Friday, April 5, 2024

साऊचा चौथा वाढदिवस

आज माझ्या थोरल्या लेकीचा वाढदिवस. ती चार वर्षांची झालीये. आपली लेकरं हाता खांद्यावर खेळत मोठी होताना पाहणे आई बापासाठी वेगळाच आनंद असतो. प्रत्येक मायबापाला त्यांची लेकरांची काळजी वाटणे नैसर्गिक असते पण जेव्हा तेच लेकरू बोबड्या आवाजात आणि इवल्याशा हातांनी जेव्हा आपली काळजी घ्यायला लागतं तेव्हा जगात भारी फिलिंग असते ती. सध्या आम्ही साऊची ती स्टेज अनुभवतो आहोत. कधी काही कारणास्तव जर चुकून मी आईवर किंवा विरावर ओरडलो तर साऊ लगेच माझ्या तोंडाला हात लावत मला रागावते. आमचं एकत्र कुटुंब असल्याने तिची मातृभाषा जबरदस्त वृद्धिंगत झाली आहे. आई बाबांसह घरात तीन आज्या आणि तीन आजोबा ही साऊची श्रीमंती आहे. ग्रामीण शैलीतले सगळे बारकावे तिने या चार वर्षांत अनुभवले असल्याने भविष्यात ते तिच्या कामी येतील.


तिला दारासमोरचा सडा माहीत आहे, चुलीतला जाळ माहीत आहे, पत्र्यावर पडणारा पावसाचा आवाज माहीत आहे, बहुतांशी प्राणी आणि पक्षांचे आवाज ती प्रत्यक्ष अनुभवते, चेहऱ्यावरचे सगळे हावभाव तिला स्पष्ट कळतात, तिला नाती माहीत आहेत, तिला माणसं माहीत आहेत आणि इवल्याशा मेंदूला आता माणुसकीही कळत आहे. लेकरांचे पालन पोषण ही पालकांची प्राथमिक जबाबदारी असते पण मी माझ्या कामात प्रचंड व्यस्त असताना विरा आणि माझे सर्व कुटुंबीय ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात म्हणूनच मी माझ्यातल्या अभिव्यक्तींना वेळ देऊ शकतो. असो लेखक बापाने ठरवले तर माझ्या या कादंबरीची एक कादंबरी तयार होईल. तूर्तास एवढं च लिहून थांबतो. माझ्या पिल्लीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


विशाल गरड. (साऊचे बाबा)

५ एप्रिल २०२४, पांगरी




Sunday, January 14, 2024

वाचकांना धन्यवाद

आज सकाळ सप्तरंग मधे माझ्या धसुडी या सदरात “बाप नावाची पोकळी” हा लेख प्रसिद्ध झाला. पहाटेपासूनच प्रतिक्रियांची जणू त्सुनामी सुरू झाली. ओळखीच्यांनी थेट कॉल केले, काहींनी व्हॉट्सऍपवर मेसेज केले. मेल बॉक्स तर ओसंडून वाहिला. तरी बरं लेखाच्या खाली माझा पर्सनल नंबर नव्हता दिला नाहीतर अख्खा दिवस फोन उचलण्यात आणि धन्यवाद म्हणण्यात गेला असता. आपण काय लिहितो त्यापेक्षा कुठं लिहितो यावरही त्याची परिणामकारकता अवलंबून असते. सप्तरंगचे वाचक इंद्रधनुष्यासारखे विशाल आहेत, ते मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत, सिंधुदुर्ग पासून ठाणे पर्यंत आणि सोलापूरपासून अमरावतीपर्यंत विस्तारलेले आहेत. म्हणूनच सबंध महाराष्ट्रातून लिखाणावर प्रतिक्रिया उमटतात. 


आजवर सोशल मीडियावर प्रचंड लिहीलंय पण प्रिंट मिडियासाठी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. इथे लिहिलेल्या शब्दांना अनेक माणसांचा हात लागत असतो म्हणूनच ते आपसूक स्पेशल होवून जातात. मी स्वतःला लेखक म्हणून नेहमीच अपडेट करत आलोय आणि त्याला अपडेट करण्यात तुमचा मोठा वाटा राहिलाय. मायबाप वाचकांच्या हजारो प्रतिक्रीयांनी गहिवरून गेलोय. आता हे क्षण दर रविवारी माझ्या पदरी पडणार आहेत. हळू हळू सवय होईलच कौतुक पचवायची पण आजचे जरा नवीन नवीन होते म्हणून त्याला शब्दबद्ध करावेसे वाटले. आज दिवसभरात प्रतिक्रिया दिलेल्या सर्व वाचकांचे तसेच सकाळ वृत्तपत्र समूहाच्या पेपर टाकणाऱ्या व्यक्तीपासून ते प्रेस मधील छापणारे, ऑफिसमधील संकलन करणाऱ्यांसह सर्व संपादक महोदयांचे मनापासून आभार. 


