Monday, March 20, 2017

| शेतकरी ©

आज काॅलेजची माझी ड्युटी संपवुन पांगरीला निघालो होतो रस्त्यातच स्वतःची दिवसभराची ड्युटी संपवुन घरी निघालेला एक शेतकरी दिसला. सोबत चार गाई, दोन म्हशी आणि काही शेरडं होती. दिवस उगवायलाच एखादी भाकरी फटकरात बांधुन, एखाद्या रिकाम्या बिसलेरीच्या बाटलीत घरचं पाणी भरून, खंद्यावर चाबुक आणि हातात कुऱ्हाड घेऊन हा शेतकरी माळरानावर वन वन भटकत असतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी आधी या गुराढोरांचं पोट भरणं जास्त गरजेचं असतं हे त्याला ठाऊक आहे म्हणुनच त्याची हि दिवसभराची ड्युटी तो प्रामाणिकपणे पार पाडतो.
काॅलेजला जाताना असे चार पाच शेतकरी मला रोज भेटतात. दोघांच्या ड्युट्या सारख्याच वेळेला सुरू होतात आणि संपतात म्हणुन भेटनं आमचं रोजचंच. गाडीवर जाता जाता एखादा रामराम ठरलेलाच. ओसाड माळरानावर जनावरं सांभाळणे हे खरंच जिकिरिचे काम आहे. काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळण्यापेक्षा नक्कीच हे अवघड आहे.
दिवसभर उन्हाच्या कारात करपलेल्या माळरानावर जनावरांना काय खायला मिळत असलं? कुणास ठाऊक पण कडबा विकत घ्यायची ऐपत नसल्यावर अशी भटकंती आलीच. कर्जाचा एक हप्ता भरण्यासाठी महिण्यातले असे कित्येक हप्ते शेतकरी राजा उन्हात राबतो. दुध डेअरीच्या तुटपुंज्या पगारीवर आणि कवडीमोल किंमतीत विकलेल्या शेतमालाच्या पट्टीवर कर्जाचा डोंगर रेटण्याचा प्रयत्न करतो पण जिद्ध हारत नाही. भले व्याज वाढलं तरी चालेल पण मी कर्ज बुडवणार नाही या शेतकऱ्याच्या प्रामाणिकतेची दखल कुठेच का घेतली जाऊ नये याची खंत वाटते. कधी-कधी हाच चांगुलपणा त्याचा जिव सुद्धा घेतो.
मला भेटणारा प्रत्येक शेतकरी चाळीशी ओलांडलेला असतो. अशातही शेतात राबण्याची त्याची धमक तरण्या पोराला लाजवेल इतकी जबरदस्त असते. हि शक्ती येते तरी कुठुन तर याचं उत्तर आहे पोरीचं लग्न, मुलाचं शिक्षण, सण वार उत्सव, संसाराचा बारदाना आणि बँकेचे कर्ज याच गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याला कष्टातुन रिटायरमेंट देत नाहीत.
एक छाटान आणि धोतरावर वर्षानुवर्ष शेतात राब-राब राबणाऱ्या या शेतकरी राजाची हि दैना कधी संपेल तेव्हा संपेल पण तुर्तास तरी "स्वतःच्या रक्ताचं पाणी करत काळ्या आईच्या पोटाला पाझर फोडुन आपल्या पोटाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकानेच सन्मानाची वागणुक देणे हिच काळाची गरज आहे." कारण तो जर खचला तर उद्या आपल्या पोटाची खळगी भरनं अवघड होऊन जाईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० मार्च २०१७

