Sunday, April 18, 2021

प्राधान्यक्रम बदलावाच लागेल

आजपर्यंत प्रत्येक गावातील नुसत्या समाज मंदिरांवर झालेला खर्च जर काढला तर कमीत कमी २० लाख जास्तीत जास्त १ कोटी एवढा आहे. त्या समाज मंदिरांचा उपयोग आजपर्यंत लग्नात जेवणावळीसाठी, सुगीत शेतमाल साठवणीसाठी, गणेशोत्सव व विविध जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आणि फावल्या वेळेत पत्ते खेळण्यासाठी झाला. श्रद्धेपोटी आपण मंदिर, मस्जिद, चर्च करोडो रुपये खर्चून बांधले त्यामुळे माणसाच्या अशा वागण्याने देव देवतांचे सुद्धा गरिब देव आणि श्रीमंत देव असे वर्गीकरण झाले हे दुर्दैवी आहे.

नेत्याला तुमच्या मतदानाशी देणे घेणे असते त्यामुळे एखाद्या गावातून जर अमुक ठिकाणी एवढा निधी द्या असे एकमुखाने मागणी केली तर ती लगेच मान्य होते त्यामुळे गावासाठी काय मागावे यासाठी गावातील लोकांनी शहाणे होणे काळाची गरज आहे. आजही मी कित्येक गावे पाहतो जिथे रोड नाही, पाण्याची टाकी नाही, एक दवाखाना नाही, शाळेची इमारत नाही पण त्या गावात पंचवीस लाखाचे समाजमंदिर किंवा सभागृह नक्कीच आहे. निधी मिळाला पण तुम्ही त्याचा वापर कशासाठी केला ?

इथून पुढे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी समाज मंदिरांसाठी दिला जाणारा आपला निधी गावातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा व ग्रामीण रुग्णालये यांच्या बांधकामासाठी वापरायला हवा. कुणी नेता आला की ज्या त्या समाजाने आपल्या गल्लीत, पेठेत, आळीत, मंदिरासमोर, मशीदीसमोर एक समाज मंदिर द्या अशी मागणी करणे निदान इथून पुढे तरी थांबवायला हवे. परिस्थितीने आपल्याला आपला प्राधान्यक्रम बदलायला लावलाय. शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करण्यावर भर द्यायला हवा.

समाज मंदिरांवर खर्च झालेला पैसा हा लोकप्रतिनिधीच्या खिशातला नसतो तो कर स्वरूपात जमा झालेला आपलाच पैसा असतो. राजकारणातून मिळणारी सत्ता पैसे जमवण्याचा, कमावण्याचा द्रुतगती मार्ग असतो म्हणूनच सत्ता प्रत्येकाला हवी असते. काही नेते मंडळी प्रामाणिक आहेत तर काही मात्र फक्त टक्केवारी, कमिशन आणि हफ्ते गोळा करण्यासाठी राजकारणात आहेत. देशाची अर्धी संपत्ती भ्रष्टाचारी राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

आज गावपातळीवर आणि शहरात उभा राहत असलेल्या कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासन शाळांच्या खोल्या वापरत आहे. माणसाचे हे वागणे पाहून अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेली पक्क्या स्वरूपाची आर.सी.सी मध्ये बांधलेली सभागृहे हसत असतील. शेवटी म्हणतात ना आपण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. ऑक्सिजन बेड नाही, रुग्णालयात जागा नाही, औषधे नाहीत हा आजवर आपण दिलेल्या प्राधान्यक्रमाचा परिणाम आहे जो भोगावाच लागेल.

विशाल गरड
दिनांक : १८ एप्रिल २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...