Friday, April 30, 2021

कोरोना

हे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.

Thursday, April 29, 2021

मला तोडले नसतेस तर ?

विकासकामे, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आजपर्यंत माणसाने करोडो झाडांच्या कत्तली केल्या आहेत. क्षणाक्षणाला रक्तातली ऑक्सिजन पातळी तापसणारा माणूस वातावरणातली ऑक्सिजन पातळी तपासायला विसरत चाललाय. याच विचाराला अनुसरून निदान या कोरोनाच्या भयंकर वातावरणात तरी आपल्या आयुष्यातील झाडांचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी लिहिलेली ही माझी काव्य रचना.


Wednesday, April 21, 2021

ग्रेट भेट वुइथ कवी बालाजी मगर

कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात आज माझ्या या दोस्ताच्या मार्मिक आणि दर्जेदार कविता ऐकून तुफान पोसिटीव्ह झालो. बालाजीचे प्रत्येक काव्य नेहमीच माझ्या काळजाला भिडते आज मात्र बालाजीने त्याच्या खास ठेवणीतल्या जब्राट कविता त्याच्या आवाजात ऐकवल्या. त्याने ऐकवलेले प्रत्येक शब्द जणू उन्हाने तापलेल्या मातीवर पहिल्या पावसाचे थेंब पडल्यावर जसे ढेकूळ फुगतो तसं माझं हृदय फुगून त्यात झिरपले. भविष्यात जेव्हा केव्हा बालाजीचा काव्यसंग्रह प्रकाशित होईल तेव्हा तो नक्कीच साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावेल यात शंका नाही.

शेती माती वरील त्याच्या काव्यरचना साहित्यातील एक अद्भुत आणि उत्कट वर्णन आहेत. आता जोपर्यंत त्याच्या सगळ्या कविता पुस्तक स्वरूपात संग्रह करत नाही तोपर्यंत मलाच चैन पडणार नाही. प्रिय बालू, पोलिस अधिकाऱ्याच्या जाड जुड वर्दीत तुझ्या मनाला फुटलेला हा कवी मनाचा झरा संबंध मानवजातीला सुखावणारा आहे. दोस्ता, असंच लिहीत राहा आणि ऐकवत राहा. तुझ्या काव्यरुपी कस्टडीत राहायला आम्हाला नेहमीच आवडेल.

विशाल गरड
दिनांक : २१ एप्रिल २०२१

Sunday, April 18, 2021

प्राधान्यक्रम बदलावाच लागेल

आजपर्यंत प्रत्येक गावातील नुसत्या समाज मंदिरांवर झालेला खर्च जर काढला तर कमीत कमी २० लाख जास्तीत जास्त १ कोटी एवढा आहे. त्या समाज मंदिरांचा उपयोग आजपर्यंत लग्नात जेवणावळीसाठी, सुगीत शेतमाल साठवणीसाठी, गणेशोत्सव व विविध जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आणि फावल्या वेळेत पत्ते खेळण्यासाठी झाला. श्रद्धेपोटी आपण मंदिर, मस्जिद, चर्च करोडो रुपये खर्चून बांधले त्यामुळे माणसाच्या अशा वागण्याने देव देवतांचे सुद्धा गरिब देव आणि श्रीमंत देव असे वर्गीकरण झाले हे दुर्दैवी आहे.

नेत्याला तुमच्या मतदानाशी देणे घेणे असते त्यामुळे एखाद्या गावातून जर अमुक ठिकाणी एवढा निधी द्या असे एकमुखाने मागणी केली तर ती लगेच मान्य होते त्यामुळे गावासाठी काय मागावे यासाठी गावातील लोकांनी शहाणे होणे काळाची गरज आहे. आजही मी कित्येक गावे पाहतो जिथे रोड नाही, पाण्याची टाकी नाही, एक दवाखाना नाही, शाळेची इमारत नाही पण त्या गावात पंचवीस लाखाचे समाजमंदिर किंवा सभागृह नक्कीच आहे. निधी मिळाला पण तुम्ही त्याचा वापर कशासाठी केला ?