Sunday, March 19, 2017

| काटा ©

काही दिवसांपुर्वी माझ्या काॅलेजसमोर असलेल्या तळ्यावर फेरफटका मारायला गेलो होतो. तिथल्या भरावावर असंख्य काटेरी झुडुपं पाहिली. त्याला लागलेल्या काट्यांना खुप जवळुन न्याहाळलं. पाहता पाहता ते काटे माझ्या डोळ्यातुन थेट मनालाच टोचले आणि मग हे शब्द बाहेर आले.
हे काटे लहानपणी थेट टोचतात परंतु मोठेपणी हेच काटे काही माणसांच्या रूपात भेटतात आणि टोचतातही. अशा काट्यांच्या टोचण्यापासुन लांब राहण्यासाठी आपले मनही तितकंच गेंड्याच्या कातडीचे करावे लागते. ज्याला काट्याची सवय होते तो सराईतपणे काट्यांवरून चालतो. संवेदना मेलेल्या माणसांना रक्ताची काय किंमत; त्यांना तर फक्त ते वाहतानाच दिसते त्यात तो अंध असल्यावर तर खुपच अवघड. बाभळीवर फिरणारे मुंगळे, सरडे, खारूताई यांना ते काटे कधीच नाहीत टोचत कारण ते जपुन चालतात. काट्यांच्या मुळाशी राहतात. टोकावर उड्या नाहीत मारत. काटा हा स्वतःहुन कधीच टोचत नाही आपणच आपल्या चुकीने टोचुन घेतो. तो लवकर बाहेर काढला तर ठिक नाहीतर कुरूप बनतो. एखाद्या विषयावर स्वतःला निमुळतं करता आलं की आपल्या विचारांनासुद्धा एक टोकदारपणा येतो. कळत नकळत तो दुसऱ्याला टोचतोही. काटे आयुष्यात जपुन चालायला शिकवतात. आयुष्याच्या वाटेवर असे काटे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात परंतु ते सगळे बाजुला सारत बसण्यापेक्षा आपल्याच पायात एखादे चांगले पायतान असले की ते टोचणार नाहीत. पायाला टोचनाऱ्या काट्यासाठी हाच रामबाण उपाय परंतु ह्रदयात आणि डोक्यात घुसणाऱ्या काट्यांसाठी प्रतिकाटे तयारच ठेवावे लागतात.
ओल्या काट्यापेक्षा वाळलेला काटा जास्त टोचतो. काही काही काटे कुणालाही न टोचताच कुजुन जातात तर काही काटे त्यांचा टोकदारपणा दुसरा काटा बाहेर काढण्यासाठी वापरतात. स्वतःचं सजिवपण विसरलेले काटे दुसऱ्याला रक्तबंबाळ करण्यात माहिर असतात.
कधी आपल्या आयुष्यात कोणी काटा बनुन येतं तर कधी आपणंच कुणाच्यातरी आयुष्यात काटा बनुन जातो. कुणी आपला काटा काढतो तर कधी आपण कुणाचातरी. या वास्तववादी, माणुसरूपी काट्यांपेक्षा काळजाला जिवंत करणारे शब्द ऐकल्यावर सर्वांगावर येणारा काटा श्रेष्ठ असतो. तोच तुम्हाला तुमच्या संवेदनशिलतेची जाणिव करूण देतो. म्हणुनच काटा रस्त्यावर असो, माणसात असो किंवा शब्दांत कधीतरी टोचायलाच हवा.

"मनी उठी विचार लाटा,
जेव्हा घुसे शब्दकाटा"