विशाल गरड

१४ जानेवारी २०२४, पांगरी




Saturday, December 23, 2023

चिलट

आज सांच्यापारी रानातून घरी येताना एक चिलाट खापकन डोळ्यात घुसलं. लगीच डोळा चुळीत चुळीतच म्या गाडी साईडला घितली. चिलटाला जित्ता डोळ्याबाहिर काढायसाठी वाडुळ झटलो पण ते डोळ्यात गेल्या गेल्याच मेलं व्हतं. ह्ये आसलं मायंदाळ व्हतंय म्हणुंशान गॉगल असतंय डोळ्याला पण त्योबी नेमका आजच घरी ऱ्हायला आन हे चिलाट हाकनाक मेलं. त्येलाबी माहित नसल पुढून गाडी यील आन मलाबी माहीत न्हवतं पुढून ती यील. एवढ्या मट्या पिरतमीवर ह्या बोटावर जीव सुडून पडल्याल्या ह्या चिलटाची कुठं गणती व्हइल का ?


आवं ही चिलाट काय आन माणूस काय. ऊगं जमिनीवर थोडं वरीस फिरायला आल्याली पाव्हणं हायती. एकदा का दिस भरलं की आसच चिलटासारखं मरून जायचंय. तवा आजचा दिस आपला म्हणून जगा लेकानो. सगळं उद्या उद्या करत बसलाव तर जगायचं ऱ्हाऊन जाईल. ही चिलटाची बॉडी रस्त्याच्या कडंला कुठं पडली आसल ह्यजी कोण नोंद ठिवील का ? आरं ह्या भर्मांडात माणूसबी एक चिलाट हाय, जवा जवा त्यो निसर्गावर चढाई करल तवा तवा निसर्गबी ह्या चिलाटासारखी माणसं मारील; मग दोष देणार कुणाला ?


विशाल गरड

२३ डिसेंबर २०२३, पांगरी




Saturday, December 16, 2023

तोड - पोस्टर रिलीज

 एवढ्या सगळ्या धबडग्यात माझ्यासारख्या पामराने अजून काय काय करावं. तरीबी स्वतःमधला दिग्दर्शक आणि अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मेंदूच्या काही न्युरॉन्सला गुत्त देवून ठेवलंय. मी व्याख्यानात, लिखाणात, चित्रकलेत, कॅलिग्राफित कितीही बिझी असू द्या. नवनवीन विषयांवरील पिच्चरची स्टोरी डोक्यात सुरुच असते; त्यापैकीच ‘दैना’ आणि ‘बुचाड’ नंतरची माझी पुढील कलाकृती म्हणजे“तोड”. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्ही चित्रीकरण सुरू केले होते. तोडच्या संपूर्ण शूट पैकी सुमारे सत्तर टक्के शूट आम्ही अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केले पण नंतर काहीच सीन साठी जवळपास चार पाच महिने लागले. एडीटींगलाही मग मिळेल तसा वेळ देवून बसू लागलो. सरतेशेवटी ऊसतोड कामगारांचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारा तोड पूर्ण झालाय. एकाने लिहिलेल्या गोष्टीवर जेव्हा सर्वजण काम करतात तेव्हाच पिच्चर तयार होतो. तोडच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या जीवतोड मेहनतीमुळे माझ्या मनातल्या गोष्टीला मुर्त स्वरूप प्राप्त होवू शकले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. 


या लघुचित्रपटाची पहिली स्क्रिनिंगही आम्ही काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरांच्या पाड्यावर जाऊन केली. लवकरच त्याचा व्लॉग यूट्युबवर टाकेन पण तूर्तास हे आमच्या तोडचे प्रोमोशनल पोस्टर मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. लघुचित्रपटाबद्दल त्याच्या निर्मितीच्या आणि चित्रीकरणाच्या प्रवासाबद्दल डोंगरभर गोष्टी आहेत. हळू हळू मी त्या सांगणारच आहे पण तूर्तास माझ्या आयुष्यातला हा तिसरा लघुचित्रपट राज्यातील आणि देशातील विविध फिल्म फेस्टिव्हलमधे जाण्यास सज्ज झालाय. लवकरच आणखीन काही स्पेशल स्क्रिनिंग करण्याचाही आमचा मानस आहे. प्रिय रसिक श्रोतेहो, तुमच्या आभाळभर प्रेमातला ढगभर गारवा जरी ‘तोड’ला मिळाला तरी ही कलाकृती बुचाडचेही रेकॉर्ड तोडेल अशी आशा आहे. 


विशाल विजय गरड

(लेखक,दिग्दर्शक,अभिनेता : तोड)






गोष्ट एका शस्त्रक्रियेची.

दिनांक १२ सप्टेंबरला मला आणि बार्शीचे प्रसिद्ध सर्जन डॉ.राहुल मांजरे यांना बार्शीत पुरस्कार होता त्यासाठी म्हणून मी पांगरीहून आधी डॉक्टरच्या...