आज आमच्या संसाराला पाच वर्ष पूर्ण झालीत. नवरा बायकोच्या नात्यापलीकडे जाऊन आम्ही एकमेकांचे मित्र मैत्रीण झालोत. बायकोला मैत्रीण करण्याचा टप्पा संसारातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. गेल्या पाच वर्षात मला तो गाठता आला. बायकोचा मित्र बनणे किंवा बायकोला मैत्रीण बनवणे साधी गोष्ट नसतेच त्यासाठी दोघांनाही अतिप्रचंड मॅचूरिटी यावी लागते. नुसतं तेवढ्यावरही भागात नाही तर नात्यांच्या तथाकथित आचार संहिता सुद्धा थोड्या उसवाव्या लागतात तेव्हाच ते शक्य होतं.
गेल्या पाच वर्षात `अहो’, या शब्दातला आदर, प्रेम, राग, माया, दहशत हे सारं अनुभवलंय. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आता मला माहित नसलेला एकही पैलू शिल्लक नाही. दोघांनी एकमेकांचे मेंदू स्कॅन करुन ठेवलेत, तरीही माझ्या एकाच देहात मी आठ दहा व्यक्तिमत्त्व जागी केल्याने मला शंभर टक्के समजून घ्यायला विराला अजुन एक पंचवार्षिक जाऊ द्यावी लागेल. माझ्यातल्या लेखकाच्या तळाशीजाणे सोप्पय का ?
छाटूर मुटूर रुसवे फुगवे वगळता गेल्या पाच वर्षांत आमचे एकदाही घमासान वाकयुद्ध झाले नाही. झालेच तरी त्यातून बाहेर पडण्याचे प्लॅन तयार करून ठेवलेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे विरा सोबतची ही पहिली पंचवार्षिक मी यशस्वीपणे पार पाडली आहे. मतदारसंघाचा परिपूर्ण अभ्यास झाल्याने पुढील निवडणुकांत विक्रमी मतांनी निवडून येण्याची खात्री वाटतेय. आमच्या संसारात लोकशाही असल्याने तिच्या मताचा मी नेहमीच आदर करत आलोय. कधी कधी हुकूमशाही करतो पण चांगल्या गोष्टींच्या अंमलबजावणी पुरतीच. तिने सुचवलेली बहुतांशी विकासकामे मी पूर्ण केली आहेत. जी अपूर्ण आहेत ती पुढील टर्ममधे नक्की पूर्ण होतील. प्रिय विरा, हा आपला संघर्षाचा काळ आहे, तुझी सोबत अशीच कायम ठेव, यातून निर्माण झालेल्या साम्राज्याची तू अभिषिक्त राणी असशील.
विशाल गरड
१९ ऑगस्ट २०२३, पांगरी (लग्नाचा पाचवा वाढदिवस)
खूप छान लेखन
ReplyDelete