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ मार्च २०१७

Saturday, March 11, 2017

| लोमपाट ©

आज काॅलेज सुटल्यावर घराकडं निघालो तेव्हा स्त्यातच वस्तीवरची पोरं लोमपाट खेळताना दिसली. लोमपाट किंवा आट्यापट्या हा माझा लहाणपणीचा आवडीचा खेळ होता. आम्ही त्याला भुर्रर्र म्हणायचो. सुर्र घेतल्यावर प्रतिस्पर्धी संघाचा मुख्य स्पर्धक फाटीवर सावध उभा राहुन माझ्या छातीला हात लावुन ईकडे तिकडे रास्ता मारण्याच्या जय्यत तयारीत असायचा मग अशा परिस्थितीत कुंडीतल्या आपल्या गड्याचा अंदाज घेऊन "आपले गडी कुंडीत..भुर्रर्र..र्र" अशी आरोळी देऊन कुंड्या ओलांडत खाली जाऊन पाणी आणण्याचा प्रयत्न करायचो. हा सगळा भुतकाळ डोळ्यासमोर जिवंत झाला.
आम्ही लहाण असताना पांगरीतल्या श्रीराम पेठेतल्या जनावराच्या दवाखाण्यातल्या वडाखाली आमचं लोमपाटाचं मैदान असायचं. कुदळीने खांदुन फट्या आखायच्या; शाळा सुटली कि दफ्तर टाकुन थेट दवाखाण्यात पळायचो. शारिरिक व्यायाम आणि आयुष्यात संकटे भेदायला शिकवणारा हा खेळ आता मोबाईल आणि टि.व्ही गेमच्या जमाण्यातल्या आधुनिक युवागिरीच्या नादात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहरी भागातुन तर केव्हाच झालाय. असंच कुठंतरी ग्रामिण भागात वाड्या वस्त्यांवर तो शेवटच्या घटका मोजतोय.
लोमपाट हा खेळ कमीत कमी चार बैली किंवा जास्तीत जास्त बारा बैली असतो. एक बैली म्हणजे दोन कुंड्या. फाटीवर उभा राहुन वरल्या गड्याला थांबवायचं हा जिकिरीचा प्रयत्न असतो. फक्त सुर्र घेणाऱ्यालाच लाथाने हानायचा परवाना असतो बाकीच्यांनी नुसतं हिकडं तिकडं पळत गडी हाताने आडवायचे असतात. खालुन पाणी घेऊन येणाऱ्याचा आणि कुंडीतुन पाणी घ्यायला जाणाऱ्याचा जर एकाच वेळेस प्रवेश झाला तर त्याला "खाली वर गाबडं" म्हणुन मोठ्याने जल्लोश साजरा करायचा, रास्ता मारताना मन खाऊन झपाटा द्यायचा.
आज एकपारगी शाळा आटोपुन सायंकाळच्या कवळ्या उन्हात उक्कडगांवच्या वस्तीवरची आज्या, स्वाजा, नागीशा, विज्या, पिंकी, सज्या, सदा, तायडी हि सगळी लेकरं लोमपाट खेळताना दिसली आणि त्यांचं दोन डाव मी आवर्जुन थांबुन पाहिले. नवीन शिकणाऱ्या ह्या पोरांना जुनं जाणतं भिमा भाऊ मार्गदर्शन करत होतं. सर्व खेळाचे नियम समजाऊन सांगत होतं. आज पोरांसोबत मी सुद्धा खुप दिवसांनी थोडं लोमपाट खेळलो पण लगेच दमुन पुन्हा बाजुला बसलो.
अशा गावरान खेळाची आता कुठे पुस्तकं उपलब्ध नाहीत फक्त जुन्या माणसांकडुन हे समजुन हा वारसा असाच पुढे चालवणे हिच खरी काळाची गरज आहे. आजच्या आयुष्यात जेव्हा काही माणसं आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लहाणपणीच्या खेळातले काही डाव आजही ती कोंडी फोडायला उपयोगी पडतात.
"मोबाईलच्या गेम्समागं कितीबी पळा
पण कधीतरी एकदा लोमपाट खेळा"
लई भारी वाटतंय...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१७