इथून पुढे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी समाज मंदिरांसाठी दिला जाणारा आपला निधी गावातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा व ग्रामीण रुग्णालये यांच्या बांधकामासाठी वापरायला हवा. कुणी नेता आला की ज्या त्या समाजाने आपल्या गल्लीत, पेठेत, आळीत, मंदिरासमोर, मशीदीसमोर एक समाज मंदिर द्या अशी मागणी करणे निदान इथून पुढे तरी थांबवायला हवे. परिस्थितीने आपल्याला आपला प्राधान्यक्रम बदलायला लावलाय. शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करण्यावर भर द्यायला हवा.

समाज मंदिरांवर खर्च झालेला पैसा हा लोकप्रतिनिधीच्या खिशातला नसतो तो कर स्वरूपात जमा झालेला आपलाच पैसा असतो. राजकारणातून मिळणारी सत्ता पैसे जमवण्याचा, कमावण्याचा द्रुतगती मार्ग असतो म्हणूनच सत्ता प्रत्येकाला हवी असते. काही नेते मंडळी प्रामाणिक आहेत तर काही मात्र फक्त टक्केवारी, कमिशन आणि हफ्ते गोळा करण्यासाठी राजकारणात आहेत. देशाची अर्धी संपत्ती भ्रष्टाचारी राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

आज गावपातळीवर आणि शहरात उभा राहत असलेल्या कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासन शाळांच्या खोल्या वापरत आहे. माणसाचे हे वागणे पाहून अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेली पक्क्या स्वरूपाची आर.सी.सी मध्ये बांधलेली सभागृहे हसत असतील. शेवटी म्हणतात ना आपण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. ऑक्सिजन बेड नाही, रुग्णालयात जागा नाही, औषधे नाहीत हा आजवर आपण दिलेल्या प्राधान्यक्रमाचा परिणाम आहे जो भोगावाच लागेल.

विशाल गरड
दिनांक : १८ एप्रिल २०२१

Wednesday, April 14, 2021

पंधरा दिवस

आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या पोलीस दलात सुमारे दिड लाख पोलिस कमी आहेत. आरोग्य विभागात सुद्धा लाखभर कर्मचारी कमीच आहेत अशा परिस्थितीत सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. कोणत्याच सरकारला वाटत नसते माणसं मरावी पण शेवटी एक वेळ येत असते जेव्हा हात टेकावेच लागतात. मग हिच ती वेळ जी आपल्या सर्वांना स्वयं निर्बंध घालून मारून न्यायची आहे.

काही काम नसताना उगं चौकातले पोलिस ओळखीचे आहेत म्हणून फिरणारे, घरात किराणा असताना रोज पाव पाव किलो वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात जाणारे, डॉक्टरचे लेटरप्याड घेऊन रोज नवीन औषध लिहून बाहेर पडणारे, खोटी ओळखपत्रे दाखवून फ्रंट लाईन कर्मचारी म्हणून फिरणारे अशा वाय झेड व्यक्तींना पोलिसांच्या फायबर काठीचा प्रसाद नितांत गरजेचा आहे.

अपुरे मनुष्यबळ, अपुरी रुग्णालये, अपुरे ऑक्सिजन बेड, अपुरे रेमडीसिव्हीअर, अपुरे व्हेंटिलेटर्स, अपुऱ्या अँबुलन्स, अपुरे कोविड सेंटर्स, हे सगळं अपुरे आहे म्हणून या अपुऱ्या  व्यवस्थेत पेशंट म्हणून भरती होण्यापेक्षा पुढील पंधरा दिवस घराबाहेर न पडण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा. स्वतःसह कुटूंबाची काळजी घ्या आणि व्यवस्थेला सहकार्य करा ती आपल्यासाठीच राबत आहे. युअर टाइम स्टार्ट नाऊ.

