला. काम जर करायला तर ईळ ईळ दमत नव्हता. आणुळक्या माणसानं त्येज्या जवळ जायची टाप नव्हती न्हाईतर शिंग मारायचा. आता एवढा थकलाय तरी पर्वादिशी एकाला शिंग मारलंय. ह्ये पोटाला इतक्यालं फाटलंय.” हे ऐकून मला विशेष वाटले.
मरणाच्या दारात उभं असताना सुद्धा कबिऱ्या त्याचा एट्टीट्यूड जिवंत ठेवून आहे. त्याची पांढरी शुभ्र त्वचा जिर्ण झालिये, उठायला अवसान नाही तरी सुद्धा शिंगातला आत्मविश्वास तसाच आहे. मी हा फोटो टिपण्यासाठी जेव्हा कबिऱ्याच्या जवळ चाललो तेव्हा ते शेतकरी मला म्हणाले “सर, जरा लांबूनच बरं का” म्हणूनच कबिऱ्याच्या आयुष्यातला कदाचित हा शेवटचा फोटो मी लांबूनच टिपला. तब्बल तेवीस चोवीस वर्ष काळ्या आईची सेवा केल्याने बैलाचे मालक पांडुरंग जाधवर यांनी त्याला अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटला. कबिऱ्यासोबतच्या काही क्षणात मी एक गोष्ट शिकलो की “तुमचं शरीर थकलं तरी तुमच्या नजरेचा धाक आणि स्वभावाची जरब अशी असायला हवी की प्रत्येकाने त्याच्या गोष्टी अभिमानाने सांगाव्यात” माणूस असो की जनावर ते त्याच्या स्वभावावरूनच लक्षात राहतं.
कबिऱ्या, तुझ्यावरचा हा लेख वाचलेल्या प्रत्येकाच्या तू सदैव आठवणीत राहशील. मृत्यू जरी वेगाने तुझ्या जवळ येत असला तरी तुला सोबत घेवून जाताना सुद्धा तो जरा कचरेल यात शंका नाही. गेलास यमसदनी तरी तू त्या यमाच्या रेड्याला टक्करीत हरवशील यात काय वाद नाही. भारी जगलास भावा. धन्यवाद !
विशाल गरड
२ ऑगस्ट २०२३, उक्कडगाव
व्वा खूप छान सर
ReplyDelete