Thursday, March 9, 2017

| आभासी पाठबळ ©

फेसबुकच्या आभासी दुनियेतुन सुद्धा प्रचंड मोठं पाठबळ मिळतंय. काही दिवसांपुर्वी माझ्या "लिफ्ट" या पोस्टला 1K लाईक्स भेटल्या. हे मी गर्व म्हणुन सांगत नाहिये परंतु कुणालाही टॅग न करता (तश्याही माझ्या पोस्ट कधीच कुणाला टॅगलेल्या नसतात) आणि अकाऊंट स्पाॅन्सर्ड न करता एवढ्या लाईक्स मिळणं आणि ते हि लिखानाला; निदान माझ्यासाठी तरी हे विशेष आहे. एवढच नाही याअनुषंगाने लिहिलेल्या अभिप्रायरूपी अडीच ओळींना सुद्धा याच फेसबुक वर सातशेहुन अधिक लाईक्स मिळाले. कोणी काहीही म्हणो पण साधा एक लाईक्स ठोकण्यासाठी सुद्धा उजव्या हाताच्या अंगठ्याला स्क्रिनच्या डाव्या बाजुला जाऊन पोस्ट च्या खाली लिहिलेल्या लाईकच्या रखाण्यावर आपटाव लागतंय तेव्हा कुठे एक लाईक मिळतो अर्थात या प्रोसेस मध्ये डोळे आणि डोके हे सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतात. नुसता फोटो असेल तर डोळे फर्मान सोडतात पण काही लिखान असेल तर मात्र डोके त्याच्यावर काम करते. पोस्ट वाचुन डोक्यातल्या मेंदुला लईच झिनझिन्या आल्या तर मग ते शब्द बाहेर फेकतंय ते शब्द टाईपन्यासाठी पुन्हा बोटांना स्वतंत्र फर्मान सोडतोय ज्याला आपण कमेंट म्हणतो.
एवढी सगळी उठाठेव जर फक्त तुमच्या एका पोस्टसाठी होत असेल तर त्या लाईक आणि कमेंटचा आदर व्हायलाच हवा. माझ्या हरएक पोस्टला लाईक ठोकणाऱ्या आणि कमेंट मारणाऱ्या सर्व फेसबुक मित्रांचा मला प्रचंड अभिमान आहे आणि आदरही आहे. त्यांच्या प्रतिक्रियांनी आजवर मला खुप मोठी मानसिक शक्ती बहाल केली आहे. दोस्तहो तुमचे ऋण फार मोठे आहेत. तोडकं मोडकं लिहितो, जमेल तेवढं बोलतो, कधी कधी चित्र काढतो आणि काॅलेजला शिकवतो एवढंच काय ते माझं कर्तुत्व परंतु अशा सर्वसामान्य युवकाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिलात म्हणुनच वाट चालतोय. श्रोत्यांनी, कलारसिकांनी आणि मित्रांनी फेसबुकवरून टाकलेली कौतुकाची थाप भविष्यात माझ्याकडुन खुप महान कार्य करून घेईल हे नक्की.
एक वक्ता आणि कलाकार म्हणुन तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन. जेव्हा मी शुन्य होतो तेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया देऊन तुम्ही आजवर दिलेलं पाठबळं निरंतर स्मरणात राहील. बस्स असच प्रेम करत रहा...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ मार्च २०१७

Sunday, March 5, 2017

| बिनधास्त ©

बारावी बोर्ड परिक्षेचे टेंशन फाट्यावर हाणुन उद्या ईतिहासाचा पेपर असताना हा बहाद्दर निवांत उक्कडगांवच्या माळावर शेरडं राखायला निघालाय. एकीकडे पेपर अवघड गेला म्हणुन जिव देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यास सांभाळुण घरचं कर्तव्य पार पाडणारा अमोल मला श्रेष्ठ वाटतो. आणि तसंही घरची शेरडं राखायला लाज कसली आली म्हणा; त्यात रोज दुधाची सोय करणारी शेरडं जगली पाहीजे हे हि तितकंच महत्वाचं.
आज माझ्या काॅलेजवर रविवारची एक सराव परिक्षा ठेवल्याने सुपरव्हिजनसाठी भर दुपारी पांगरीहुन काॅलेजकडे निघालो होतो. तेवढ्यात भिमा भऊच्या कोट्याजवळ अमोल त्याच्या टायगर आणि वाघ्या कुत्र्यासोबत दहा बारा शेरडं राखताना दिसला. त्याला पाहुण मी क्षणभर थांबलो "आर लका बोर्डाची परिक्षा असताना तु अभ्यास सोडुन शेरडं कशाला राखायला आला रं" माझ्या या प्रश्नावर अमोल म्हणाला "आव सर, एका जाग्यावर बसुन अभ्यास करण्यापेक्षा आसं शेरडामागं फिरत फिरत बी माझा आभ्यास व्हतुय की, ह्ये काय पुस्तकं हायतीच की सोबत, आन् न्हायतर कुठं आपला बोर्डात नंबर ययलाय! म्या आज्याबात टेंशन घ्यत नाय परिक्षे बिरिक्षेचं"
अमोलचं हे उत्तर ऐकुण मी क्षणभर अचंबीत झालो परंतु त्याच्याकडुन हेच उत्तर अपेक्षित होते. याआधीही घरातली व शेतातली सगळी कामं करत करत काॅलेजला जाताना मी त्याला खुपदा पाहीलंय. खरंतर ग्रामिण भागात वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या सर्व लेकरांना अशा कामांची सवयच असते. माझ्यासाठी तर डोंगर, माती, गुरं ढोरं, झाडं, माणसं हिच पुस्तकं आहेत फक्त ती वाचण्यासाठी त्यांचा सहवास अनुभवता आला पाहीजे आणि आज अमोल नेमकं तेच करत होता. त्याच्याकडे पाहुन मलाही माझ्या परिक्षाकाळातला बिनधास्तपणा आठवला. आजवरच्या आयुष्यात जेवढ्या काही परिक्षा दिल्या त्या परिक्षाकाळात मी एकदाही माझं रोजचं जगणं आणि वागणं बदललं नव्हतं कारण परिक्षा ह्या सुद्धा रोजच्याच जगण्यातला एक छोटासा भाग आहेत त्यासाठी जिव पणाला वगैरे लावणे परवडत नाही किंवा उगाच त्याचा मोठाला बाऊ करून स्ट्रेस वाढवण्यातही काही मजा नाही. शिकण्याचा आणि रोजच्या जगण्याचा मेळ लावा आणि बिनधास्त जगा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ मार्च २०१७