विशाल गरड
दिनांक : १४ एप्रिल २०२१

Saturday, April 10, 2021

काळाची गरज Remdesivir

सध्या रेमडीसिव्हीअर या इंजेक्शनचे उत्पादन वाढवणे ही प्राथमिकता असायला हवी. राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी आपले जे काही वजन आहे ते तिथे वापरायला हवे. सर्वसामान्य माणसाच्या हातात जेव्हा डॉक्टर रेमडीसिव्हीअरची चिठ्ठी लिहून देतात तेव्हा तो फक्त फेसबुकवर टाकून याचना करू शकतो अथवा पेशंट मरायला सोडून देऊ शकतो. यापलीकडे त्याच्या हातात काहीच नाही. त्याची हतबलता डोळ्यात पाणी आणणारी आहे. मायबाप सरकार, राज्यातील प्रत्येक कोविड सेंटरला इंजेक्शनचा पुरवठा तात्काळ सुरू करा, लाखो जीव वाचतील, इंजेक्शन काय खायची किंवा प्यायची वस्तू नक्कीच नाही पण जे कोणी त्याचा पैसे कमवायची वस्तू म्हणून साठेबाजी करत आहेत त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या दोस्तांनो. या पोस्टचे गांभीर्य तेच समजू शकतात ज्यांच्या घरातली व्यक्ती ऑक्सीजन बेडवर सिरीयस आहे आणि डॉक्टरांनी त्यांना चिठ्ठीवर रेमडीसिव्हीअर लिहून दिले असेल. देव करो ही वेळ कुणावरही येऊ नये. काळजी घ्या !

विशाल गरड
दिनांक : १० एप्रिल २०२१

Monday, April 5, 2021

साऊचे प्रथम अभिष्टचिंतन

प्रथमतः साऊला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या बापपणाला आणि विराच्या आईपणाला एक वर्ष पूर्ण झाली. साऊचा बाळूत्यात गुंडाळल्यापासून ते चालण्यापर्यंतचा प्रवास मागील एका वर्षात आम्ही अनुभवला. प्रत्येकाचे लेकरू त्यांच्या त्यांच्या आईबापाला लय अप्रूप असतं त्याला आम्हीही अपवाद नाहीत. लग्न का करावं, संसार का थाटावा त्या संसाराच्या वेलीवर ही कळी का फुलवावी याचे उत्तर म्हणजे लेकरू असतं. जगातली जी काही सर्वोत्तम सुखं असतील त्यापैकी एक सुख म्हणजे लेकरू आणि त्या लेकराचे लहानपण होय, तिच्या सोबत जगायला मिळणारा प्रत्येक क्षण जणू आनंदाचा डोंगर वाटतो.

ती थोडीशी आजारी पडली तरी वाटणारी हुरहूर,चालताना  कुठे पडू नये म्हणून तिचा सतत केलेला पाठलाग, खेळता खेळता तिने चुकून काही तोंडात घातले तर लगेच तोंडात बोट घालून ते बाहेर काढण्याची आपली तत्परता, गाढ झोपित असताना कधी मध्यरात्री, तर कधी भल्या पहाटे तिचे आपल्या पोटावर येऊन बसने, तिचे झोपितले हसणे. इवल्याशा हातांनी चेहऱ्यावर हात फिरवणे, तिला झोप लागत नाही तोपर्यंत जागणे, ती निट खाईना, लवकर झोपेना म्हणून चीड चीड होणे, तिचे बोबड्या आवाजात आई बाबा म्हणणे, हे सगळं अब्जावधी रुपयांचे सुख आहे जे अनुभवण्यासाठी तुमच्या गरिबी किंवा श्रीमंतीचा संबंध येत नाही.

आमच्या घरातलं हे साऊ नावाचं आनंदाचं झाड आज एक वर्षाचं झालंय. या झाडाच्या सावलीत मिळणारे सुख प्रचंड समाधान देणारं आहे. तिच्या सोबत आजपर्यंत घालवलेला आणि पुढे जाणारा प्रत्येक दिवस रोज एक नवा अनुभव असतो. रोज वाचणे आणि लिहिणे हा जसा माझा छंद आहे तसेच साऊसोबत खेळणे आणि तिला पाहणे हा सुद्धा  रोज जोपासला जाणारा एक छंद झाला आहे. माझ्या या कादंबरीच्या आयुष्यातली एक एक पाने तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ती हजार पानांची अर्थपूर्ण कादंबरी व्हावी हेच तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

फोटो
सोबतचा सुंदर फोटो उस्मानाबादचे टॅलेंटेड छायाचित्रकार जयसिंह पवार यांनी पांगरी येथील निलकंठेश्वर मंदिरात टिपला असून साऊच्या पारंपरिक वेशभूषेची संकल्पना विरा गरड यांची आहे. बाकी मेकअप बिकअपची भानगड अजिबात नाही लेकरू जसं आहे तसं टिपलं गेलंय. धन्यवाद जयसिंह.

विशाल गरड
दिनांक : ५ एप्रिल २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...