Monday, April 5, 2021

साऊचे प्रथम अभिष्टचिंतन

प्रथमतः साऊला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या बापपणाला आणि विराच्या आईपणाला एक वर्ष पूर्ण झाली. साऊचा बाळूत्यात गुंडाळल्यापासून ते चालण्यापर्यंतचा प्रवास मागील एका वर्षात आम्ही अनुभवला. प्रत्येकाचे लेकरू त्यांच्या त्यांच्या आईबापाला लय अप्रूप असतं त्याला आम्हीही अपवाद नाहीत. लग्न का करावं, संसार का थाटावा त्या संसाराच्या वेलीवर ही कळी का फुलवावी याचे उत्तर म्हणजे लेकरू असतं. जगातली जी काही सर्वोत्तम सुखं असतील त्यापैकी एक सुख म्हणजे लेकरू आणि त्या लेकराचे लहानपण होय, तिच्या सोबत जगायला मिळणारा प्रत्येक क्षण जणू आनंदाचा डोंगर वाटतो.

ती थोडीशी आजारी पडली तरी वाटणारी हुरहूर,चालताना  कुठे पडू नये म्हणून तिचा सतत केलेला पाठलाग, खेळता खेळता तिने चुकून काही तोंडात घातले तर लगेच तोंडात बोट घालून ते बाहेर काढण्याची आपली तत्परता, गाढ झोपित असताना कधी मध्यरात्री, तर कधी भल्या पहाटे तिचे आपल्या पोटावर येऊन बसने, तिचे झोपितले हसणे. इवल्याशा हातांनी चेहऱ्यावर हात फिरवणे, तिला झोप लागत नाही तोपर्यंत जागणे, ती निट खाईना, लवकर झोपेना म्हणून चीड चीड होणे, तिचे बोबड्या आवाजात आई बाबा म्हणणे, हे सगळं अब्जावधी रुपयांचे सुख आहे जे अनुभवण्यासाठी तुमच्या गरिबी किंवा श्रीमंतीचा संबंध येत नाही.

आमच्या घरातलं हे साऊ नावाचं आनंदाचं झाड आज एक वर्षाचं झालंय. या झाडाच्या सावलीत मिळणारे सुख प्रचंड समाधान देणारं आहे. तिच्या सोबत आजपर्यंत घालवलेला आणि पुढे जाणारा प्रत्येक दिवस रोज एक नवा अनुभव असतो. रोज वाचणे आणि लिहिणे हा जसा माझा छंद आहे तसेच साऊसोबत खेळणे आणि तिला पाहणे हा सुद्धा  रोज जोपासला जाणारा एक छंद झाला आहे. माझ्या या कादंबरीच्या आयुष्यातली एक एक पाने तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ती हजार पानांची अर्थपूर्ण कादंबरी व्हावी हेच तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

फोटो
सोबतचा सुंदर फोटो उस्मानाबादचे टॅलेंटेड छायाचित्रकार जयसिंह पवार यांनी पांगरी येथील निलकंठेश्वर मंदिरात टिपला असून साऊच्या पारंपरिक वेशभूषेची संकल्पना विरा गरड यांची आहे. बाकी मेकअप बिकअपची भानगड अजिबात नाही लेकरू जसं आहे तसं टिपलं गेलंय. धन्यवाद जयसिंह.

विशाल गरड
दिनांक : ५ एप्रिल २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...