Friday, March 3, 2017

| लिफ्ट ©

आज नेहमीप्रमाणे काॅलेज सुटल्यावर घरी निघालो होतो. माझ्या नेहमीच्या पायवाटेवरून साक्षी आणि गौरव चालत निघाले होते. शाळेचा मळलेला गणवेश आणि पाठीवर दफ्तर टाकुन हि जोडी शेतातुन घराकडं निघाली होती. सध्या उन्हाळ्यामुळं गावाकडच्या शाळा एकपारगी झालेल्या असल्याने दुपार नंतर शेताकडं अभ्यासासाठी हि लेकरं आली होती. चलता चलता माझी गाडी दिसली की दोघंपण हसत थांबली. गाडी थांबोस्तवरच अगदी बिनधास्त गाडीवर बसली. सुरूवातीला आधी मला लिफ्ट मागायला हात करायची  पण त्यांना जवा समजलं की पाठीवर दफ्तर दिसलं की सरं आपुणमात्याच थांबत्यातं तेव्हापासुन ठरलेल्या वेळी ती ठिकाण्याला थांबायची. सकाळी काॅलेजला निघाल्यावर रस्त्याने दिसेल त्या विद्यार्थ्याला शाळेच्या गेटपर्यंत सोडणे हि माझी जुनी सवय आहे.
अजुनही ग्रामिण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थांना पायपीट करावी लागते. गाडीवर जात असताना अशा लेकरांना शाळेपर्यंत सोडण्याचा आनंदच वेगळा असतो. मी तर आजवर कधीच शाळेची पायरी न चढलेल्यांना सुद्धा शाळेत बसवलंय. रस्त्याने चालताना शेकडो गाड्या जवळुन जातात पण सगळेच काही लिफ्ट देत नाहीत.
घरून निघाल्यावर शाळेची पहिली घंटा वाजायच्या आत शाळेच्या आत पोहोचण्याची लेकरांची धडपड जबरदस्त असते. गावाबाहेरील विद्यार्थी अगदी जमल तसं शाळा गाठण्याचा प्रयत्न करत असतात. कोण सायकलवर तर कोणी दुसऱ्यांच्या सायकलच्या कॅरेजवर नाहीतर नळीवर बसुन, कोणी एस.टी. ने तर कोणी थेट चालत पण प्रत्येक गावातुन किमान शे दोनशे मोटारगाड्या हेलपाटं मारत असतात तरी रस्त्याच्या कडेने शाळेला जाणारी लेकरं त्यांना का बरं दिसत नसावीत. शहरी भागात स्कुलगाड्या असतात परंतु दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या लेकरांना पायपीटीशिवाय पर्यायच नसतो. तेव्हा आपण जर कधी सकाळ सायंकाळ शाळा ते गावं हा प्रवास करत असु तर रोडच्या कडेने पाठीवर दफ्तर अडकुन चालेल्या लेकरांना नक्की लिफ्ट द्या कारण गाडीवर बसल्यावर गाडीच्या आरशात दिसणारा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुण गाडीचं पैसेच फिटल्यासारखं वाटतंय...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०३ मार्च २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...